20 Nov 2018

तुळशी सबाह्य हरी पूर्ण - १

तुलसी माहात्म्य - १

भारतीय संस्कृतीमध्ये काही प्रतीके विशेष म्हटली जातात. कारण त्यांचे आध्यात्मिक, लौकिक आणि इतरही असंख्य लाभ आहेत. म्हणूनच या प्रतीकांचा विशेषत्वाने प्रचार-प्रसार केला गेलेला दिसून येतो. त्यांपैकी एक म्हणजे तुलसीवृंदावन होय.
प्रत्येक हिंदू घरासमोर तुळशीचे वृंदावन असणारच. किंबहुना तीच त्या घराच्या हिंदुत्वाची प्रकट निशाणी मानलेली आहे. आपल्या दैवतांमधील सर्वात जास्त लोकप्रिय असणा-या भगवान श्रीविष्णूंची प्रिय पत्नी म्हणून भगवती श्रीतुलसीची घरोघर पूजा केली जाते. त्यातही कार्तिक मासामध्ये या तुलसीपूजनाचे विशेष महत्त्व असते. वैष्णवांच्या दैनंदिन जीवनात, उपासनेत तुलसीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेले आहे.
आजची कार्तिक शुद्ध द्वादशी ही खास तुळशीचीच तिथी मानली जाते. आज घरोघर तुलसीविवाह संपन्न होत असतो. कार्तिक द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या चार दिवसांमधील कोणत्याही एका दिवशी तुलसीविवाह करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणून या चार दिवसांमध्ये आपण विष्णुप्रिया भगवती श्रीतुलसीचे माहात्म्य यथाशक्ती जाणून घेऊ या व रोज तुलसीचे पूजन करून अगदी थोडक्या प्रयत्नांतच विष्णुकृपा संपादन करू या !
आपल्या पुराणांमध्ये व संतांनी देखील भगवती श्रीतुलसीचे माहात्म्य मनापासून गायलेले आहे. पुराणांत तुलसीच्या दोन कथा येतात. एक कथा शंखचूड-तुलसीची तर दुसरी कथा जालंधर-वृंदा यांची. दोन्ही कथा रूपक कथाच असाव्यात असेच वाटते. त्यातील तपशीलात मी आत्ता पडत नाही. मी येथे श्रीविष्णुपत्नी भगवती तुलसीचेच माहात्म्य भक्तिभावाने मांडणार आहे.
श्रीमद् देवीभागवतात अनुत्तरभट्टारिका भगवती श्रीराधाजींनी आपल्या काही प्रमुख विभूती कथन केलेल्या आहेत. यामध्ये भगवती श्रीतुलसीची गणना केलेली आहे. म्हणूनच आम्ही वैष्णव-वारकरी लोक भगवान श्रीकृष्णांची अतीव प्रिय पत्नी असणा-या भगवती श्रीतुलसीला सदैव वंदन करतो, नित्यनेमाने तिचे पूजन करतो व तिच्या पवित्र पानांनी भगवंतांचे अर्चन करतो. आम्हांला यात अत्यंत समाधान व आनंद मिळतो. तसेच त्याचे असाधारण पुण्यही मिळतेच, ते वेगळे.
तुलसीपत्र हे समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्याकडे काहीही समर्पण करायचे झाल्यास त्यावर "तुलसीपत्र ठेवले" असेच म्हटले जाते आणि प्रत्यक्षात तुलसीपत्र ठेवलेही जाते. भगवती तुलसीने जसे श्रीभगवंतांना सर्वस्वाचे समर्पण केले, तसेच आम्हीही करतो आहोत, हाच त्यामागे उदात्त भाव असतो. यासाठीच तर वारकरी आपल्या गळ्यात तुळशीची माळ धारण करतात. आपल्याला सर्वात प्रिय असणा-या देहावर तुलसीमाळ धारण करून आम्ही हा देहही श्रीभगवंतांनाच अर्पण केला आहे, हीच त्यातली खरी भावना असते. नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवले नाही तर भगवंत तो स्वीकारत नाहीत, अशी आपल्याकडे मान्यता आहे. तुळशीच्या आरतीत स्पष्ट म्हटले आहे, "तव दलविरहित विष्णु राहे उपवासी ।"
फार पूर्वीपासून मृत्यूसमयी मुखात तुलसीपत्र व गंगाजल घालण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. तुलसी व गंगा या दोन्ही श्रीभगवंतांच्या विभूतीच आहेत, त्यांच्या पवित्र स्पर्शाने मृत्युनंतरची गती चांगली व्हावी, मोक्षलाभ व्हावा हा त्यामागचा पावन उद्देश आहे. सांगायचा मुद्दा हा की, आम्हां हिंदूंचे भावविश्व व लौकिक विश्वही तुळशीने असे भरपूर व्यापलेले आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवती श्रीतुलसीचे माहात्म्य व उपासनापद्धत सांगताना श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
तुळशी पाहतां आपोआप ।
सहज जाय पापताप ॥१॥
तुळशी सेवा रे जननी ।
जे पढिये जनार्दनी ॥२॥
करितां प्रदक्षणा मनें ।
भवरोगा उपशमन ॥३॥
मुळीं निक्षेपितां जळ ।
कळिकाळा सुटे पळ ॥४॥
जिचे लागतां सिंतोडे ।
कर्माकर्म समूळ उडे ॥५॥
भावें करितां पूजन ।
भगवंतीं होय समाधान ॥६॥
मुळी मृत्तिका कपाळीं ।
जन्ममरणा होय होळी ॥७॥
सेवी एका जनार्दन ।
तुळशी सबाह्य हरी पूर्ण ॥३४०७.८॥

नाथ महाराज म्हणतात, "भगवती तुलसीचे दर्शन झाले तरी पाप व ताप नष्ट होतात. म्हणूनच सज्जनहो, मनोभावे तुलसीचे पूजन करा, कारण तेच भगवान श्रीजनार्दनांना अतिशय आवडते. तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने भवरोगाचेही उपशमन होते. तुळशीच्या मुळात पाणी घातल्याने कळिकाळही पळ काढतो. तुळशीची कृपा झाल्यास कर्माकर्माचे बंधनही नष्ट होते. मनोभावे तुलसीचे पूजन केल्यावर भगवान श्रीकृष्णांना समाधान होते. तुळशीच्या मुळातली माती देखील इतकी पवित्र होते की ती माती कपाळी धारण केल्यास आपल्या जन्ममरण परंपरेचेच उच्चाटन होते. एवढे सर्व लाभ असल्याने श्रीसंत एकनाथ महाराज अंतर्बाह्य हरिरूप असलेल्या भगवती श्रीतुलसीची प्रेमाने सेवा करतात !"
आपणही आजच्या पावन दिवसापासून मनोभावे श्रीतुलसीचे पूजन, वंदन व सेवा करून धन्य होऊ या ! घरात तुलसी वृंदावन किंवा गॅलरीत तुळशीची कुंडी नसेल तर आजच्या आज जाऊन घेऊन यावी व सेवा सुरू करावी. तुळशीचे रोप लावण्याचेही स्वतंत्र पुण्य शास्त्रांनी सांगितलेले आहे आणि आजच्या कार्तिक द्वादशीपेक्षा दुसरा उत्तम मुहूर्त नाही त्यासाठी ! आजपासून आपण सर्वांनी दररोज सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला पाणी घालून, एक फूल वाहून पूजन व प्रेमाने वंदन करण्याचा छोटासाच, पण अतीव प्रभावी नियम करायला काय हरकत आहे ? हा नियम छोटासाच असला तरी तेवढ्यानेही भगवान श्रीकृष्णांची कृपा लाभते. अगदी थोडक्या कष्टात मिळणारा हा महालाभच आहे !!
( क्रमश: )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment