21 Nov 2018

तुळशी सबाह्य हरी पूर्ण - २

तुलसी माहात्म्य - २
कार्तिक मासात भगवती श्रीतुलसीचे खूप माहात्म्य मानलेले आहे. संपूर्ण कार्तिक महिनाभर जर श्रीतुलसीची दररोज सकाळी पूजा केली व सायंकाळी तुळशीत दिवा लावला आणि रोज नियमाने एक तुळशीचे पान भगवान श्रीविष्णूंना वाहिले तर दहा हजार सालंकृत गायी दान केल्याचे पुण्य लाभते असे शास्त्र सांगते. केवढे मोठे फळ आहे पाहा या छोट्याशा व्रताचे. अर्थात् श्रद्धा व प्रेमभाव खूप महत्त्वाचा आहे यात. मनात जर शंका आली तर सगळेच मुसळ केरात जाते. म्हणून नि:शंक मनाने व प्रेमाने अशी उपासना केली तर त्याचे सुयोग्य फळ मिळतेच मिळते.
तुळस ही सर्व पुष्पमयी मानलेली आहे. इतर कोणतेही फूल नसले पण पूजेत तुळशीचे एक पत्र जरी वाहिले तरी सर्व फुले वाहिल्यासारखेच असते. तुळस ही श्रीभगवंतांची प्रिय पत्नी आहे व देवताही आहे. त्यामुळे स्नान झाल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय तुळशीची पाने कधी तोडू नयेत. तसेच तुळस तोडताना नख न लावता तोडावी. तुळस कधी तोडू नये, यावर शास्त्रांनी बरेच नियम सांगितलेले आहेत, पण कमीतकमी द्वादशीला तरी कधीच तुळस तोडू नये.
तुळशीच्या झाडाची सेवा करण्याचेही स्वतंत्र पुण्य सांगितलेले आहे. स्वधर्माचे स्वरूप असणा-या सात्त्विक यज्ञाचे विवरण करताना सद्गुरु श्री माउली म्हणतात,
प्रतिपाळ तरी पाटाचा ।
झाडीं कीजे तुळसीचा ।
परि फळा फुला छायेचा ।
आश्रय नाहीं ॥ज्ञाने.१७.११.१८३॥

