17 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ****** द्वितीय अध्याय ***


*** द्वितीय अध्याय ***
( कालपासून प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आठ दिवस आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. रोज चरित्रासोबत प. पू. काकांची एक विशेष आठवणही सांगितली जाईल. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )
पहिल्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये इमाने इतबारे सेवा रूजू करत असतानाही पू. काकांच्या चित्तात मात्र खळबळ चालू होती. आपल्या अद्वितीय सेवेमुळे ऐन तारुण्यातच " कैसर ई हिंद " हा त्याकाळातला ब्रिटिश सरकार भारतीयांना देत असलेला सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला हा विख्यात शल्यचिकित्सक, मोठा मान-मरातब आणि पद-प्रतिष्ठा असूनही कुठेतरी अस्वस्थ होता. कारण काही कळत नव्हते, पण त्या दिगंबर साधूच्या वारंवार होणा-या दर्शनातच याचे काहीतरी गूढ लपलेले आहे, हे नक्की जाणवत होते. तोवर नेहमी होणा-या दर्शनाने आपोआपच त्या अनामिक साधूबद्दल चित्तात तीव्र प्रेमाकर्षणही निर्माण होऊ लागलेले होते. अशा परिस्थितीतच पू. काका सुट्टीवर घरी आले.
१९२० सालच्या त्या सुट्टीत प. पू. काकांचे यमाईच्या औंध जवळील पुसेसावळी या गावी काही कामानिमित्त जाणे झाले. तेथील मारुती मंदिरात त्यांना नेहमी दर्शन देणा-या दिगंबर साधुपुरुषाला प्रत्यक्ष पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते बेहद खूश झाले. त्यांना पाहताच जणू जन्मजन्मांतरीची ओळख पटली. त्यांनी त्या दिगंबर अवधूताला प्रेमपडिभराने साष्टांग दंडवत घातला.
ते सावळे दिगंबर साधू म्हणजेच सद्गुरु श्रीकृष्णदेव परीट होत. ते राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील एक अप्रसिद्ध पण फार थोर विभूतिमत्व होते. त्यांची श्रीगुरुपरंपरा अशी होती, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट - श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर - श्रीधोंडीबुवा महाराज, पलूस - श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी. सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज हे निरंतर विदेही स्थितीत राहणारे विलक्षण अवलिया होते. 
सुटा-बुटातील काकांना पाहून ते म्हणाले, हे असले ध्यान इथे नको. प. पू काका काय समजायचे ते समजले व एका भारावलेल्या अवस्थेतच फलटणला परतले. आणि दुस-याच दिवशी, वैभव, घरदार सर्व काही जिथल्या तिथे सोडून, साध्या धोतर-उपरणे अशा वेशात ते श्रीकृष्णदेवांच्या सेवेत रुजू झाले.
त्यांची सेवा करणे हे फार मोठे दिव्यच होते. श्रीकृष्णदेव महाराज उघड्या अंगाने भर दुपारी निखा-याप्रमाणे तापलेल्या वाळूत पडूून राहात, तासन् तास ओढ्याच्या पाण्यात बसून राहात, रात्र रात्र घराच्या वळचणीला पायही न हालवता उभे राहात किंवा फड्या निवडुंगातून लोटांगणे घालीत असत. प. पू. काका देखील न बोलता त्यांच्याचसारखे करीत. लहानपणापासून सुखात वाढलेल्या डॉक्टर उपळेकरांसाठी एवढा मोठा बदल नक्कीच सोपा गेला नसणार. पण म्हणतात ना, ' चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदीं नाचे ॥ ' तीव्र श्रद्धा, आत्यंतिक गुरुनिष्ठा व पक्का निर्धार असल्यानेच डॉक्टर गोविंदराव उपळेकरांनी अलौकिक श्रीगुरुसेवा करून परमार्थात अत्युच्च अवस्था गाठली !
सुरुवातीला एकदा श्रीकृष्णदेवांनी आपले एक उपरणे त्या फड्या निवडुंगावर घातले व म्हणाले, ' माझ्या गोईंदाला सांभाळ बरे ! ' बाकी ते फार काही बोलतही नसत गोविंदाशी. श्रीकृष्णदेव महाराज तसे मौनप्रियच होते. ते सतत आपल्याच आनंदात रममाण होऊन राहात असत. कोणाच्याही घरी जाऊन देतील ते शिळे-पाके अन्न थोडे खात. अवधूती मस्ती पूर्ण अंगी बाणलेला हा महात्मा म्हणजे श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अद्भुत रत्नच होते.
पुसेसावळी गावातील लोकांना परदेशात राहून आलेल्या या डॉक्टरचे फार आश्चर्य वाटे. ते म्हणत की, वेड्या कृष्णा परटाच्या संगतीने या फलटणच्या डॉक्टरलाही बहुदा वेड लागले असावे. पण त्यांना काय कळणार की ते वेड किती अद्भुत होते !
पुसेसावळी येथील काही मोजक्या कुटुंबांमधील लोक मात्र सद्गुरु  श्रीकृष्णदेव व पू. काकांचा अधिकार जाणून होते व त्या दोघांचीही ते जमेल तशी काळजी देखील घेत असत.
श्रीकृष्णदेव महाराजांनी पू. काकांची प्रचंड परीक्षा पाहिली. लोकांनी देवांना विचारावे, " या बामनाला का तरास देताय? " तर श्रीकृष्णदेवांनी उत्तर द्यावे, " हा माझं समदं डबुलं मागतुया ! " खरोखरीच, सद्गुरु श्रीकृष्णदेवांपाशी असलेले शांभव अद्वयानंदवैभवच तर हवे होते ना काकांना  ! पू. काकांनी तीन वर्षे मनापासून सेवा केली सद्गुरूंची. शेवटी ती दयाघन गुरुमाउली प्रसन्न झाली व एकेदिवशी पू. काकांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून श्रीकृष्णदेवांनी आपल्या पर्यंत परंपरेने आलेले स्वामीकृपाधन पू. काकांना बहाल केले. पू. काकाही त्या कृपावर्षावात पूर्णपणे न्हाऊन निघाले, अंतर्बाह्य सुखरूप होऊन ठाकले. सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी " आपणासारिखे करिती तात्काळ । " या संतवचनाची रोकडी प्रचितीच पू. काकांना एका क्षणात अनुभवाला आणून दिली. ये हृदयीचे ते हृदयी प्रतिष्ठापित केले.
पू. काकांनी केलेली गुरुसेवा फार अलौकिक आहे. भगवान श्रीमाउलींनी श्रीज्ञानेश्वरीत मांडलेली गुरुसेवा पू. काकांनी प्रत्यक्ष आचरून दाखवलेली आहे. खूप खडतर आणि अपार निष्ठेचीही कसोटी पाहणारी त्यांची गुरुसेवा खरोखरीच विशेष म्हणायला हवी. त्यावर पुन्हा कधीतरी जरूर सविस्तर लेखन करू. तूर्तास एवढे पुरे.
सद्गुरुकृपेने अंतरात प्रकटलेला बोधदीप जनमानसात आजमावला गेला पाहिजे. नुसते ज्ञान होऊन उपयोगाचे नाही, त्याचे प्रात्यक्षिकही व्हावे लागते; आणि तेही प्रपंचरूप समरांगणावर ! तरच झालेला तो बोध कसोटीवर खरा उतरतो. म्हणूनच की काय, सर्वच संतांना गुरुकृपा झाल्यावर तीर्थाटणाची आज्ञा दिली जात असावी. प. पू. काकांनाही तीच आज्ञा झाली.
पू. काकांवर कृपा करण्याचे आपले भगवत्प्रदत्त कार्य संपन्न झाल्याने आता श्रीकृष्णदेवांची पैलतीराची ओढ बळावली होती. म्हणून श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने श्रीकृष्णदेवांनी भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, दि. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी मध्यान्ही पुसेसावळीच्या ओढ्यात जलसमाधी घेतली. तत्पूर्वीच श्रीकृष्णदेवांनी आपल्या लाडक्या गोईंदाला मुद्दामच फलटणला घरी पाठवून दिले होते. श्रीगुरूंचा सगुण विरह सहन होणे अनन्य शिष्यासाठी फार अवघड असते ना  ! श्रीकृष्णदेवांच्या महासमाधीचे वृत्त फलटणला पू. काकांना समजताच ते बेभान होऊन लोटांगण घालतच पुसेसावळीला निघाले. त्यावेळी माझे आजोबा व पू. काकांचे पुतणे कै. श्रीपादराव उपळेकर त्यांच्या सोबत गेले होते. जवळपास ८० किलोमीटरचे अंतर पू. काकांनी लोटांगणे घालीतच पार केले व ते पुसेसावळीला गेले. श्रीगुरुचरणीं अनन्य होऊन त्यांनी श्रीकृष्णदेवांच्या समाधीवर जे डोके ठेवले ते तीन दिवसांनीच वर पाहिले !
श्रीसद्गुरूंशी त्यांचे काय सुखसंवाद झाले माहीत नाही, पण एका वेगळ्याच अवस्थेत पू. काका रममाण झाले. त्यांनी मन:पूर्वक काहीतरी निर्धार केला व ते त्यादृष्टीने तयारी करू लागले.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( या लेखासोबत प. पू. श्रीकृष्णदेव महाराज व साधकीय जीवनातील प. पू. डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराज (कफनी घातलेले) यांचे प्रख्यात चित्रकार डी. डी. रेगे यांनी काढलेले चित्र. )
*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***
प. पू. श्री. काकांचे निस्सीम भक्त कै. श्री. गो. म. फणसे यांनी सांगितलेली पू. काकांच्या कृपेची एक अतर्क्य हकीकत. आमचा मुक्काम फलटणला असताना प. पू. श्री. काकांचा एक एकनिष्ठ भक्तही तेथे आलेला होता. प. पू. काकांच्या पुढे अत्यंत विनम्र भावाने थोडा वेळ बसून, पू. काकांच्या पायावर बराच वेळ डोके ठेवून, आनंदाश्रू ढाळू लागला. पू. काकांच्या समोरच अत्यंत प्रेमादराने तो आम्हांस उद्देशून बोलू लागला की, प. पू. श्री. काकांच्या कृपेने आज मी तुम्हांस दिसतो आहे. आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो.
तो मग घडलेली हकीकत सांगू लागला. एके दिवशी मी विमानातून प्रवास करत असताना नेमके ते विमान कोसळले. बरेच प्रवासी अपघातात दगावले, पण कसा कोण जाणे मी मात्र वाचलो. माझे सर्व सांधे मोडून हाडांचा जवळपास चुरा झाला होता. माझे मुटकुळे करून पोत्यात घालून लोकांनी हॉस्पिटलमध्ये पोचवले. खूप उपचारांनंतर चार-सहा महिन्यांनी बरा होऊन प. पू. काकांचे चरणी लोटांगण घालण्यास आत्ता मी आलो आहे.
एकमेकांचा परिचय करून देताना कळले की, त्या महान भक्ताचे नाव उद्यावर. ते जुहू विमानतळाजवळच राहात होते.
ते पुढे सांगू लागले, " प. पू. श्री. काका नेहमी सांगत असत की, " श्रीमाउलींचा हरिपाठ कायम खिशात ठेवावा. त्या पावन हरिपाठाच्या नुसत्या सानिध्याने, एवढेच नाहीतर त्याचे नुसते स्मरण जरी झाले तरी श्रीमाउली तुमचा सर्व बाजूंनी सांभाळ करतात." पू. काकांच्या या आज्ञेनुसार माझ्या खिशात कायम श्रीहरिपाठ असतोच. एवढ्या भयंकर अपघातातून वाचलोय म्हणून, थोडा सावध होताच प्रथम हरिपाठ काढून पू. काकांचे फोटोचे दर्शन घेण्याची मला इच्छा झाली. हरिपाठ काढून पाहिला तर त्यातील पू. काकांच्या फोटोवर अनेक पांढऱ्या फुल्या होत्या. ते पाहून मी हादरलोच. डॉक्टर दुपारच्या राउंडवर आल्यावर त्यांना मी हरिपाठातल्या त्या खुणा दाखवल्या व विचारले की, हे कोणी केले? त्या डॉक्टरांनाही तो फोटो पाहून खूप आश्चर्य वाटले व  त्यांनी माझ्या सबंध देहाचे काढलेले ३-४ एक्स रे काढून दाखवले. फोटोतल्या फुल्यांशी ते एक्सरे पडताळून पाहिले व म्हणाले, " अहो उद्यावर, जेथे जेथे तुमचे सांधे मोडले, निखळले, हाडे मोडली होती त्याच ठिकाणी बरोबर फोटोवर फुल्या आहेत. पाहा पडताळून."
मीही मग कुतूहलाने तो फोटो व एक्सरे पाहिले आणि उडालोच. हे कसे घडले असावे? याचा काहीच अंदाज येईना आम्हांला. डॉक्टरांनी मग विचारले की हा फोटो कोणाचा? हे कोण सद्गृहस्थ? तुम्हाला ऍडमिट केले तेव्हा तुमची वाचण्याची किंचितही आशा आम्हां कोणालाही वाटत नव्हती. परंतु आम्ही आमच्या शास्त्राप्रमाणे उपचारांची शिकस्त केली व आठच दिवसात आमच्या आशा पालवल्या. हे कसे घडले? नक्कीच हा फोटो कोणा अवलियाचा आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही असल्या भयंकर संकटातून वाचलेला आहात ! त्यांनीच तुमचे भोग स्वत:वर घेऊन तुम्हांला वाचवलेले दिसते." डॉक्टरांचे ते बोल ऐकून माझे डोळे पाझरू लागले. मी मग प. पू. श्री काकांसंबंधी थोडक्यात सर्व त्यांना सांगितले व त्यांनीच मला वाचवलेे म्हणून खरोखरीच सादर वंदन केले.
आमच्या भाग्यानेच उद्यावरांनी खिशातील तोच  ' हरिपाठ ' काढून आम्हांला दाखवला. त्यात आधी सांगितल्याप्रमाणे प. पू. श्री. काकांच्या फोटोवर ब-याच ठिकाणी पांढऱ्या फुल्या दिसल्या. तो विलक्षण अनुभव पाहून आमच्याही अंगावर झरकन् काटा उभा राहिला व आम्ही देखील पू. काकांच्या चरणीं नतमस्तक झालो.
हे सर्व संभाषण चालू असताना प. पू. श्री. काका मात्र आपल्याच आनंदात, अर्धोन्मीलित नेत्रांनी अनंताचा वेध घेत बसलेले होते. त्यांना आमच्या संवादाशी किंवा चालू असलेल्या त्यांच्या स्तुतीशी काहीही घेणे-देणे नव्हते. भक्तांच्या संकटात धावत जाऊन, पडेल ते कष्ट सोसून भक्ताचे संरक्षण करण्याचा परमकरुणामय प. पू. काकांचा हा जगावेगळा गुणविशेष पाहून आम्ही मात्र कायमचे भारावून गेलो !
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450)

0 comments:

Post a Comment