18 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ****** तृतीय अध्याय ***

*** तृतीय अध्याय ***
(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. रोज चरित्रासोबत प. पू. काकांची एक विशेष आठवणही सांगितली जाईल. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )
सद्गुरु श्रीकृष्णदेवांच्या सगुण विरहाने पू. काकांची अवस्था फार व्याकूळ झाली. पण आंतरिक प्रेरणेने त्यांनी काही निश्चय केला व त्यानुसार ते कामाला लागले. सद्गुरूंच्या समाधीपाशी राहून त्यांनी सेवा तर आरंभलीच, पण अभिनव पद्धतीची. पू. काकांनी आपल्या सद्गुरूंचे चरित्र लिहिण्यास प्रारंभ केला. पुसेसावळीलाच राहून त्यांनी " श्रीकृष्णदेव " हे त्यांचे पहिले पुस्तक लिहून काढले. याला " हरिहर भेट " असेही नाव त्यांनी दिलेले आहे. या साडेचारशे पानांच्या बृहत् ग्रंथात मराठी बरोबरच अतिशय सुरेख इंग्रजी भाषेतूनही पू. काकांनी लेखन केलेले आहे. यात सद्गुरु श्रीकृष्णदेवांचे लौकिक चरित्र तर आहेच पण पू. काकांना आलेल्या दिव्य अनुभूती, त्या अनुभूतींच्या अनुषंगाने त्यांना भावलेले संतांचे अभंग व ओव्या यांचेही संकलन केलेले आहे. वर वर पाहता अतिशय क्लिष्ट वाटेल अशा शैलीतील हे सर्व लेखन, अलौकिक व गूढ अशा अवधूती मस्तीचा परिपाकच म्हणायला हवे. 
या चरित्र लेखनानंतर पूर्वी झालेल्या आज्ञेनुसार पू. काका भारतभ्रमणाला निघाले. सद्गुरु श्रीकृष्णदेवांच्या महासमाधीनंतर, इ.स. १९२४ ते ३३ या दहा वर्षांच्या कालावधीत प. पू. काका अज्ञातवासातच होते. मधूनच ते फलटणला घरी येत असत, पण न सांगताच निघूनही जात. या दहा वर्षांच्या काळात बहुतकरून ते मौनातच होते. त्यांच्यासोबत एक पाटी पेन्सिल असे, वाटले तर त्यावर ते काही लिहून दाखवत असत. आपल्याच मस्तीत, आनंदात ते विचरण करीत असत. त्यांनी ना कुणाला आपले नाव कळू दिले ना मुक्कामाचे ठिकाण. बोलणे झालेच तर ते देखील मुद्दामच असंबद्ध असायचे. त्यामुळे या काळातील त्यांचे अगदी मोजकेच प्रसंग आपल्याला आज ज्ञात आहेत. जे काही प्रसंग बोलता बोलता पू. काकांनीच सांगितले किंवा त्यावेळच्या लोकांनी सांगितले तेवढ्यांचीच फक्त नोंद झालेली आहे.
याच कालावधीतच, १९२८ साली अहमदनगर जवळील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे त्यांची व त्यांचे उत्तराधिकारी शिष्योत्तम पू. बागोबा महाराज कुकडे यांची प्रथम भेट झाली. तो रोमहर्षक प्रसंगही फार विलक्षण आहे, पण त्यावर पू. बागोबांच्या पुण्यतिथी लेखात सविस्तर लिहिलेले असल्याने येथे पुन्हा लिहीत नाही. त्या पुढील वर्षी ते अचानकच पू. बागोबांच्या नगर येथील घरी जाऊन एक दिवस मुक्कामही करून आले. त्यांचा कफनी घातलेला जो फोटो उपलब्ध आहे, तो त्याचवेळी पू. बागोबांनी स्वत: पू. काकांना स्टुडियोत नेऊन काढून घेतला होता. पू. बागोबांवर अनुग्रह मात्र कालांतराने झाला.
या अज्ञातवासात पू. काका हिमालयातही बराच काळ वावरले होते. एके दिवशी त्यांनी, आता आपली कृतकृत्यता झाली, तर हा देह कशासाठी शिल्लक ठेवायचा? असा विचार करून आतुर संन्यास घेऊन हिमालयाच्या एका कड्यावरून उडी मारून देहत्याग करण्याचा मनोमन निश्चय केला. पण श्रीभगवंतांना त्यांच्या हातून अजून कार्य करवून घ्यायचे असल्याने, त्यांना प्रत्यक्ष देहत्याग करताच आला नाही. कारण ते देहत्याग करणार इतक्यात त्या कड्यासमोरच भगवान नर-नारायण प्रकट झाले व त्यांनी पू. काकांना दर्शन देऊन भावी कार्यासंबंधी मार्गदर्शन केले. देहत्यागापासून त्यांना परावृत्त करून शुभाशीर्वादही दिले. पू. काकांना भगवान नर-नारायणांच्या या दिव्य दर्शनाने अतीव संतोष प्राप्त झाला. पू. बागोबा कुकडे यांच्याशी झालेली भेट व श्री नर-नारायणांचे दर्शन या व्यतिरिक्त त्यावेळचा अन्य कोणताही प्रसंग दुर्दैवाने आज आपल्याला ज्ञात नाही. या काळात त्यांनी काय लीला केल्या? कुठे कुठे वास्तव्य केले? कोणा कोणा भक्तांवर कृपा केली? त्यांना त्या परिव्राजक स्थितीत कोणकोणते दिव्य आध्यात्मिक अनुभव आले? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आजमितीस श्रीभगवंतांशिवाय कोणालाही माहीत नाहीत.
इ.स. १९३३ साली प. पू. काका पुनश्च आपल्या कुटुंबासोबत फलटण येथे राहू लागले. त्यांच्या त्या अज्ञातवासाच्या काळात त्यांच्या पत्नी, ती. कै. सौ. रुक्मिणीदेवी तथा मामी यांनी कसे घर चालविले? काय काय परिस्थितीतून, मनस्थितीतून त्या गेल्या असतील ते त्यांनाच माहीत. खरोखरीच एका अवलियाची धर्मपत्नी होण्याचे दिव्य शिवधनुष्य त्यांनी मोठ्या हिमतीने पेलले होते, हे मात्र नक्की. काही काळ हा एकटीने केलेला आयुष्यप्रवास त्यांना सोपा नक्कीच ठरला नसणार. पण त्यांनी ते आनंदानेच सहन केले व तेही प. पू. काकांबद्दल कसलाही किंतू मनात येऊ न देता ! धन्य ती पतिव्रता माउली !!
प. पू. काका हे कुटुंबवत्सल होते. त्यांना प्रथम अपत्य १९१९ साली झाले, त्यांचे नाव कै. माधवराव होते. त्यानंतर त्यांना दोन कन्या व सात पुत्र अशी एकूण नऊ अपत्ये झाली. त्यांतील एक कन्या व भगवान नावाचे एक पुत्र अकालीच मृत्युमुखी पडले. माधवरावांनंतर कै. वसंतराव, कै. प्रभाकर, श्रीमती. प्रमिलाताई, कै. सुधाकर, कै. बाळकृष्ण, श्री. कमलाकर, व कै. शशिकांत अशी अपत्ये झाली. या दहा अपत्यांपैकी आजमितीस कन्या श्रीमती प्रमिला चिटणीस व पुत्र श्री. कमलाकर उपळेकर हे हयात आहेत. पू. काकांची सर्व नातवंडे-पतवंडे त्यांच्याच कृपेने आपापल्या आयुष्यात सुखी आहेत.
प. पू. श्री. काकांचे सुरुवातीला वास्तव्य फलटण गावातील ब्राह्मण गल्लीच्या शेजारील शुक्रवार पेठेत होते. पेठेच्या उतारावर उंच जोत्यावर बांधलेले त्यांचे घर होते. आज त्या ठिकाणी चांगण यांचा फोटो स्टुडियो आहे.
पू. काका कायम आपल्याच आनंंदात, विदेही स्थितीत असत. त्यांचे फारसे घरात, मुलाबाळांकडे लक्ष नसे. ते जेव्हा देहावर असत तेव्हा मात्र घरातील सर्व बाबींमध्ये पू. सौ. मामींना आवर्जून मदत करीत, मुलांना प्रेमाने खेळवत, सांभाळत देखील. याच घरात पू. काकांची सर्वात जास्त लेखनसेवा संपन्न झाली.
पू. काकांनी एकूण ३१ ग्रंथ लिहिले. 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी' हे श्रीमाउलींच्या श्रीज्ञानेश्वरीवरील अडीच हजार पेक्षा जास्त पृष्ठांचे रहस्योद्घाटक विवेचन एकूण १८ खंडांमधून प्रकाशित झालेले आहे. त्याशिवाय, 'सिद्धांत ज्ञानेश्वरी'चे चार खंड, 'सामोपचार परिहार', 'आमोद' व 'ज्योतिज्योती' हे स्फुट निबंधवजा लेखांचे संकलन असलेले तीन लघुग्रंथ; 'हरिपाठ सांगाती', 'नित्यपाठ', 'विभूती', 'श्रीज्ञानेश्वरी मार्गदर्शिका', 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ति' आणि 'श्रीभगवद्ग गीता सुबोधिनी'; असे प्रचंड व सारगर्भ वाङ्मय पू. काकांच्या हातून श्रीमाउलीकृपेने निर्माण झाले. पू. काकांच्या हयातीतच यांपैकी काही ग्रंथांची संस्कृत, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, हिंदी इत्यादी भाषांमधून भाषांतरेही प्रकाशित झालेली होती. पू. काकांनी कोणत्याही ग्रंथाचे कधीच मूल्य घेतले नाही. एवढेच नाही तर, पू. काकांच्या एकाही ग्रंथावर मूल्य छापलेले देखील नाही. प्रत्येक ग्रंथावर " किंमत - अमोल " असेच लिहिलेले आढळेल. त्यामुळे त्यांचे सर्व वाङ्मय विनामूल्य, प्रसाद म्हणूनच वितरित करण्यात आले. कारण, संतांच्या अनमोल वाङ्मयाचे मूल्य लौकिक पैशांमधे कधी होऊच शकत नाही, अशी पू. काकांची ठाम निष्ठा होती. या प्रकाशनाच्या कामी पू. बागोबा कुकडे यांनी फार मोठी सेवा रुजू केली होती. त्याकाळातील दादासाहेब खापर्डे, मोहनदास करमचंद तथा महात्मा गांधी अशा अनेक मान्यवरांपर्यंत पू. काकांचे वाङ्मय पोहोचवण्याची मोठी सेवा पू. बागोबांनी मनापासून केली होती. आजमितीस प. पू. काकांचे दिव्य प्रासादिक सारस्वत आपल्याला उपलब्ध आहे, याचे सर्व श्रेय पू. बागोबा व त्यांच्या इतर सर्व निष्ठावंत सहका-यांनाच जाते. त्यांचे आपल्या सर्वांवरील हे ऋण कधीच न फिटणारे आहे. आता त्या वाङ्मयातील अनेक ग्रंथ अनुपलब्ध असल्याने, त्यांचे स्कॅनिंग करून आम्ही पुन्हा लवकरच विनामूल्य उपलब्ध करून देणार आहोत.
( लेखासोबतच्या छायाचित्रात प. पू. श्री. काका, प. पू. सौ. रुक्मिणीदेवी तथा मामी व प. पू. श्री. गुळवणी महाराज दिसत असून, हे चित्र फलटण येथील पू. काकांच्या श्रीगुरुकृपा वास्तूच्या पायरीवर बसून काढलेले आहे. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***
औदुंबरच्या प. प. श्रीमत् नारायणानंदतीर्थ महाराजांचे शिष्य कै. पू. यशवंतराव मंत्री हे काही काळ फलटणला मामलेदार म्हणून होते. त्यांच्या घराण्यात वारकरी परंपरा होतीच, त्यामुळे संत सहवासाची मनस्वी आवडही होती त्यांना. त्यांच्या तोंडून अनेकवेळा पू. काकांच्या हकीकती मी ऐकलेल्या आहेत. त्यांपैकी ऐकलेली ही एक अद्भुत हकीकत आज त्यांच्याच शब्दांत आपल्यालाही सांगत आहे.
पू. बागोबांनी मला पूर्वीच सांगितल्याप्रमाणे बरोबर मी फलटणला बदलून आलो. ऐकिवात होते की, येथे प्रसिद्धीपराङ्मुख असे एक महान संत प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर राहतात. त्यांना भेटावे म्हणून बऱ्याच वेळा शिपाई पाठवून तपास केला, परंतु उपळेकर काका घरी नाहीत असे वारंवार कळे.
शेवटी संतदर्शनाच्या आंतरिक ओढीमुळे एक दिवस मनाचा निर्धारच केला की, आज त्यांचा पत्ता हुडकून काढायचाच व दर्शन घ्यायचेच. सबब चार-पाच शिपाई पू. काकांना शोधून काढण्यास गावभर पाठविले व खडसावून सांगितले की, आख्खे फलटण पिंजून काढा आणि ' काका ' कोठे आहेत ते मला येऊन सांगा.
एका हुशार शिपायाने हे काम केले व मला धावत येऊन सांगितले की, ' रावसाहेब, काकांसारखे पिवळ्या काठाचे उपरणे पांघरून एक मनुष्य घडसोली मैदानाच्या शेजारी रेव्हिन्यू क्लबच्या पटांगणात एका बाकाखाली झोपला आहे. बहुतेक आपण वर्णन केलेले महाराज तेच असावेत. परंतु डोक्यावरून उपरणे पांघरले असल्यामुळे मला नक्की सांगता येत नाही; तरी आपण ताबडतोब चलावे. '
हे ऐकताच मी धावतच शिपायाबरोबर त्या ठिकाणी पोहोचलो. उपरणे काढले तो प. पू. काकांना पाहून आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. " अशा या ठिकाणी आपण असाल हे फलटणात कितीही शोधले तरी कसे कळणार?" असे म्हणताच पू. काका म्हणाले, " इथे कशाला आलास? भोपळा घ्यायला? चल माझ्याबरोबर गणपतीला !"
लगेच पू. काका उठून बसले व चालू लागले. काका पुढे व मी मागे. मी सहा फूट उंच, चालायला खंबीर तरी प. पू. काकांच्या त्या चालीबरोबर, जणू वाऱ्याचीच ती चाल, मला पळावेच लागत होते.  तडक चालत त्यांनी शेरीतला खडकहि-याचा गणपती गाठला. तो पुरातन स्वयंभू गणपती फलटणच्या एस-टी स्टँडपासून २ कि.मी. लांब, पंढरपूर रस्त्यावर श्रीराम सहकारी साखर कारखानाच्याही पुढे, एका शेतात, बैठ्या दगडी देवळात आहे.
प. पू. काकांच्या मागोमाग धावतच जाऊन श्रीगजाननाच्या देवळाच्या चौथऱ्याजवळ मी पोचलो. त्या श्री गणपतीची पूजा, एक जवळचा गुरव रोज सकाळी येऊन करून जात असे; तो पुन्हा दुसऱ्या दिवशीच येई, त्यामुळे दाराला कुलूपच असे.
प. पू. काका दरवाज्याजवळ जाताच दाराचे कुलूप खळकन् उघडले. मी खाली बघून चपला काढीतच होतो, तोच दार उघडल्याचा आवाज ऐकू आला आणि मी चपापलोच. तेवढ्यात पू. काका म्हणाले,' ये.' मी वाकून देवळाच्या गाभाऱ्यात गेलो तो पू. काका म्हणाले,' बैस.' मी बसलो. पू. काका उभे व त्या पाषाणाच्या शेंदूर थापलेल्या गणपतीला पेढे चारू लागले. त्यावेळी मला कळले की पू. काका रेव्हिन्यू क्लब बाहेर झोपले होते ते उशाशी  पेढ्याचा पुडा घेऊनच.
प. पू. काकांनी आणलेले पेढे गणपतीस चारण्यास सुरुवात करताच, पाषाणाच्या श्रीगणपतीने वरचा व खालचा जबडा उघडून पेढे खाण्यास सुरुवात केली. हे अलौकिक दृश्य पाहताच मला एकदम काही सुचेनासेच झाले. तो दुपारचा चारचा सुमार होता, तो चमत्कार पाहून माझी अक्षरशः समाधी लागली ती सूर्यास्तापर्यंत.
पुढे सूर्यास्तापर्यंत २-३ तास पू. काकांचे गणपतीला पेढे चारणे, पाषाणाच्या गणपतीने ते खाणे व त्यांचा आणखी काय काय सुसंवाद झाला, हे मला काही एक सुतराम कळले नाही. सूर्यास्त होताच पू. काकांनी माझ्या पाठीच्या कण्यावर मानेपासून खालपर्यंत आपला अंगठा फिरवला व माझी ती अनाकलनीय समाधी भंग पावून मी सावध झालो. तेवढ्यात पू. काका म्हणाले, " ऊठ, गणपती महासामर्थ्यवान, आपली इथे बसायची प्राज्ञा नाही. ऊठ !"
ज्या महापुरुषाने पाषाणाच्या गणपतीला पेढे चारले व श्रीगजाननानेही ते अक्षरशः दगडी जबडे उघडून खाल्ले. त्या जागृत दैवतापुढे बसण्याचे आपले सामर्थ्य नाही असे म्हणणाऱ्याची आध्यात्मिक ताकद केवढी अफाट असेल याची तुम्हीच कल्पना करा !
समाधी उतरल्यावर पू. काका ऊठ म्हणाले. पण आश्चर्य असे की, मला उठताच येईना. मग थोड्या वेळाने, पू. काकांच्या कृपादृष्टीनेच कसातरी मी उठून उभा राहिलो.
लगेच पू. काका उद्गारले, ' आता तू पुढे व मी मागे, चला घरी !" निःशब्द शांततेत प. पू. काकांच्या बरोबर मी त्यांच्या घरी आलो. नुकताच पाहिलेला दिव्य प्रसंग आठवून, अवाक होऊन मूक भावाने मी प. पू. काकांचे अश्रूधारांनी चरणक्षालन करून दर्शन घेतले व स्तिमित भावाने पुनःपुन्हा प. पू. काकांच्या त्या पवित्र-मंगल मूर्तीकडे वळून वळून पाहात घरी गेलो. त्यानंतरच्या वास्तव्यात मला अनेकवेळा पू. काकांच्या दर्शनाचा व सेवेचा अनुपम लाभ झाला, ही माझ्यावरची मोठी भगवत्कृपाच आहे, असे मी मानतो. 
कै. पू. यशवंतराव मंत्री दादा यांनी अनुभवलेले पू. काकांचे असे अनेक प्रसंग त्यांच्याच तोंडून ऐकण्याचे सद्भाग्य मला लाभलेले आहे !
(कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450)

0 comments:

Post a Comment