18 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - ५

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.
५. सहज बोलणे हित उपदेश
फलटणच्या प.पू.सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची काही वाक्ये फारच अप्रतिम आहेत. अगदी मनाचा ठाव घेतात. प.पू.काकांच्या वाङ्मयसागरातील महत्त्वाची अशी काही उपदेशपर वाक्ये एकत्र करून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. श्री काकास्वरूप सद्गुरुमाउलींची दया हेच माझे भांडवल आणि प्रेरणास्रोत आहे.
सर्वच महात्म्यांनी आपल्यासारख्या साधकांना साधनेच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी काही सुंदर उपदेश करून ठेवलेलाच आहे. तसाच उपदेश उपनिषदांमधूनही दिसतो. उपनिषदे म्हणतात, 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।' उठा, जागे व्हा आणि ध्येयाची ( मोक्षाची किंवा भगवत्स्वरूपाची ) प्राप्ती झाल्याशिवाय ( प्रयत्न करणे ) थांबवू नका !'उपनिषदकारांनी येथे ध्येयप्राप्तीसाठी काय करा? हे सांगितलेले नाही. परंतु प.पू.श्री.काका हाच धागा धरून पुढे सांगतात, " वाचा, शिका, अभ्यास करा, उन्नती करून घ्या ! अभ्यासाची हेळसांड करू नका ! प्रयत्न करीत राहा ! "
प.पू.श्री.काका येथे आपल्याला उपायही सांगतात. ते म्हणतात, प्रथम 'वाचा'. आपल्याला उपलब्ध असलेल्या संतांची, महापुरुषांची चरित्रे वाचा, त्यांचे ग्रंथ वाचा. वाचन हे ज्ञानप्राप्तीचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनाने काही अंशी ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु शेवटी वाचन संपूर्ण ज्ञानप्राप्तीसाठी तोकडेच पडते. म्हणून प.पू.श्री.काका पुढे लगेच 'शिका' असे म्हणतात.
काय वाचा? तर, 'संतचरित्रे' वाचा ! कारण, " आजपर्यंत झालेल्या महात्म्यांची चरित्रे बोधप्रद असून प्रगती देणारी आहेत ."असे त्यांनीच सांगून ठेवलेले आहे. संतचरित्रांमधून बोधाबरोबरच आपल्याला प्रेरणाही मिळते, शिवाय त्याच्या अनुसंधानातून आपल्याला त्या महात्म्यांची कृपाही प्राप्त होते.
प.पू.श्री.काका म्हणतात, " आजपर्यंत झालेल्या थोर पुरुषांची चरित्रे पहा. त्यांची इच्छाशक्ती अभ्यासाने इतकी प्रचंड झालेली होती की तिने आपल्या स्वतःचीच नव्हे, तर आपल्या सर्वस्वाची सुधारणा करून जग हालवून सोडले. "

अशा संतचरित्रांच्या अभ्यासाने आपल्या सत्कार्याची फार मोठी प्रेरणा मिळते. शिवाय कसे वागावे ? कोणत्या परिस्थितीत कोणता व कसा निर्णय घेतला की आपल्याला लाभप्रद ठरतो ? इत्यादी विषयांबद्दल उत्तम बोधही मिळतो. मनात जेव्हा विचारांचे, मतांचे काहूर माजते, तेव्हा फक्त ह्याच प्रकारचा बोध ते वादळ शांत करू शकतो. म्हणून वाचन जरी तोकडे साधन असले तरी ते महत्त्वाचे आहेच. म्हणूनच प.पू.श्री.काका 'वाचा'च्या पुढे 'शिका' असे म्हणतात.
वाचन हे एकतर्फी साधन आहे. वाचलेल्या भागाचा अर्थ कसा लावावा, हे प्रत्येकवेळी वेगवेगळे असते, प्रत्येकाचा अर्थही वेगळा असतो. तसेच लावलेला अर्थ प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही. पण शिक्षणाचे तसे नाही. शिक्षणात जिला सर्व सिद्धांत ज्ञात आहेत अशी व्यक्ती शिकवते आणि विद्यार्थी शिकतो. विद्यार्थ्याला येणाऱ्या सर्व शंकांची लगेच उत्तरेही मिळू शकतात. म्हणून वाचनापेक्षा शिक्षण श्रेष्ठ.
येथे 'शिका' म्हणण्यामागे प.पू.श्री.काकांचे दोन संदर्भ आहेत.एक म्हणजे जे काही वाचले आहे ते आचरणात आणायला शिका. जसे महात्म्यांच्या चरित्रातील सद्गुण, त्यांची प्रबल इच्छाशक्ती, ध्येयासक्ती इत्यादी आपल्याही आचरणात आणायला शिका.
दुसरा संदर्भ असा की, अशाच थोर महात्म्यांच्या, सद्गुरूंच्या सहवासात जे काही वाचलेले आहे त्याचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळवा. हाच पर्याय सर्वोत्तम ! अशा थोर सद्गुरूंच्या सहवासात, त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली आपली उत्तम तयारी होते. आपल्यातील सारे दोष निघून जाऊन आपली जडणघडण सुयोग्य रितीने होते. म्हणून नुसत्या वाचनापेक्षा शिक्षण कधीही वरचढच ठरते !
अरे असले तरी फक्त शिक्षण पुरे पडत नाही. नुसते शिकल्याने सारे भागत नाही तर, जे शिकलो ते पदोपदी जीवनात वापरायला हवे. म्हणूनच प.पू.श्री.काका पुढे म्हणतात की, 'अभ्यास करा.'
अभ्यास करणे म्हणजे शिकलेली गोष्ट आपल्या अनुभवाशी पडताळून पाहणे. कोणतीही गोष्ट कौशल्याने, आपलेपणाने करणे म्हणजे अभ्यास. प.पू.श्री. काका म्हणतात, " जे काही तुम्ही कराल ते 'आपले' असे समजून, त्यात काया-वाचा-मन अर्पण करून केले असता ते आनंदयुक्त यशाचा मोबदला देते." पू.काकांच्या या सांगण्याचा अर्थ असा की, जितक्या प्रेमाने आपण आपली अत्यंत आवडती गोष्ट करतो त्याच आवडीने व सातत्याने आपल्या पुढ्यात आलेले प्रत्येक कर्म, आपले सारे कौशल्य वापरून, मनापासून भगवंतांचीच सेवा म्हणून करणे म्हणजे अभ्यास करणे होय !
प्रत्येक कर्म असे प्रेमाने घडले की ते आनंदाचा मोबदला देते. अशा सेवा म्हणून झालेल्या कर्माने प्रगती होते, उन्नती साधते.
अशी उन्नती झाली म्हणून चालू असलेला अभ्यास सोडून देऊन मात्र चालत नाही.
साधकांचे सर्वतोपरि कल्याण करणारे बोधामृत प्रकट करताना प.पू.श्री.काका म्हणतात, " करिता उठा, आपल्या उद्योगास लागा, व्यर्थ पांगुळपणाचे  पांघरूण घेऊन निजून राहू नका, काम करीत राहा. वेळ टाळू नका. सर्व कामे जेथल्या तेथे व्यवस्थित रीतीने होऊ द्यात. स्वतःचे जीवनसर्वस्व असे व्यर्थ दवडण्यासाठी नाही. त्याचा सदुपयोग करा. "
पांगुळपणाचे पांघरून म्हणजे आळस. हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. म्हणून तो आळस झटकून काम करा, असे पू.काका म्हणतात. सारे काही व्यवस्थित होऊ लागले की, अभ्यास पक्का झाला असे म्हणता येईल. म्हणून प.पू.श्री.काका मूळ वाक्यात पुढे मुद्दामच, "अभ्यासाची हेळसांड करू नका ! " असे म्हणतात.
अभ्यासाचे माहात्म्य सांगताना ते पुढे म्हणतात, " अशा तऱ्हेने वरचेवर अभ्यास व वरचेवर त्याची परीक्षा हीही घेऊन स्वतः धैर्याची कसोटी लावून पहावी. जे जरूर असते ते सर्व आपल्याजवळ तयार असते ; व नसले तरी, 'तुम्ही पुढे व्हा' की सर्व काही एखाद्या जादूप्रमाणे तुम्हास साहाय्य करावयास लागेल." आपल्या मनाला अभ्यासाची गोडी वाटेल आणि उभारीही येईल, आपले मनोधैर्य वाढेल अशा सुंदर शब्दांत प.पू.श्री.काका आपल्याला उपदेश करीत आहेत.
संतांच्या वचनांमध्ये श्रीभगवंतांची कृपाशक्ती असते. त्यामुळे एखादा साधक जेव्हा त्या बोधावर मन एकाग्र करून त्यासारखे वागायचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा ती शक्ती त्या साधकावर कृपा करून त्याला आतूनच साहाय्य करते, त्याचा परमार्थ प्रशस्त करीत असते. म्हणूनच संतवचनांवर आपण मनापासून विसंबून सतत साधनारत राहिले पाहिजे. त्यातच आपले खरे कल्याण आहे !
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]


0 comments:

Post a Comment