3 Feb 2018

नमन गुरुराया स्वामी लोकनाथ सदया


नमस्कार मंडळी,
आज माघ कृष्ण तृतीया, थोर वारकरी सत्पुरुष श्रीसंत नरहरी सोनार महाराज व शक्तिपात परंपरेतील थोर विभूती, प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांची पुण्यतिथी  !!
मूळचे अभिमानी शैव असणा-या श्री नरहरी सोनार महाराजांना भगवान पंढरीनाथांनी अलौकिक लीला करून , ' हरिहरा नाही भेद ' हे पूर्णत: पटवून दिले. पंढरपुरात अगदी विठ्ठलमंदिराजवळ राहूनही ते कधीच श्रीपंढरीनाथांच्या दर्शनाला जात नसत. ते आपल्या घरासमोरील भगवान श्रीमल्लिकार्जुनांची उपासना करीत. पण एका ग्राहकाला भगवान पंढरीनाथांना सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा होता, त्यासाठी माप घ्यायला त्यांना एकदा मंदिरात जावे लागले. विठ्ठलांचे तोंडही पाहणार नाही, अशी त्यांची दृढ भावना असल्याने त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून माप घेतले. पण पांडुरंगांच्या मूर्तीला स्पर्श केल्यावर त्यांना तेथे शिवपिंडच लागली. त्यांनी खसकन् डोळ्यांवरची पट्टी काढली तर समोर साजिरे गोजिरे समचरण रूप दिसले. पुन्हा पट्टी बांधून माप घेतले. हाच प्रकार दोन तीनदा झाल्यावर ते विचारात पडले. भगवंतांच्या या अद्भुत लीलेनंतर मात्र त्यांचा भ्रम दूर झाला व ते विठ्ठलभक्त झाले. पुढे त्यांनी भगवान पंढरीनाथांची मोठी सेवा केली व विपुल अभंगरचनाही केली. श्रीसंत नरहरी महाराजांचे समाधी मंदिर पंढरपुरात महाद्वाराच्या समोरच चंद्रभागेकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला आहे.
देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ।।
हा नामाचे माहात्म्य सांगणारा सुप्रसिद्ध अभंग त्यांचाच आहे.
आजच्याच तिथीला, दि. ९ फेब्रुवारी १९५५ रो़जी काशी क्षेत्री प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी देहत्याग केला. योगिराज श्री.गुळवणी महाराज प.प.श्री. स्वामींना गुरुस्थानी मानत असत. यांच्याकडूनच वेधदीक्षेची एक परंपराशाखा श्री गुळवणी महाराजांकडे आली.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामींचा जन्म दि. ८ मे १८९२ रोजी वैशाख शुद्ध द्वादशीला चक्रवर्ती या भगवती ढाकेश्वरी मातेच्या पुजारी घराण्यात बांगलादेशाची राजधानी ढाका येथे झाला. बालपणापासून त्यांचा ओढा परमार्थाकडेच होता. मोक्षप्राप्तीसाठी तरुणपणीच घरादाराचा त्याग करून देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार ते पू. आत्मप्रकाश ब्रह्मचारी यांना शरण गेले. त्यांच्याकडून ब्रह्मचर्यव्रतासह शक्तिपातदीक्षा लाभून साधना सुरू झाली. अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. संन्यास नियमांच्या बाबतीत ते फार काटेकोर होते. लहान मुलासारखा सहज निर्मळ स्वभाव, तेजस्वी व तप:पूत चेहरा, कडक आचरण आणि कोमल अंत:करण हे त्यांचे काही सद्गुण. पुण्यात प.पू.श्री.गुळवणी महाराजांकडे त्यांचे नेहमी येणे होई व बराचकाळ मुक्कामही असे. त्यांचा गळा खूप गोड होता व ते फार प्रेमाने अभंग म्हणत असत.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा शास्त्राचरणावर फार कटाक्ष होता. त्यांना कोणी थोडेही शास्त्रविरुद्ध वागले-बोललेले खपत नसे. ते स्वत:ही अगदी बिनचूक वागत असत. शक्तिपात दीक्षा देण्याच्या बाबतीत ते अत्यंत कडक होते. आधी सव्वालाख गायत्री जप करायला लावत आणि मगच ते एखाद्याचा दीक्षेसाठी विचार करत असत. कोणतेही विधीनिषेध न बाळगता, सरसकट दीक्षा दिलेल्या त्यांना अजिबात आवडत नसत. दीक्षा ही, " लेने देने की नही होने पाने की बात है । " असे ते नेहमी म्हणत असत. शक्तीची आज्ञा असल्याशिवाय दीक्षाच होत नाही, म्हणून कोणीही आपल्याच मनाने दीक्षा देऊन चालतच नाही, असे ते वारंवार सांगत असत. " मुझे दल बढाना नहीं है । दीक्षा क्या सस्ती चीज है जो मै बाँटता फिरू? " असे ते स्पष्ट सांगत असत.
दुर्दैवाने त्यांना मनस्वी खेद होईल असे चुकीचे वर्तन आजमितीस शक्तिपातदीक्षेच्या नावाखाली सर्वत्र बोकाळले आहे. जो उठतो तो शक्तिपात दीक्षाच द्यायला लागतो सध्या. त्यात फेसबुक व व्हॉटसपवरच दिवसागणिक नवीन दीक्षाधिकारी महाराज जन्माला यायला लागले आहेत. अशी दीक्षा झालेल्या एकाही व्यक्तीला कसलाही अनुभव आलेला ऐकीवात नाही. केवळ मानसिक स्तरावरील भ्रमांनाच हे तथाकथित गुरु अनुभव असे गोंडस नाव देऊन भोळ्या भाबड्या साधकांची दिशाभूल करीत असतात. हा सगळा खोटारडेपणा आहे, लोकांची शुद्ध फसवणूक आहे ही, हे पक्के ध्यानात ठेवावे. आज श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज देहात असते तर अशा दीक्षेचा बाजार मांडणा-या मंडळींना त्यांनी अक्षरश: सडकून काढले असते. कारण दीक्षेच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर व कर्मठच होते. पण शेवटी कालाय तस्मै नम: । हेच खरे.
आज या दोन्ही थोर संतांच्या पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर वंदन  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in

6 comments:

  1. प.प. स्वामीचे चरित्र माझेकडे असून एकदा वाचले आहे. आज पुन्हा अभ्यासेन. आपणास त्रिवार नमस्कार.

    ReplyDelete
  2. या प पु दोन्ही संत विभूतींना सादर साष्टांग नमन🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. स्वामी लोकनाथतीर्थ हे माझे परात्पर गुरू आहेत आणि त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांना शिरसाष्टांग नमस्कार.

    ReplyDelete
  4. दोन्हीही संतद्वयींच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार 👌👌🙏🙏 विनम्र आदरांजली 🙏🙏

    ReplyDelete
  5. अगदी खरे आहे,2000 नंतर बाजार सुरु जाला। नशिब ranbajar नाही जाला ।या तथाकथित गुरूनी दीक्षा फ्ताच स्वस्त केली ।कलि चा प्रभाव ।

    ReplyDelete