*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** षष्ठम अध्याय ***
(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. लेखासोबत दररोज पू. काकांची एक विशेष आठवणही देत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे दिव्य सारस्वत हे साक्षात् त्यांचे स्वरूपच आहे; आणि हीच प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची पक्की धारणा होती. स्वत: श्रीमाउली भगवद्गीतेविषयी म्हणतात की,
म्हणौनि मनें कायें वाचा ।
जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा ।
चक्रवर्ती करी ॥
ज्ञाने.१८.७८.१६६८॥
जो भगवद् गीतेचा मन, शरीर व वाचेने अनन्य दास होतो, सेवक होतो, त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करून ठेवते. माउलींची ही प्रतिज्ञा त्यांच्या श्रीज्ञानेश्वरीलाही पूर्णपणे लागू आहे आणि प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे त्याचे जागते उदाहरण आहेत. भगवान श्रीमाउलींच्या कृपेने, त्या दैवी वाङ्मयाच्या नित्य अनुसंधानाने प. पू. श्री. काका स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती झालेले होते. श्रीमाउलींच्या मुखकमलातून निर्माण झालेल्या अमृतरसाचे ते निरंतर पान करीत होते आणि माउलींच्याच प्रेरणेने कृपावंत होऊन त्यांनी तो अमृतरस तुम्हां-आम्हां भक्तांसाठी ग्रंथरूपाने उपलब्ध करून दिला. ही त्यांची आपल्यावरील फार मोठी करुणाकृपाच म्हणायला हवी.
प. पू. श्री. काकांच्या वाङ्मयाची ओळख करून देण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. पू. काकांचे लेखन पूर्णपणे आपल्या अवधूती मस्तीत झालेले असल्याने, ज्याला त्या स्थितीचा अनुभव आहे, त्याच्या साठीच केवळ ते सुबोध असते. इतरांना तो अनुभव नसल्याने ते वाङ्मय तसे अत्यंत क्लिष्टच वाटते. त्यांची लेखनाची शैली खूप चांगली असली तरीही ती एकप्रकारे स्वतंत्रच आहे. त्यामुळे त्यांच्या शैलीची व्यवस्थित ओळख होईपर्यंत, त्यांची वाक्ये देखील आपल्याला सलग वाचता येत नाहीत. म्हणूनच पू. काकांचे वाङ्मय म्हणावे त्याप्रमाणात लोकांच्या नित्यवाचनात राहू शकले नाही. अर्थात् त्यांचे ज्योतिज्योति, आमोद, प्रास्ताविक व श्रीकृष्णदेव हे चिंतनपर चार ग्रंथच असे कठीण आहेत. बाकी श्रीसिद्धांत ज्ञानेश्वरी, विभूती, हरिपाठ सांगाती हे ग्रंथ त्यामानाने सोपे आहेत.
पू. काकांना एकदा एका भक्ताने सांगितले, " काका, आम्हांला तुमचे लेखन कळत नाही. " त्यावर काका पटकन् उत्तरले, " अरे, पण तुम्हांला कळावे म्हणून मी लिहिलेच नाही ! " खरोखरीच, पू. काकांनी स्वांत:सुखाय वाङ्मयनिर्मिती केलेली आहे. त्यांच्या निर्मळ आत्मप्रचितीची जी अंत:प्रेरणा होती, ती त्यांनी फक्त शब्दबद्ध केलेली आहे. तो आतून स्वयंभ प्रकटलेला त्यांचा स्वानुभव-अनुकारच आहे. त्यामुळे सर्वसामान्यपणे त्यांचे सारस्वत सहज कळणारे नाही. पण त्यांची जर कृपा झालेली असेल एखाद्यावर, तर मात्र त्यांचे वाङ्मय अगदी सोपे होऊन जाते, हेही तितकेच खरे आहे.
पू. काका सलग दहा दहा तास लेखन करीत असत. त्यांचे एक जुने भक्त कै. हिरालालजी काबरा यांनी मला स्वत:ला एकदा सांगितलेला एक विलक्षण प्रसंग सांगतो. हाच पू. काकांच्या आठवणींच्या संग्रहामध्येही छापून आलेला आहे. एकदा हिरालालजी पू. काकांच्या दर्शनाला फलटणला आले होते. त्यावेळी पू. काका श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचे लेखन करीत बसलेले होते. लहानगा शशिकांत ( पू. काकांचे सर्वात धाकटे चिरंजीव ) त्यांच्या मांडीवर होता. ते भराभरा पानेच्या पाने लिहीत होते. गंमत म्हणजे त्यांच्या दौतीतील शाई कधीच संपलेली होती व त्यांनी ती दौत उपडी ठेवलेली होती. तरी ते तसेच त्या दौतीत टाक बुडवून झरझर लेखन करीत होते. जवळपास दोन तासांनी त्यांनी थोडी उसंत घेतली व चाहूल लागली म्हणून मागे पाहिले तेव्हा त्यांना हिरालालजी आलेले समजले. किती एकाग्रता असेल पाहा त्यावेळी पू. काकांची ! जसे त्या कृपाशक्तीच्या माध्यमातून सुचेल तसेच ते लेखन करीत असत. म्हणूनच त्यांचे ते अवधूती मस्तीतले लिखाण सर्व सामान्यांना दुर्बोधच आहे. पण तेच महात्म्यांना अगदी साजूक वाटते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी एकदा पू. काकांचे " श्रीकृष्णदेव " हे पुस्तक पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या हाती दिले व म्हणाले, " बघ रे, आपल्या माहेरचे वाङ्मय आहे. वाच, खूप आवडेल तुला !" जे वाङ्मय आपल्याला किंचितही कळत नाही, तेच महात्म्यांना मात्र अमृतमय वाटते.
पू. काकांना पुस्तक छापताना शब्दांत किंचितही बदल केलेला खपत नसे. ते खूप काळजीपूर्वक शुद्धलेखन तपासत असत. प. पू. काकांची वाक्यरचना तशी पल्लेदार, मोठी आणि अनेक उपवाक्यांचा समूह वाटावी अशीच आहे. भराभर सुचणारे शब्द सलग वाक्यांमध्ये तातडीने गुंफल्यामुळे बहुदा अशी शब्दरचना होत असावी. आपल्याला ती वाक्ये दोन तीनदा वाचल्याशिवाय त्यातला आशय लक्षात येतच नाही.
पू. काकांच्या वाङ्मयापैकी, " विभूती " हा तुलनेने बाकीच्यांपेक्षा सोपा ग्रंथ म्हणायला हवा. ( प्रस्तुत लेखाच्या शेवटी या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, जिज्ञासूंनी तो ग्रंथ डाऊनलोड करून जरूर वाचावा.) फलटण येथील थोर सत्पुरुष श्रीसंत हरिबाबा महाराज व त्यांच्या शिष्योत्तम लाटे गावच्या पू. आईसाहेब महाराज यांचे सुंदर चरित्र पू. काकांनी विभूती मधून उलगडलेले आहे. त्यातही स्फुटलेखन भाग थोडा क्लिष्ट असला तरी चरित्रपर भाग सोपा आहे.
भगवान श्रीमाउलींच्या परमपावन हरिपाठावर प. पू. श्री. काकांचे विलक्षण प्रेम होते. पू. काकांनी कधीच कोणाला अनुग्रह दिला नाही. पण ते श्रीहरिपाठाची उपासना मात्र अनेकांना सांगत असत. सुरुवातीला जयजयकार, मग श्रीज्ञानेश्वरीतील निवडक मंत्ररूप ओव्या, त्यानंतर हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग, मग श्रीशंकराचार्यांचे पांडुरंगाष्टक, त्यानंतर आरती व उर्वरित काही प्रार्थनेचे, उपसंहाराचे अभंग, कैवल्याचा पुतळा व श्रीतुकारामांचे बारा अभंग; अशा क्रमाने पू. काकांचा नित्याच्या हरिपाठाचा होत असे. या हरिपाठासोबत परमार्थात लाभ व्हावा म्हणून त्यांनी " श्रीहरिपाठ सांगाती " हे पुस्तक प्रकाशित केले. या ग्रंथात पू. काकांनी नामसाधनेवर भर देऊन, भगवान माउलींच्या हरिपाठाबरोबरच, सर्वांगीण परमार्थासाठी आवश्यक असणा-या विविध संतांच्या ओव्या व निवडक अभंगांचे, तसेच श्लोकांचे संकलन केलेले आहे. हे संकलन अगदी नेमके, काळजीपूर्वक व नीट विचार करूनच केल्याचे वाचताना स्पष्ट जाणवते. म्हणूनच त्याचे " सांगाती " हे नाव यथार्थ आहे. हा ग्रंथ म्हणजे परमार्थ मार्गातील साधकांचा सज्जन सांगाती, काळजी वाहणारा, सांभाळणारा जोडीदारच आहे, यात शंका नाही.
हरिपाठ सांगाती चे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात पू. काकांनी श्रीज्ञानेश्वरीच्या ओव्या कोणकोणत्या रागात गायच्या त्याची नोंद केलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या इतिहासात, ओव्या गाण्यासाठी रागांचा असा उपयोग सर्वात प्रथम पू. काकांनीच नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या रागांचा त्यांना जो संदर्भ लागला, ती नि:संशय श्रीमाउलींचीच कृपा म्हणायला हवी. त्यातून पू. काकांचेही ज्ञानेश्वरीचे सर्वांगीण चिंतन कळून येते. त्यांनी माउलीकृपेने ध्यानावस्थेत त्या ओव्यांचा तसा सांगीतिक अनुभवच घेतला असावा, असे मला मनापासून वाटते. त्यांचे स्वत:चे रागदारीचे ज्ञानही परिपूर्ण असल्याने, त्यांनी ह्या नोंदी फार काळजीपूर्वक व स्वानुभवाने केलेल्या दिसून येतात.
" सिद्धांत ज्ञानेश्वरी " चे चार खंड म्हणजे श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांचे त्यातील सिद्धांतांनुसार केलेले संकलन असून, त्यांचा अर्थही सोबत दिलेला आहे. हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचाच आहे. आजही दररोज रात्रीच्या हरिपाठानंतर यातील दोन पाने वाचली जातात. तशी पू. काकांच्या वेळेपासूनच चालत आलेली पद्धत आहे.
पू. काकांच्या वाङ्मय प्रसारासाठी " डॉ.गोविंद महाराज उपळेकप साहित्य संस्था " स्थापन करण्यात आलेली होती. या संस्थेमार्फतच आजवर पू. काकांच्या ग्रंथांच्या अनेक आवृत्या काढल्या गेल्या. पण आजमितीस त्यातले फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्हीच ते सर्व ग्रंथ हळूहळू स्कॅन करून आपल्या कम्युनिटीवर पोस्ट करणार आहोत.
पू. काका हे भगवान श्रीमाउलींचे नुसतेे निस्सीम भक्तच नव्हे तर त्यांच्या वाङ्मयाचे सखोल ज्ञानी देखील होते. श्रीमाउलीकृपेने स्वानंदसाम्राज्याच्या सम्राट पदावर बसलेला हा कोमल अंत:करणाचा महात्मा, श्रीज्ञानेश्वरी क्षणोक्षणी जगत होता. त्यांच्या चरित्रातील प्रसंग पाहिले की माउलींचे शब्द त्यांच्या मनीमानसी, सर्वांगी मुरलेले होते, हे स्पष्ट दिसते.
प. पू. श्री. काका भगवान श्रीमाउलींविषयी किती हळवे होते? याचा एक हृद्य प्रसंग सांगतो. हा प्रसंग १९७१ सालचा आहे. एकदा पहिल्यांदाच भेटायला आलेल्या एका तरुण मुलाला त्यांनी विचारले, तुमचे गोत्र काय? शाखा कोणती? त्याने आम्ही यजुर्वेदी आहोत, असे नुसते सांगितल्याबरोबर पू. काकांनी त्याला तेथेच साष्टांग नमस्कार घातला. कारण, श्रीमाउली देखील यजुर्वेदी होते म्हणून ! पाहा, केवढी निष्ठा होती त्यांची. आणि अशी अपार निष्ठा, असे अनन्य प्रेम असेल तर ती कनवाळू, दयाळू ज्ञानमाउली आपला दिव्य-अलौकिक कृपा-प्रेमपान्हा त्या भक्ताला का बरे पाजणार नाही? भगवान श्रीमाउलींचे ते सतरावियेचे स्तन्य पिऊन आत्मतृप्त झालेले आणि त्या अनुहताचा दिव्य हल्लरु ऐकण्यात निमग्न होऊन राहिलेले प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे म्हणूनच फार फार विलक्षण, नित्य वंदनीय आणि लोकोत्तर विभूतिमत्व होते, यात अजिबात शंका नाही !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( विभूती ग्रंथाची लिंक -
https://www.dropbox.com/s/v6nohpo2lbrt92m/Vibhuti-Full.pdf?dl=0 )
*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***
संतांना कोणाही बद्दल आपला-परका अशीच भावनाच नसते. सगळ्या जीवांविषयी समान प्रेम व तीव्र दयेची भावना त्यांच्या हृदयात भरलेली असते. प. पू. काकांच्याही ठायी हाच प्रेमभाव पुरेपूर होता. या संदर्भात श्री.भास्कर महादेव वेलणकर यांनी त्यांचे मित्र श्री. पत्की यांची एक विलक्षण हकीकत सांगीतली होती. ती उद्बोधक कथा तुम्हां सर्वांनाही नक्कीच भावेल.
चोहो बाजूनी ढासळत अालेल्या, जुन्या वडिलोपार्जित पडक्या घरात श्री. पत्की राहात असत. अत्यंत सरळ मनाचा पण दारिद्र्याने गांजलेला, कसाबसा बायकापोरांचा निर्वाह करणारा हा गृहस्थ बिचारा परिस्थितीने पिचून गेला होता. अंगावर कपडा नीट नाही, घरात खायला अन्न नाही, पण योग्य मार्गदर्शनही नसल्यामुळे पिडलेला असा दिवस कंठीत होता. त्यांचेच घरी माडीवर प. पू. काका काही दिवस आपला नित्याचा हरिपाठही करीत असत; पण पत्की यांचे पूर्वकर्मच आड येत असल्याने, ते कधीही त्या हरिपाठाला हजर राहिले नाहीत. सबब त्यांना प. पू. काकांचा सत्संग सहज शक्य असूनही कधीच लाभला नाही. त्यांचा भोगच संपलेला नव्हता ना!
एके दिवशी परिस्थितीने फारच गांजल्यामुळे ते मनाने आत्यंतिक उदास होऊन, जीव देण्याच्या हेतूने अपरात्री कुरणातल्या विठोबाच्या वाटेने निघाले. किर्रर्र झाडी, काटेकुटे, उजेडाचा मागमूस नाही, विजन रस्ता, अंधारी रात्र, अशा वेळी पत्की जीव देण्यास योग्य जागा शोधत असताना, त्यांचा शर्ट काटेरी कुंपणात अडकल्याचा त्यांना भास झाला. तरीही पत्की पुढे चालू लागताच त्यांच्या लक्षात आले की, आपला शर्ट कोणीतरी मागे ओढत आहे. घाबरून मागे वळून डोळे विस्फारून पाहतात तर प. पू. श्री. गोविंदकाका त्याही अंधारात त्यांना स्पष्ट दिसले. प. पू. काकांना पाहताच ते हादरले. आत्ता या वेळी प. पू. काका इथे कसे? या विचाराने ते गोंधळले. प. पू. श्री. काकांनी त्यांची दारुण स्थिती व मनाचा दुबळेपणा आपल्या सामर्थ्याने जाणला होता. त्यांना आत्महत्येपासून वाचवण्यासाठी, त्या भयाण अपरात्री त्यांच्यावरील अकारण-करुणेने ते स्वत:हूनच तेथे प्रकट झाले होते. वस्तुत: ते प. पू. काकांचे भक्तही नव्हते की त्यांनी त्यांची प्रार्थनाही केलेली नव्हती. पू. काकांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला व अतीव प्रेमळ शब्दांत त्यांना म्हणाले, " अरे वेड्या, हे काय ? असा अपरात्री कोठे निघालास? काहीतरी भलताच विचार मनात दिसतोय तुझ्या! "
पू. काकांच्या त्या आश्वासक शब्दांनी धीर आलेल्या श्री. पत्कींनी आपली भयंकर कर्मकथा अश्रूपूर्ण नयनांनी पू. काकांना निवेदन केली. ती ऐकून पू. काका एवढेच म्हणाले, " आत्महत्या महापातक आहे हे लक्षात ठेव. " आणि दक्षिणेकडे हात करून म्हणाले, " त्या दिशेला जा, तुझे कल्याण होईल !"
पुढे पू. काकांची आज्ञा शिरोधार्य मानून श्री. पत्की त्या दक्षिण दिशेकडील गावास गेले. तेथे त्यांना चांगली नोकरी लागली. नोकरी शेवटपर्यंत निभली. पेन्शन घेऊन आज ते आपल्या मुलाबाळांसह समाधानी जीवन जगत आहेत. भक्तीने समाधी मंदिरातील उत्सवास प्रसादास येतात.
परिस्थितीने गांजलेल्या, रडकुंडीला आलेल्या जिवांचे दैव जाणून, त्यांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचा शाश्वत लाभ करून देण्याची निर्मळ कणव एकमेव साधुसंतानाच असते ! त्यांचा त्यासंदर्भातला संकेत वरवर साधा जरी वाटला, तरी त्यात अफाट दैवी सामर्थ्य असते. पण संतांचा असा कृपाप्रसाद दैवयोगाने प्राप्त होणे व त्यानुसार आपले वर्तन होणे, हे एकाद्याच पुण्यवंताच्या वाट्याला येते आणि तेही श्रीभगवंतांची कृपा झाली तरच !
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450 )
Shri Haripaath Sangaati Kothe milel
ReplyDelete