सात्त्विक निरपेक्ष कर्म कसे असते ? तर तुळशीच्या सेवेसारखे. फळ, फूल किंवा सावली असले काहीही मिळत नसले तरीही आपण मनोभावे तुळशीची सेवा करतो, तिला अगदी राजेशाही थाटात वाढवतो. येथे श्री माउलींनी तुळशीच्या सुयोग्य सेवेची जणू पद्धतच सांगून ठेवलेली आहे. जो अशी निष्काम भावनेने तुळशीची सेवा करतो त्याला सात्त्विक याग केल्यासारखेच महापुण्य लाभते, असेच त्यांना येथे सांगायचे आहे.
तुळशीचे रोप लावणे, त्याची नीट निगा राखणे, वेळच्या वेळी तुळशीच्या वृंदावनाची (कुंडीची) स्वच्छता करणे, तुळशीपाशी सडा टाकून रांगोळी घालणे, तुळशीची पूजा करणे, तुळशीत दिवा लावणे, तुळशीला यथाशक्य प्रदक्षिणा घालणे व नाम घेत तुलसीपत्रांनी श्रीभगवंतांचे अर्चन करणे ; हे सर्व तुळशीच्या सेवेचेच भाग आहेत. हे करताना मनातल्या मनात श्रीभगवंतांचे नाम घेणे अपेक्षित आहे. या सेवेने साक्षात् श्रीभगवंतांना संतोष होतो, असे संतांनी स्वानुभवाने सांगून ठेवलेले आहे. बरं, हे सर्व करायला खूप वेळ लागतो का प्रचंड पैसे खर्च होतात ? काहीच नाही. अगदी थोडक्या वेळेत व थोडक्या कष्टांत हे सहज जमणारे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनातही नक्की जमू शकणारी ही उपासना आहे आणि मनापासून व प्रेमाने केल्यास ती अलौकिक लाभ देणारीच आहे. ( नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या *जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा* या ग्रंथातील "होईल आघवा तुका म्हणे आनंद" व "अती आदरें शुद्ध क्रीया धरावी" या दोन प्रकरणांमध्ये अशा सहजसोप्या 'लाभाच्या उपायां'ची सविस्तर चर्चा केलेली आहे. जिज्ञासूंनी ते आवर्जून पाहावे ही विनंती.)
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवती श्रीतुलसीच्या कृपेने साक्षात् श्रीभगवंतांची प्राप्ती होते, असे पुराणांत म्हटलेले आहे. तुळशीचे एक विशिष्ट व्रत करूनच भगवती श्रीराधाजींना श्रीकृष्णांची भेट झाली होती. आत्ताच्या काळातही प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांनी हे कठीण पण प्रभावी व्रत केले होते व त्यांना त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार झाला होता. या व्रताबद्दल प.पू.सौ.शकाताई आगटे यांनी आपल्या *मुंगी उडाली आकाशीं* या ग्रंथात सविस्तर सांगितलेले आहे. आश्विन पौर्णिमेला सुरू करून वैशाख कृष्ण प्रतिपदेपर्यंत हे व्रत करतात. प्रत्येक महिन्यात शुद्ध जल, दूध, पंचामृत, तसेच ऊस,आंबा, द्राक्ष अशा विविध फळांचा रस यांपैकी एका पदार्थाने तुलसीचे सिंचन करतात, विशिष्ट प्रकारे पूजा करतात व शेवटी या व्रताचे उद्यापन करतात. हे व्रत विधिपूर्वक केल्यास तुलसीच्या कृपेने त्याचे अत्यंत अद्भुत फळ मिळते. पू.सौ.ताई पुढे म्हणतात, "हे व्रत करायला समजा नाही जमले तरी तुलसीची पूजा करावी, तिला पाणी घालावे, तिच्यापुढे दीप लावावा व मन:पूर्वक नमस्कार करावा. तरी देखील श्रीभगवंत प्रसन्न होतात ; एवढी तुळस त्यांना प्रिय आहे !
तुळशीचे आणखी एक महत्त्व आहे. आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा त्यावर तुळशीचे पान ठेवतो. त्याचा अर्थ, "अत्यंत शुद्ध चित्ताने हा नैवेद्य आपल्याला अर्पण करीत आहे. त्याचा कृपावंत होऊन आपण स्वीकार करावा !" असा होतो. तुळशीच्या ठिकाणी सर्व दोषांचे हरण करण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. तेव्हा नैवेद्यात असलेले दोष तिने नाहीसे करावेत; व तिसरे म्हणजे, तुळस श्रीभगवंतांना जेवढी प्रिय आहे, तेवढ्याच प्रेमाने त्यांनी हा नैवेद्य ग्रहण करावा ; अशी भावना आहे.
मनुष्य मेल्यावरही आपण त्याच्या तोंडात तुळशीचे पान ठेवतो. कारण तुळशीच्या आशीर्वादाने तरी त्याचे कल्याण व्हावे, यमदूतांनी त्याला न नेता विष्णुदूतांनी त्या जीवाला न्यावे, असा त्यामागे उद्देश असतो. ह्या तुळशीचे एकंदरच उपासनेच्या प्रांतात फार महत्त्व आहे."
प.पू.सौ.ताईंनी पुढे एक प्रत्यक्ष घडलेली कथा सांगितली आहे. तुळशीमाळ गळ्यात असल्याकारणाने एका व्यापा-याला मृत्युनंतर यमदूतांनी न नेता विष्णुदूतांनी नेले होते. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य या ग्रंथात श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या 'अदृश्यदीपिका' या ग्रंथात नोंदलेली एक सत्यघटना सांगितलेली आहे. त्यातही दररोज तुलसीची पूजा करणारा व भगवन्नाम घेणारा तो रिसालदार घोड्याने लाथ मारून उडवल्याने तुळशी वृंदावनावर पडल्यावर त्याला विष्णुदूतांनी नेल्याचे वर्णन आहे. म्हणजे तुळशीच्या पूजनाने, स्पर्शानेही असे अद्भुत लाभ होतात. म्हणूनच वारकरी संप्रदायात तुळशीची माळ मोठ्या प्रेमादराने गळ्यात वागवायची, तुळशीची सेवा करण्याची परंपरा संतांनी अवलंबिलेली दिसून येते.
एकूण काय, आपणही दररोज न चुकता व प्रेमाने श्रीतुलसीची जशी जमेल तशी सेवा करायला हवी ! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणूनच सांगतात की,
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें ।
देवाच्या पूजनें । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण ।
व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥तु.गा.६२०.३॥

भगवती श्रीतुलसीच्या सेवेचे हे अत्यंत सहजसोपे पण महालाभदायक उपायही जर आपण नाही केले तर आपण करंटेच ठरू ! तेव्हा आता श्री समर्थांच्याच शब्दांत सर्वांना प्रेमाने विनवितो, येथें आळस करूं नका । विवेकीहो ॥दा.बो.१२.१.१॥
( क्रमश: )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment