6 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव - लेखांक - १



नमस्कार सुहृदहो,
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुम्हां-आम्हां भारतीयांसाठी दीपावली हा सर्वात मोठा आणि आनंद उत्साहाने मुसमुसणारा, सगळ्यांना हवाहवासा वाटणारा सण आहे. या सणाचा उत्साह आणि आनंद काही औरच असतो.
आपल्या संतांनी देखील या सणाचा आपल्या वाङ्मयातून वारंवार संदर्भ देत यावर फार सुंदर चिंतन मांडलेले आहे. "विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी ।" म्हणणारे संत या सणाच्या प्रतीकांमधून फार सुरेख विचार मांडतात. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी तर बहारच केलेली आहे. त्यांनी श्रीज्ञानेश्वरीत एकूण चार ओव्यांमध्ये दिवाळीचा उल्लेख केलेला आहे. या चारही ओव्यांमधून माउलींना अभिप्रेत असणारा दिवाळीचा अर्थ "ज्ञानाचा प्रकाशोत्सव" हाच असला, तरी तेवढ्याच सीमित अर्थाने माउली कधीच बोलणार नाहीत. त्यांमधून अर्थाच्या असंख्य सूक्ष्म छटा अत्यंत अप्रतिमपणे त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत.
या चारही ओव्या जरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भांनी आलेल्या असल्या, तरी त्यांची एका विशिष्ट क्रमाने मांडणी केली की, त्यातून साधकाचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास फार सुंदर रितीने उलगडतो. त्या त्या साधकीय स्थितीतील दीपावली माउलींनी खास त्यांच्या विशेष शैलीत त्या चार ओव्यांमधून मांडलेली आहे. आजपासून या दीपावलीच्या पावन पर्वावर आपण माउलींच्याच कृपेने, त्यांना अभिप्रेत असणारा हा "ज्ञान-तेजोत्सव" यथामती सविस्तर अभ्यासून एक अनवट पद्धतीची दीपावली साजरी करू या !!
( http://rohanupalekar.blogspot.in )
आपल्या मूळच्या परब्रह्मस्वरूपाची विस्मृती हेच अज्ञान बळावल्याने, परब्रह्माचाच अंश असणारा जीव स्वत:ला बद्ध समजून बसतो आणि कर्माचा अहंकार धरून प्रपंचाच्या, जन्म-मरणाच्या चक्रात अडकून पडतो. जेव्हा त्याची कर्मसाम्यदशा येते, तेव्हा त्याला आपोआपच आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागते. महद्भाग्यने निर्माण झालेल्या त्या सदिच्छेचा परिणाम म्हणून, त्याला जमतील, सुचतील तसे यथामती प्रयत्नही तो मनापासून करू लागतो. जसजसा त्याचा तो निर्धार व श्रद्धा बळावते, तशी श्रीभगवंतांना त्याची दया येते व त्यामुळे त्याच्या पूर्वपुण्याईचे आणि भगवत्कृपेचे फळ म्हणून त्याला सद्गुरु भेटतात व त्याच्यावर कृपा करून त्याला दिव्यनाम देतात. त्यामुळे तो बद्ध जीव मोक्षेच्छेने मुमुक्षू होतो व सद्गुरुकृपेने तोच 'साधक' या स्थितीला प्राप्त होतो.
अशा साधकासाठी, श्रीसद्गुरूंनी दिलेले कृपायुक्त नाम हीच ज्ञानाची दिवाळी असते, कारण ते नामच त्याच्या अंत:करणात पहिल्यांदा साधनेच्या रूपाने अगदी छोटा का होईना, पण आत्मज्ञान-प्रकाशच निर्माण करीत असते. त्याच्या चित्तातील अज्ञानरूपी नरकासुराचा भगवंतच श्रीसद्गुरुरूपाने वध करून तेथे अपार करुणेने नामबीज पेरून कृपा-दीप लावतात. साधकासाठी हीच नरकचतुर्दशी होय !
या अतिशय दुर्लभ असणा-या व परमभाग्यानेच घडणा-या प्रक्रियेविषयी भगवान श्री माउली म्हणतात,
सूर्यें अधिष्ठिली प्राची ।
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥ज्ञाने.१५.०.१२॥

"ज्याप्रमाणे पूर्वदिशेला सूर्य उगवला की अवघ्या जगाला प्रकाशाचे राज्य प्राप्त होते, त्याप्रमाणे सद्गुरुमुखातून प्राप्त झालेल्या कृपायुक्त नामाच्या श्रवणाबरोबर शरणागत शिष्याच्या अंत:करणात ज्ञानाचे लक्ष लक्ष दीप उजळतात, त्याच्याठायी जणू बोधाची दिवाळीच बहराला येते."
श्री माउलींनी आपल्या एका नामपर अभंगातही या नामसाधनेलाच 'दिवाळीचा सण' असे संबोधले आहे. ते म्हणतात,
यश कीर्ती वानू नेणे मी वाखाणू ।
रामकृष्ण आम्हां सणु नित्य दिवाळी ॥१॥

"सद्गुरुप्रदत्त नामस्मरण त्यांनी सांगितलेल्या युक्तीनुसार करणे हे आमच्यासाठी अखंड दिवाळीचा सण नित्य निरंतर साजरा केल्यासारखेच आहे", असे माउली स्वानुभवपूर्वक सांगतात.
श्रीसद्गुरुकृपेने दिव्यनामाची प्राप्ती होणे, हा भगवान श्री माउलींच्या "ज्ञान-तेजोत्सवा"चा पहिला दीपोत्सव आहे !
असा अलौकिक दिव्यनामदीप उजळल्यामुळे, त्या अपूर्व प्रकाशाने शिष्य-हृदयात काय काय स्थित्यंतरे घडतात ? हेही माउली सविस्तर सांगतात. ते आपण उद्याच्या चिंतनात त्यांच्याच करुणाकृपेने पाहू या !!
*लेखक - रोहन विजय उपळेकर*
*भ्रमणभाष - 8888904481*

0 comments:

Post a Comment