19 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - ६

आज माघ शुद्ध द्वितीया, प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती दिवस आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.

६. इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं  !!

आज माघ शुद्ध द्वितीया, प.पू.सद्गुरु श्री गोविंदकाका महाराजांचा १३० वा जन्मदिन. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य असे की, आजच प.पू.काकांच्या पत्नी ती.पू.रुक्मिणीदेवी तथा ती.मामींची तारखेने पुण्यतिथी आहे. पू.काकांनी ८ ऑक्टोबर १९७४ रोजी देह ठेवला. त्यानंतर बरोबर १०३ दिवसांनी, आजच्या तारखेला १९७५ साली ती.पू.मामींनी देहत्याग केला.
पू.काकांनी देह ठेवल्यावरही पू.मामींनी आपले सौभाग्यालंकार काढले नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, पू.काका कुठेही गेलेले नाहीत, ते आहेतच. आश्चर्य म्हणजे, पू.मामींच्या अंत्यक्रियेनंतर त्यांच्या हातातला हिरवा चुडा व मणिमंगळसूत्र जसेच्या तसे सापडले होते. चितेच्या प्रखर अग्नीतही ते जळले नाही. हीच पू.मामींच्या ' पू.काका सदैव आपल्यासोबत आहेतच ', या मनोधारणेला देवांनीच दिलेली पावती समजायला हरकत नाही.
पू.काका व पू.मामींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ती.मामी पू.काकांना सर्वभावे शरण जाऊन त्यांच्याशी एकरूपच झालेल्या होत्या. माहेरची एवढी प्रचंड श्रीमंती आणि सासरी अशी आबाळ, पण त्यांनी आयुष्यात कधीही एका शब्दाने त्याची तक्रार केली नाही. अतिशय मनापासून त्यांनी आपल्या अवलिया पतिदेवांचा जगावेगळा संसार सांभाळला. पतीच्या इच्छेतच आपले सर्वस्व मानल्याशिवाय असे वागणे शक्यच नाही. आजच्या काळात तर ह्याचा विचारही करू शकणार नाहीत सध्याचे नवरा-बायको. पण पू.काका व पू.मामींची जोडी प्रत्यक्ष भगवंतांनीच घातलेली होती. पू.मामींचे जन्मजन्मांतरीचे  महत्पुण्य होते व त्यांचा पू.काकांशी पूर्वीचाच दृढ ऋणानुबंध होता, म्हणूनच त्यांचा हा संसार असा संपन्नतेने बहरला.
पू.मामींवर पुढे कधीतरी सविस्तर लेखन करायची तीव्र इच्छा आहे. तूर्तास आजच्या या पावन दिवसाचे औचित्य साधून या अलौकिक दांपत्याच्या, रुक्मिणी-गोविंदांच्या श्रीचरणी सादर दंडवत घालतो.
काल आपण पू.काकांच्या काही अमृतवचनांवर चिंतन केले. आजही त्याच संदर्भाने थोडा आणखी विचार करूया.
प.पू.काका हे त्यांच्या काळातील विलक्षण विभूतिमत्व होते; कोणत्याच कसोट्यांमध्ये न बसणारे, अद्वितीय आणि अलौकिक  !! अखंड अवधूती मस्तीत जगणारे, आपल्याच आनंदात सदैव रममाण होऊन विचरणारे ते अद्भुत अवलिया होते. बोलाबुद्धीच्या पलीकडे असणारे त्यांचे वागणे-बोलणे हा त्यामुळेच अनेकांसाठी मोठ्या कोड्याचा विषय ठरला. आजही ते कोडे सुटलेले नाही. " तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ " हेच त्यामागचे खरे कारण आहे.
प.पू.श्री.काका अगदीच मितभाषी होते, पण जी काही दोन-चार वाक्ये ते बोलत ती मात्र मोठमोठ्या ग्रंथांनाही पुरून उरणारी असत. आता त्यांचे हेच एक वाक्य पाहा. ते म्हणतात, " इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं ! "
ब्रह्मनिष्ठ श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराजांचे हे नितांत सुंदर आणि अर्थगर्भित वाक्य आहे. संतांचे बोल हे अर्थगर्भ असतात. संतांचे बोल म्हणजे ' काळ्या दगडावरील रेघ ', अर्थात् ' चिरंतन सत्यच ' ! संतांना श्रीभगवंताच्या स्वरूपाचा पूर्ण साक्षात्कार झालेला असल्याने तेही भगवत्स्वरूप होऊ  ठाकलेले असतात. म्हणूनच त्यांची वाणी देखील भगवंतांसारखी अमृतमयी, प्रेमरूपा आणि गंभीर होते. संतांच्या वाणीमध्ये ' सत्य ' प्रतिष्ठित असते. या सर्वांमुळे त्यांची वाणी साधकांसाठी सदैव ' संजीवक ' ठरते. त्यामुळेच प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे वरील वाक्य ' गूढ अमृतबोल ' ठरावे असेच आहे !
प.पू.श्री.काका फलटणला आलेल्या काही अंतरंग-भक्तांना उद्देशून हे वाक्य म्हणालेले आहेत. प.पू.श्री.काका सतत आपल्या स्वानंद स्थितीत, अवधूती मस्तीमध्ये रंगून गेलेले असत. त्या आत्मानंदाच्या अमृताचे पान करीत अथवा ज्ञानेश्वरीचे चिंतन करीत ते आपल्या खोलीत पहुडलेले असत. प.पू.श्री.काका क्वचित भानावर असले तर एखाद दुसरा शब्द बोलत, नाहीतर आत्ममग्नच राहात. काहीवेळा त्यांच्या त्या अवस्थेतही अधे मधे ते एखादे सुंदर वाक्य बोलून जात. त्यांपैकीच हे एक जबरदस्त वाक्य आहे.
संतांच्या, सद्गुरूंच्या रूपाने भगवंतांची शक्ती मूर्तिमान झालेली असते. त्यामुळे त्यांचा देहही शक्तिस्वरूपच असतो. त्यांच्या सभोवती, त्यांच्या तपस्थानामध्ये आणि त्यांच्या वास्तव्यस्थानामध्ये तीच शक्ती सर्वत्र आणि सदैव भरून राहिलेली असते. तेथे ती शक्ती अनंतकालपर्यंत कार्यरत असते.
ही शक्ती अत्यंत शुद्ध असून, तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक वस्तूला शुद्ध करीत असते. म्हणून जेव्हा आपण अशा स्थानांमध्ये किंवा सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सान्निध्यात जातो, तेव्हा आपले शरीर-मन-वृत्ती देखील त्या शक्तीच्या प्रभावाने काही प्रमाणात शुद्ध होतात. याचाच संदर्भ घेऊन प.पू.श्री.काकांनी वरील वाक्य उच्चारले आहे.
' धुतलं जाणे ' म्हणजे स्वच्छ होणे, शुद्ध होणे. संतांच्या सान्निध्यात आपल्या मनाची, मनाच्या वृत्तींची, वासनांची शुद्धी होते. अर्थात् आपले अंतःकरण धुतले जाते. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज म्हणतात, " संतचरणाची रज ते पार्थिव । परी हा स्वभाव पालटविती ॥ ८८.२॥ संतचरणांचे रजःकण, अर्थात् संतांच्या चरणांमधून प्रसृत होणारी त्यांची कृपाशक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. ती आपला स्वभावच पालटवते. स्वभाव म्हणजेच आपल्या मनाच्या वृत्ती, वासना, इच्छा, कामना. त्या कमी झाल्या की मन स्थिर होऊ लागते, बुद्धी योग्य दिशेने कार्य करू लागते, अहंकारही कमी होतो आणि परमार्थाची खरी गोडी लागून आपल्या स्वभावात जमीन-आस्मानाचा फरक होतो. इतका या संतचरणांच्या कृपेचा प्रभाव असतो. "म्हणोनियां तेथें रज तें पवित्र । सर्व नारीनर गंगारूप ॥८८.७॥ " असे श्री गुलाबराव महाराज त्यासाठीच म्हणतात. संतचरणांची कृपा, त्यांची शक्ती ही संपर्कात आलेल्या सर्वांना इतकी शुद्ध करते, पवित्र करते की त्यांची तुलना प्रत्यक्ष भगवती श्रीगंगेशी करता येईल. प.पू.श्री.काकांच्या या वाक्यामागे हा देखील संदर्भ आहेच.
पू.काकांच्या या अमृतवचनाचा आणखी एक अर्थ असा की, संतांच्या सान्निध्याने, संगतीने व सेवेने आपले ' कर्म ' धुतले जाते. आपले संचित व क्रियमाण धुतले जाऊन प्रारब्धाचीही शुद्धी होते. कर्मांनुसारच जगाची सारी व्यवस्था आहे. या कर्मांमुळेच चांगला अथवा वाईट भोग घडतो. संतांच्या शक्तीमुळे आपली कर्मे शुद्ध होतात, सात्त्विक होतात. अशी सात्त्विक कर्मे श्रीभागवंतांपर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ करीत असतात.
श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की,
संतचरणरज लागतां सहज ।
वासनेचें बीज जळोनि जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी ।
सुख घडोघडी वाढों लागें ॥२॥

संतांच्या चरणांचे रजःकण प्राप्त झाले तर आपल्या वासनेचे बीजच जळून जाते. वासनेचे बीज म्हणजे कर्म. हे कर्मच वांझ होते. म्हणजे वासनेला जन्मालाच घालत नाही. त्यानंतरच आपल्याला रामनामामध्ये खरी आवड निर्माण होते. आपल्याकडून जास्तीतजास्त प्रमाणात नामस्मरण होऊ लागते आणि त्यापासून मिळणारे सुख हळू हळू वाढत जाते. सद्गुरु श्री माउलींनी देखील हरिपाठात , " संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथें ॥८.१॥" असे म्हटले आहे. संतांच्या संगतीतच मनाला योग्य मार्ग व गती मिळते. हा एकच मार्ग फक्त श्रीभगवंतांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण हा त्यांच्या कृपेचा, त्यांच्याशी अभिन्न असणा-या त्यांच्या कृपाशक्तीचा मार्ग आहे. याच मार्गाने गेल्यास श्रीभगवंतांची प्राप्ती होते.
प.पू.श्री.काकांच्या या अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ असा की, " संतांच्या संगतीमध्ये बसल्याने, त्यांनी तपश्चर्येने पवित्र केलेल्या स्थानांमध्ये बसल्याने ( अर्थात् तेथे बसून उपासना केल्याने ) आपली कर्मे धुतली जाऊन , शुद्ध होऊन श्रीभगवंतांविषयी आवड निर्माण होते, त्यांचे भक्तिप्रेम लाभते आणि त्याद्वारेच अखंड सुखाची प्राप्ती होते ! "
प.पू.श्री.काकांच्या १३० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याच कृपेने गेले सहा दिवस घडलेली ही त्यांच्या चरित्र व वाङ्मयाची अल्पशी सेवा त्यांच्याच पावन श्रीचरणी समर्पित करू या. संतांच्या चरित्राचे, वाङ्मयाचे चिंतन-मनन ही एक प्रकारे त्यांची संगतीच आहे. महद्भाग्याने लाभलेली प.पू.काकांची ही चिंतन-संगती आपण सर्वार्थाने आपलीशी करून घेऊया, त्यात आणखी खोलवर जाऊन तो आनंद अधिकाधिक उपभोगूया आणि त्यांच्याच स्मरणानंदात रममाण होऊन जाऊया  !!
प्रणमत गोविन्दं परमानंदम् ।
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]


0 comments:

Post a Comment