9 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव - लेखांक - ४


श्रीभगवंतांशी एकरूपत्व झाल्यावरही अनन्यभक्तांचे भक्ती करणे काही सुटत नाही. त्या जगावेगळ्या भक्तिसुखाला लाचावलेले भक्त अद्वैत स्थितीला विघ्नच मानतात. मग भगवंतांशी एकरूप झालेले ते योगी पुन्हा द्वैताची कल्पना करून आपले भक्तिसुख पुरेपूर अनुभवतात. हीच परमार्थाची चरमसीमा आहे, यापरते कोणतेही अनुभवधन नाही. असा हा अलौकिक भक्तिसुखानंद अखंड व अविरतपणे अनुभवणे हीच भगवान श्री माउलींच्या ज्ञान-तेजोत्सवाची परिपूर्ण स्थिती असून हाच त्या तेजोत्सवाचा परमोत्कर्ष आहे. यालाच माउली 'महासुखाची दिवाळी' असे सार्थ नाव देऊन गौरवतात.
या परमोत्कर्षाची सर्व अंगे स्पष्ट करताना भगवान सद्गुरु श्री माउली म्हणतात,
तैसें होय तिये मेळीं ।
मग सामरस्याचिया राउळीं ।
महासुखाची दिवाळी ।
जगेंसीं दिसे ॥ ज्ञाने.६.२८.३८९॥

श्रीसद्गुरुकृपेने लाभलेले कृपायुक्त नाम घेता घेता साधक विवेकी होतो व त्याला साधनेचा सर्वांगीण अनुभव हळूहळू येऊ लागतो. त्याच्या चित्तात बोधाची दीपावली साजरी होऊन तो भगवंतांशी भाव-संयोग होऊन साधकत्वाची स्थिती ओलांडून योगी अवस्थेला पोचतो. यानंतर मग ते अद्वैतही गिळून तो भक्तीसाठी द्वैताची पुन्हा कल्पना करून ते भजनसुख पुरेपूर अनुभवतो. या स्थितीचे वर्णन करताना माउली म्हणतात की, "त्या हरिरंगी रंगलेल्या, एकरूप झालेल्या अर्थात् भगवंतांशी सामरस्य झालेल्या योग्यासाठी मग सर्वत्र अखंड महासुखाची दिवाळीच साजरी होत असते. सूर्याच्या घरी प्रकाशाशिवाय आणखी काय असणार ? तसे श्रीभगवंतांशी समरस झालेल्या या महात्म्याच्या आत-बाहेर, सर्वत्र फक्त महासुखच भरून राहिलेले असते. आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥ हाच त्याचा नित्यानुभव असतो. किंबहुना तो योगी ब्रह्मानंदाचे साकार रूपच होऊन ठाकलेला असतो. आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाही त्या महात्म्याच्या कृपेने ती महासुखाची दीपावली अनुभवता येते."
दिवाळी हा काही वैयक्तिक साजरा करायचा सण नाही. तो तर अवघ्या समाजाचा एकत्रित आनंदानुभव आहे. या महात्म्याचेही तसेच असते. तो जरी आत्मानुभव आतून एकटाच उपभोगत असला तरी, त्याची सर्व प्रकारची प्रचिती देखील आनंदमयच झालेली असल्यामुळे, त्याला अवघे जगही आनंदमयच दिसत असते. त्याचा तो आनंद त्याच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार अनुभवायला मिळत असतो. हाच त्या महात्म्याचा भाऊबीज सोहळा अर्थात् विश्वबंधुत्वाचा सोहळा होय !
( http://rohanupalekar.blogspot.in )
दुसरेपणाची भावना हीच द्वेष किंवा मत्सराला जन्माला घालत असते. जर मला माझ्याशिवाय दुसरा कोणीच अनुभवाला येत नसेल तर मी द्वेष करणार कोणाचा ? आपण आपला स्वत:चाच द्वेष कधीतरी करू शकू का ? भगवंतांशी एकरूप झालेल्या भक्ताला सर्वत्र स्वत:चाच विस्तार जाणवत असतो. म्हणजे द्वैतच उरलेले नाही, मग द्वैताचे फळ असणारा मत्सर किंवा द्वेष येणार कोठून ? सगळे जगच त्याला बंधुतुल्य, आत्मतुल्य वाटत असते. महासुखाची अशी दिवाळीच त्या महात्म्याला विश्वबंधुत्वाचे अखंड भान प्रदान करते. त्याला वेगळी भाऊबीज साजरी करावीच लागत नाही. असा महात्माच मग स्वत:साठी काहीही न मागता अवघ्या जगाच्या भल्यासाठी भगवंतांकडे 'पसायदान' मागतो. भगवत् सामरस्याने आनंदमय झालेल्या महात्म्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक जीव मग त्या अपूर्व आनंदाचा कण लाभून सुखाची दिवाळीच साजरी करू लागतो. महासुखाची दिवाळी जगेंसीं दिसे । असे म्हणताना माउली, अशी दिवाळी तो महात्मा जगासह साजरी करतो, हेच तर दाखवून देत आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचाय का ? मग माउलींच्या या बोधाबरोबर आत्मरूप पांडुरंगांच्या पंढरीची वारी करा एकदा, तरच कळेल माउलींना अभिप्रेत असणारी 'महासुखाची दिवाळी' म्हणजे काय ते !!
भगवान श्री माउलींनी या चार ओव्यांमधून मांडलेला "ज्ञान-तेजोत्सव" आपण त्यांच्याच कृपेने गेले चार दिवस पाहात आहोत. यातले केवळ पहिले दोनच दीपोत्सव आपण साधक म्हणून अनुभवू शकतो. पुढचे दोन दीपोत्सव हे आपल्या अखत्यारीतले नाहीत. ती महात्म्यांची अनुभूती आहे ; पण माउलींच्या दिवाळी क्रमात आहेत म्हणून आपण त्यावरही विचार केला.
भगवान श्री माउलींना अभिप्रेत असणारा हा अद्भुत दीपोत्सव आम्हांला कसा व केव्हा अनुभवायला मिळणार ? हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविकच आहे. त्याचे सुंदर उत्तर माउलींचे परमकृपांकित सत्पुरुष प.पू.श्री.मामा देशपांडे महाराजांनी आपल्या 'अमृतबोध' या ग्रंथात दिलेले आहे. ते म्हणतात, "संतांचे स्मरण करून, त्यांना शरण जाऊन त्यांना हृदयात स्थापन करावे. हृदयातल्या त्यांच्या वास्तव्याने जे घडेल त्यालाच 'दिवाळी', 'दसरा' म्हणतात. तोच खरा सण !"
म्हणून या अलौकिक दीपोत्सवाचे गेले चार दिवस आपण जे चिंतन केले त्याचे सार सांगायचे झाले तर असे सांगता येईल की, "श्रीसद्गुरूंना अनन्य शरण जाऊन त्यांनी सांगितलेली साधना नेमाने व प्रेमाने करणे होय !" त्यातूनच सर्व गोष्टी सहजासहजी घडून येतात व तुम्हां-आम्हांलाही घरबसल्या हा ज्ञान-तेजोत्सव सांगोपांग अनुभवायला मिळतो. म्हणून "श्रीसद्गुरुबोधावर एकनिष्ठ राहून साधना व सेवा करण्याची, संतांच्या अद्भुत वाङ्मयाचे चिंतन-मनन करून त्यानुसार वागण्याची सर्वांना सद्बुद्धी लाभो",  याच दीपावली शुभेच्छा व्यक्त करून आपणां सर्वांचे अभीष्ट चिंतितो व श्री माउलींच्याच परमकृपेने झालेली ही सर्व लेखनसेवा त्यांच्याच श्रीचरणीं तुलसीदल रूपाने प्रेमादरपूर्वक समर्पून आपली रजा घेतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment