8 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव - लेखांक - ३


श्रीसद्गुरूंनी करुणाकृपेने दिलेली साधना प्रेमाने व नेमाने करू लागल्यानंतर प्रथम त्या साधकाला विवेकाची दीपावली अनुभवायला मिळते. विवेक जागल्याने त्याचे साधनही उत्तमरित्या सुरू होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणत असत की, "श्रीसद्गुरु केवळ, 'पहाटे साधनेला बसत जा !' एवढे एकच वाक्य सांगून त्या शिष्याचे सगळे आयुष्यच बदलून टाकतात." फार यथार्थ आणि अर्थपूर्ण वाक्य आहे हे. पहाटे उठायचे म्हणजे रात्री लवकर झोपले पाहिजे, त्यासाठी वेळेवर जेवले पाहिजे. सर्व कामांचे नियोजनही त्याबरहुकूम करायला हवे. म्हणजे आळस घालवावा लागणार, वेळच्यावेळी सगळी कामे उरकावी लागणार. त्यात धसमुसळेपणा करता उपयोगी नाही, नाहीतर अजून कामे वाढणार. म्हणजे वागण्या-बोलण्यात नियमितपणा, कौशल्य आणावे लागणार. एका दगडात पाहा त्यांनी किती गोष्टी सुधारल्या आपल्या. या सगळ्या प्रक्रियेलाच श्री माउली 'विवेकाची दीपावली' म्हणतात.
काल आपण पाहिलेल्या ओवीत माउली म्हणतात की, सूर्य पूर्वेला उगवला तरी त्याचवेळी इतरही दिशांचा अंधार नष्ट होतोच. तसे श्रीसद्गुरूंची कृपा होऊन साधन मिळाले की आपल्या इतरही गोष्टींमध्ये सुधारणा होते. अवगुणांचा काळा अंधार त्या कृपामय विवेकदीपाच्या सोनप्रकाशात हळूहळू संपूर्ण नष्ट होतो.
विवेकाचा एक जीवश्चकण्ठश्च मित्र देखील अखंड त्याच्या बरोबरच असतो. ते दोघे एकमेकांना कधी सोडतच नाहीत. त्या मित्राचे नाव आहे वैराग्य ! यांची कायम जोडगोळीच असते. विवेक आला की पाठोपाठ वैराग्य येतेच.
वैराग्य म्हणजे आपले ध्येय जो आत्मसाक्षात्कार, त्याच्या प्राप्तीच्या आड येणा-या प्रत्येक गोष्टीबद्दल तिरस्काराची किंवा उदासीनतेची भावना. जी गोष्ट आपल्या ध्येयाच्या विरुद्ध असेल ती प्रत्येक गोष्ट प्रयत्नपूर्वक व निर्धाराने पूर्णपणे टाळायला हवी. यासाठी आधी आपले ध्येयच आपली priority व्हावी लागते. हे कठीण काम प्रत्यक्षात येण्यासाठीचे जे धैर्य आणि खंबीरपणा लागतो, तो या विवेकयुक्त वैराग्यामुळेच लाभतो.
वैराग्य म्हणजे घरदार, बायकापोरे सोडून अंगाला राख फासून जंगलात जाणे नव्हे. वैराग्य ही आतून येणारी भावना आहे, ती केवळ प्रयत्नाने साध्य होत नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर, वैराग्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मर्यादेत व सयुक्तिक उपभोग घेण्याची भावना. फार मिळाले म्हणून माज नको नि हातचे गेले म्हणून रडारड नको ; इतपत वैराग्य बाणले तरी त्याचा खूप फायदा होतो. आणि श्रीसद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेच्या योगाने हळूहळू असे वैराग्य आतूनच दृढ होत जाते. हे वैराग्यच आत्मलाभाचे भाग्य सोबत घेऊन येते, असे माउलींनी म्हटलेले आहे. म्हणूनच ते या वैराग्याला अध्यात्ममार्गातला सर्वात विश्वासू सखा म्हणतात. विवेकाच्या दीपोत्सवाचा प्रकाश असा वैराग्य-तेजाने भारलेला असतो. हे साधनेच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
या कृपाजन्य विवेक आणि वैराग्यामध्ये साधनेने जसजशी वाढ होऊ लागते, तसतशी अधिकाधिक समाधानाची प्राप्ती होते. समाधान जेव्हा आपल्या चित्तात दृढ होते, तेव्हा तेथून इतर सर्व दोष काढता पाय घेतात. श्री गोंदवलेकर महाराज म्हणूनच म्हणतात की, "रामराया समोर प्रकट होऊन वर माग म्हणाला तर आपण समाधानच मागावे. गाय आली की तिचे वासरू न बोलावता मागे येतेच. तसे समाधान आले की बाकी सगळे आपोआप येते !" समाधान म्हणजे भगवंत ठेवतील त्या स्थितीत आनंदाने राहणे होय. यातूनच मग साधकाच्या चित्तात शरणागती दृढ होऊ लागते.
अशाप्रकारे आपली साधना हीच जेव्हा आपले सर्वस्व होते, तेव्हा मग भगवंतही त्या साधकाच्या प्रेमभाग्याने त्याच्याकडे ओढले जातात आणि त्याच्या त्या शुद्ध अंत:करणात स्वत: प्रकट होतात. त्यावेळी त्या भाग्यवंत साधकाला खरी ज्ञान-दीपावली अनुभवाला मिळते.
( http://rohanupalekar.blogspot.in )
सद्गुरु श्री माउली या विवेक-दीपोत्सवाचे सुंदर वर्णन करताना म्हणतात,
मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी ।
निरंतर ॥ ज्ञाने.४.८.५४॥

त्या शरणागत शिष्याच्या अंत:करणात सद्गुरुकृपेने उजळलेल्या विवेकदीपावर साचलेली कर्मजन्य अविवेकाची काजळी प्रत्यक्ष भगवंतच मग स्वत: दूर करून, त्याचा तो विवेकदीप लख्ख पेटवतात. खुद्द भगवंतांनीच अशी कृपा केल्यावर तो साधक, साधकत्वाची सीमा ओलांडून योग्याच्या स्थितीला प्राप्त होतो. त्याचा भगवंतांशी भाव-संयोग होऊन तो निरंतर ज्ञान-दीपावली साजरी करू लागतो. त्याचा तो विवेकदीप अक्षय बोध-तेजाने अखंड प्रकाशमान होऊन त्या योग्यालाही सर्वार्थाने अंतर्बाह्य तेजोमय करतो. या स्थितीतून मग तो पुन्हा कधीच मागे येत नाही. तो भगवंतांशी एकरूपच होऊन राहतो.
साधकत्वातून योग्याच्या स्थितीत पदार्पण करणे ही त्यावेळी त्या शिष्यासाठी एका नवीन जीवनाची प्रसन्न सुरुवातच असते. हेच त्याच्यासाठी दिवाळीच्या पाडव्याला सुरू होणारे नवीन वर्ष म्हणायला हवे.
दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत्सराची वर्षप्रतिपदा असते. श्रीसद्गुरुकृपेने प्रपंचाचा, जन्म मरणाचा 'आवर्त-क्रम' सोडून तो शिष्य 'त्रिविक्रम' भगवंतांच्या राज्यात साधनेच्या 'विक्रमी' यशासह प्रवेश करतो आणि ब्रह्मानुभूती लाभून अखंड सुखी होऊन जातो. त्याच्यासाठी मग दिवाळी हा चार दिवसांचा वेगळा सण न राहता, त्याचे अवघे जीवनच नित्यसुगंधी व महन्मंगल असा दीपोत्सव होऊन ठाकते. तो स्वत:च ब्रह्मानंदाचा अक्षय रत्नदीप होऊन निरंतर आनंदात रममाण होऊन जातो. अशा योग्याच्या तेजप्रकाशात इतरही जीवांना मग सुखाने मार्गक्रमण करता येते. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींना अभिप्रेत असणारा हाच तो "ज्ञान-तेजोत्सवा"चा तिसरा आणि महत्त्वाचा दीपोत्सव होय !!
बलिप्रतिपदा ही भक्तश्रेष्ठ असुरसम्राट बलिराजाच्या नावाने साजरी होणारी तिथी आहे. बलिराजासाठीच भगवान श्रीवामनांचा अवतार झाला. त्या वामनरूपातील श्रीभगवंतांनी बलिराजाकडे तीन पावले जमीन मागितली. बलीने देतो म्हटल्यावर त्यांनी एका पावलात सारी पृथ्वी म्हणजेच मृत्युलोक, दुस-या पावलात आकाशातील संपूर्ण चराचर सृष्टी अर्थात् स्वर्गादी लोक व्यापले. आता तिसरे पाऊल ठेवणार कुठे ? जागाच शिल्लक नव्हती. तेव्हा भक्तराज बलीने नम्रपणे आपले मस्तक झुकवले व तो भगवंतांना पूर्ण शरण आला. अशी त्याची शरणागती पूर्ण झाल्याबरोबर परमकनवाळू श्रीभगवंतांनी त्याच्यावर आपल्या श्रीचरणाचेच दिव्य कृपाछत्र घातले. परमपावन हरिपादपद्म मस्तकी पडल्याबरोबर, बलिराजा आपली मूळची असुरभावरूप काजळी आणि जीवभावच नष्ट झाल्याने अंतर्बाह्य हरिमयच होऊन ठाकला. सद्गुरु श्री माउली या तिस-या ओवीतून हीच तर प्रक्रिया सांगतात. ज्याक्षणी साधकाची शरणागती पूर्ण होते, त्याच क्षणी श्रीभगवंत त्याच्या ठायी असणारी सर्व प्रकारची काजळी नष्ट करून, त्याच्या चित्तात अपूर्व बोधाची दीपावली प्रकट करतात. त्याबरोबर तो साधक जीवत्वाची मर्यादा कायमची ओलांडतो व त्याचा श्रीभगवंतांशी संयोग होऊन तो योगी अवस्थेला प्राप्त होतो. पुन्हा कधीच तेथून त्याचे पतन होत नाही.
भगवान श्रीवामनांनी तीन पावलात सर्व व्यापले म्हणून त्यांनाच 'त्रिविक्रम' म्हणतात. या तिस-या दीपोत्सवाचे औचित्य पाहा ; श्रीभगवंत देखील साधकाचे सर्वस्व या साधकीय जीवनातील तिस-या दीपोत्सवातच व्यापतात. याही अर्थाने ते त्रिविक्रम म्हटले जात असतील का ? त्यांची लीला खरोखरीच अनाकलनीय आणि अद्भुत असते, हेच खरे !
साधकाचे असे अंतर्बाह्य योगी होणे, हाच भगवान सद्गुरु श्री माउलींना अभिप्रेत असणा-या "ज्ञान-तेजोत्सवा"चा तिसरा दीपोत्सव आहे !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment