16 Sept 2016

*** त्या गणपतीचे वंदूं चरण ***


परब्रह्मस्वरूप भगवान श्रीगणपती हे ' विलक्षण ' म्हणजे ज्यांचे लक्षण, व्याख्या सांगता येत नाही, असे आहेत. गणपती म्हणजे भगवान शिवांच्या भूत-प्रेत-पिशाच इत्यादी प्रमथ गणांचे प्रमुख. शिवाय तेच बुद्धीचेही पती आहेत. काय योगायोग आहे नाही !
भगवान शिवांचे सर्वच गण हे विक्षिप्त आहेत. भुतेच ती, त्यामुळे शहाणपणा काय तो त्यांना माहीतच नाही. पण त्यांचे प्रमुख श्रीगणेश हे बुद्धीचे अधिपती आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते गण आपल्या अधिपतींच्या आज्ञेनुसार कार्य करतात तेव्हा मात्र ती भुते  असूनही उत्तमच वागतात, शिवभक्तांचे भलेच करतात हे लक्षात घ्या.
या श्रीगणाधिपतींचे तात्त्विक स्वरूप वेगळेच आहे. प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज आपल्या " श्रीदत्तमाहात्म्य " या सर्वांगसुंदर ग्रंथाच्या नमनातील प्रथम ओवीत गणेशांचे हे तत्त्वरूप सुरेखपणे स्पष्ट करताना म्हणतात,
ज्ञानकर्मेंद्रियप्राणगण ।
ह्यांचें करी जो संरक्षण ।
त्या गणपतीचे वंदूं चरण ।
मंगलाचरण हे आमुचे ॥१॥
" डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये; हात, पाय, वाणी, उपस्थ व गुद ही पाच कर्मेंद्रिये व सर्व इंद्रियांच्या प्राणमय देवता हेच खरे ' गण ' असून यांचे संरक्षण करणारे किंवा यांच्यापासून संरक्षण करणारे भगवान श्रीगणेश हेच खरे ' गणपती ' आहेत व त्यांचेच श्रीचरण वंदून आम्ही मंगलाचरण करीत आहोत. " प. प. श्री. टेंब्येस्वामींची ही ओवी फारच बहारीची आहे.
याच संदर्भात प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे  एक फारच मार्मिक बोधवचन आहे. त्याचा विचार केला की प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या वरील ओवीचा व त्याआधी केलेल्या गणपती वर्णनाचा सुंदर समन्वय स्पष्ट जाणवतो. प. पू. मामा म्हणतात, " मन बुद्धिगामी असले की ती बुद्धी विवेकी म्हणावी; पण बुद्धी जर मनोगामी असेल तर ती अंधळी, स्वैर बुद्धी म्हणावी. "
आपली इंद्रिये व मन हेच शिवांचे भूतगण आहेत. ते जर बुद्धीचे अर्थात् बुद्धिपती गणेशांचे अनुगमन करीत असतील तरच त्यांच्याद्वारे होणारे आपले आचरण हे विवेकी ठरेल. पण जर तेच इंद्रियगण मनाचे ऐकून वागतील तर ती भुतेच होत, काय करतील याचा नेम नाही. वेड लागलेल्या अंधळ्या माणसासारखी स्थिती होऊन जाणार आपली.
हीच सर्व प्रक्रिया साधकाच्या हृदयात त्याचे श्रीसद्गुरूच कृपापूर्वक घडवून आणत असतात. त्यांची कृपाच हृदयात विवेकरूप श्रीगणेशांचे प्रकटीकरण करून सर्व इंद्रियांना त्या विवेकाच्या बंधनात बांधते व प्रत्येक क्षणी त्या साधकाकडून मंगल-आचरणच घडवून आणत असते. या संदर्भानेच श्रीज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायातील नमनात भगवान श्रीमाउली श्रीगुरुरूप गणेंद्रांना वंदन करीत आहेत. श्रीगणेश व श्रीगुरु यांचे असे एकत्वच तेथे माउली आवर्जून सांगतात.
श्रीगणेशांना वंदन करण्याचा, त्यांची प्रार्थना करण्याचा हाच मोठा लाभ आहे की, आपल्या चित्तात त्यांच्या कृपेचे द्योतक असणारा विवेक ते निर्माण करतात व त्याच्या बळावर आपली इंद्रिये स्वैर वागणे सोडून उत्तम वागतात आणि तेव्हाच खरे मंगल-आचरण घडते. इंद्रियांचे अंधळेपण घालवून तो प्रसादरूप विवेक त्यांना डोळस करतो.
इंद्रियरूपी भुतांच्या विचित्र वागण्यातून होणा-या दुष्परिणामांपासून आपले संरक्षण करणारे किंवा त्या इंद्रियरूप भुतांचे सम्यक रक्षण करणारे म्हणजेच त्यांना सुयोग्य बुद्धी देणारे श्रीसद्गुरुरूप भगवान श्रीगणेंद्र हे म्हणूनच आपल्या सर्वांसाठी नित्यवंदनीय, नित्यपूजनीय आहेत.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450
http://rohanupalekar.blogspot.in)

0 comments:

Post a Comment