गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - २
२. चाले चराचरावरी सत्ता
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीभगवंतांच्या मुखाने ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात म्हणतात की, " मी या जगाचा समर्थ नाथ आहे, मीच वेदांचा बोलविता असून काळाचाही मीच नियंता आहे, माझीच आज्ञा हे चर-अचर विश्व सतत पाळीत असते." तेच भगवंत चौदाव्या अध्यायात एका मार्मिक ओवीत सांगतात की, " जे ज्ञानाने देहाची उपाधी निरसून माझ्याशी एकरूप होतात त्या गुणातीत महात्म्यांमध्ये व माझ्यात कसलाही भेद उरत नाही. ते माझ्यासारखेच सर्वसामर्थ्यसंपन्न होतात. तेही सत्यसंध होतात अर्थात् त्यांचे सर्व संकल्प नेहमी सत्यच होतात. ते महात्मे देखील माझ्याप्रमाणे अनंत व अखंड आनंदमय होऊन ठाकतात." म्हणूनच या विदेही महात्म्यांची चराचरावर सत्ता चालत असते. ते स्वत:हून कधीच कोणते चमत्कार करीत नाहीत, चमत्कारच सहजतेने त्यांच्याठायी घडत असतात.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हेही असेच पूर्ण हरिरंगी रंगलेले महान विभूतिमत्व होते. ते अखंड उन्मनी स्थितीतच राहात असल्याने त्यांची चराचरावर सत्ता चालत असे. अशा प्रकारचे असंख्य चमत्कार त्यांच्याठायी घडलेले पाहायला मिळत. तरी त्यांचे कसलेही सोयर-सुतक पू.काकांना नसे, ते सदैव आपल्याच अवधूती मस्तीमध्ये रममाण असत.
प.पू.काका पुण्याला शनिवार पेठेतील सुप्रसिद्ध फणसळकर वैद्यांच्या घरी नेहमी जात असत. त्यांच्या सूनबाईंनी स्वत: मला सांगितलेली ही हकिकत खरोखरीच अद्भुत आहे.
एके दिवशी पू.काका त्यांच्या घरी अचानक आले. त्यावेळी वैद्य फणसळकर घरी नव्हते. पू.काकांनी आल्या आल्या चहाचे फर्मान सोडले. एरवी देखील पू.काकांना चहा खूप आवडत असे. म्हणजे ते तसे दाखवीत तरी असत. वारंवार चहा लागत असे त्यांना. पू.काकांच्या आज्ञेनुसार सौ.काकूंनी चहा करून आणला.
पू.काकांच्या काही विशिष्ट लकबी होत्या. ते कपातला पूर्ण चहा बशीत काठोकाठ ओतून घेत व एक थेंबही न सांडवता पीत असत. त्याही दिवशी पू.काकांनी बशीत सगळा चहा ओतला. बशी पूर्ण भरली. आता तो चहा प्यावा की नाही? पण सरळपणे वागतील तर ते काका कसले? त्यांनी अचानक बशी धरलेला तो हात झटका देऊन सरळ केला. पण गंमत म्हणजे ती बशी पडली नाही की त्यातला चहा सांडला नाही. हात जमिनीला काटकोनात असूनही सगळे जिथल्या तिथे होते. मग तोंडावर आश्चर्याचे भाव आणून मिश्कीलपणे पू.काका म्हणाले, " अरेच्चा, चहा सांडला नाही की ! जाऊदे , पिऊनच टाकतो त्याला. " असे म्हणून स्वारीने खुशीने हसत हसत तो चहा पिऊन टाकला व घराबाहेर पडले. अनाकलनीय लीला दाखवणे हा या तूर्यातीत अवधूतांचा आवडता खेळच तर आहे !
अवाक झालेल्या सौ.फणसळकर काकूंच्या चेह-यावरचे आश्चर्य लपतच नव्हते. जिवंत चमत्कार त्यांनी उघड्या डोळ्यांनी समोर घडताना पाहिलेला होता ! आजही हा प्रसंग सांगताना त्यांना पू.काकांच्या प्रेमाने भरून येते
काय अद्भुत सामर्थ्य आहे पाहा ! गुरुत्वाकर्षणाचा सर्वमान्य नियमही या अलौकिक त्रिभुवन -गुरुत्वासमोर सपशेल लोटांगण घालता झाला. माउली म्हणतात तेच त्रिकालाबाधित सत्य आहे, " पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावी। हे आज्ञा माझी ॥ज्ञाने.९.१८.२८२॥" या महात्म्यांची सत्ता चराचर जगतावर चालते, त्यांची आज्ञा यच्चयावत् जग शिरोधार्य मानीत असते. म्हणूनच आपल्याला आपले खरे, शाश्वत कल्याण व्हावे असे जर वाटत असेल, तर आपण या महात्म्यांचे चरण घट्ट धरून, ते सांगतील तसे साधन आपले डोके न चालवता श्रद्धेने व प्रेमाने करीत राहिले पाहिजे. मग तेच सर्व बाजूंनी आपला सांभाळ करीत आपल्याही जीवनात त्या ब्रह्मबोधाचा अपूर्व सूर्योदय करवून आपले कोटकल्याण करतात !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]
अशा पोस्ट नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी लाईक करावी.
0 comments:
Post a Comment