7 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव -लेखांक - २


भगवान श्री माउलींना अभिप्रेत असलेली, श्रीसद्गुरुप्रदत्त नाम हीच साधकासाठी दीपावली असते, हा भाग आपण काल पाहिला. असा नामदीप शिष्याच्या अंत:करणात सद्गुरूंनी प्रज्वलित केल्यावर, त्या दीपाच्या शांत-स्निग्ध ब्रह्म-प्रकाशात त्या साधकाचे अवघे विश्वच उजळून निघते.
उजळून निघते म्हणजे नक्की काय होते ? भगवान श्री माउलींनी या सर्व प्रक्रियेवर फार सुंदर ओवी घातलेली आहे. ते म्हणतात,
जैसी पूर्वदिशेच्या राउळीं ।
उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं ।
काळिमा नाहीं ॥ ज्ञाने.५.१६.८६ ॥

"पूर्वदिशेच्या क्षितिजावर भुवनभास्कराचे आगमन झाले की, ज्याप्रमाणे केवळ पूर्वच नाही तर इतरही नऊ दिशांमधला अंधार नष्ट होऊन त्याही त्याच अपूर्व सूर्यतेजाने उजळून निघतात, त्याचप्रमाणे श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या त्या दिव्य नामदीपाच्या प्रकाशाने सर्व दुर्गुण जाऊन शिष्याचे सारे अस्तित्वच उजळून निघते, तेजस्वी होते."
श्रीसद्गुरूंनी कृपा केल्यावर शिष्याच्या मनात प्रथम एक अद्भुत विश्वास निर्माण होतो, शब्दांनी सांगता येणार नाही अशी एक अपूर्व निश्चिंतता त्याच्या मनात निर्माण होते.
सद्गुरुकृपेचे मुख्य फळ अथवा पहिल्यांदा जाणवणारे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अंत:करणात जागणारा विवेक". हा विवेकच शिष्यहृदयात कृपेची दिवाळी उजळल्याचे उच्चरवाने सांगत असतो. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणतात, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण ।"
आपण कसे वागलो म्हणजे आपल्या सद्गुरूंना संतोष होईल ? काय वागल्याने त्यांना त्रास होईल ? अशा प्रकारचे, अनुग्रहापूर्वी कधीच न आलेले विचार आपल्या चित्तात वारंवार निर्माण होऊ लागतात. याच विचारांना 'विवेक' म्हणतात. या विवेकामुळेच साधकाच्या मनाची साधनेच्या अनुकूल जडण-घडण होऊ लागते. त्या साधनेला बाधक ठरू शकणारे सर्व विचार, कल्पना आपोआपच नष्ट होऊ लागतात. साधना मिळाल्यानंतर त्या साधनेचा निर्वाह योग्य रितीने होण्यासाठी आवश्यक असणारी अशी मनाची, चित्ताची, शरीराची व सभोवतालच्या परिस्थितीची अनुकूलता, हीच त्यासमयी त्या साधकासाठी सुखाची जणू दिवाळी असते, असे श्री माउली या ओवीतून सूचित करीत आहेत.
साधना करणे म्हणजे आपल्या सगळ्याच सवयी बदलण्यासारखे असते. साधना म्हणजे नियमितता ! आपल्या सर्व वृत्तींचे, विचारांचे, क्रियांचे नियमन करणे हे साधनेचे पूर्वांग आहे. या पूर्वांगाच्या यशस्वितेवरच साधनेची प्रगती अवलंबून असते.
आपला जन्मजात बाळगलेला अव्यवस्थितपणा, पाचवीला पूजलेला आळस, कंटाळा, आपली जीवाभावाची सखी असणारी चंचलता, धरसोडवृत्ती, कधीच शेवटपर्यंत न टिकणारा उत्साह, आपली कायम पाठराखण करणारा संशय, वेळकाढूपणा, फुकट नको ते विषय चघळत बसण्याची मनाची खोड इत्यादी अनेक दुर्गुणांवर प्रयत्नपूर्वक मात केल्याशिवाय साधना नीट सुरूच होऊ शकत नाही. श्रीसद्गुरुकृपेने अंत:करणात उजळलेला हाच विवेकदीप या सर्व प्रकारच्या अवगुणांच्या नाशामध्ये फार मोठी भूमिका बजावत असतो.
( http://rohanupalekar.blogspot.in )
"नियमितता" या शब्दातच "मितता" अनुस्यूत आहे. माउलींना ही मितता अर्थात् मर्यादितता किंवा मोजकेपणा देखील अभिप्रेत आहेच. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात अभ्यासयोग सांगताना फार सुंदर ओव्यांमधून साधनेशी संबंधित असणा-या या मोजकेपणावर प्रकाश टाकलेला आहे. साधना करणा-या साधकाने आपल्या वागण्यात ही मितता बाणवावीच लागते, नाहीतर साधना परिपूर्ण होऊ शकत नाही. माउली म्हणतात की, जेवण, झोप, दैनंदिन कार्ये, विविध उपभोग इत्यादी प्रत्येक गोष्टीत साधकाने मर्यादा बाळगावी, श्रीसद्गुरूंकडून त्याची युक्ती समजून घेऊनच प्रत्येक गोष्ट करावी, म्हणजे सुख लाभून साधना निर्विघ्नपणे होते. ही जाणीव व त्यानुसार अंमलबजावणी करण्यातही हा विवेकच आपल्याला ताकद देत असतो. याही अर्थाने बघितले तर, असा दुर्लभ विवेक निर्माण होऊन टिकून राहणे व त्याद्वारे साधनानुकूल जीवन घडणे ही त्याकाळात साधकासाठी आनंदाची दिवाळीच नाही का ?
ज्याप्रमाणे पूर्वेला सूर्योदय झाला की बाकीच्याही दिशा प्रकाशमान होतात, त्याप्रमाणे सद्गुरुकृपेचा दीप हृदयात प्रकाशला की असे सर्व बाजूंना त्याचे "विवेकतेज" फाकते आणि त्या स्नेहमयी तेजामध्ये तो साधक सुस्नात होऊन शुद्ध होऊ लागतो. दररोजच्या साधनेने हे तेज हळूहळू त्याच्या चित्तात सद्बुद्धीच्या माध्यमातून प्रकटते व पर्यायाने त्याच्या सर्वच अस्तित्वामध्ये अभिनव दीपोत्सवच साजरा करू लागते. ही दीपकलिका छोटी असली तरी ती मोठ्या तेजाने तळपणारी असते, कारण तिच्या पाठीशी श्रीसद्गुरुकृपेचे अतुलनीय बळ असते !
दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावास्येला असते. अमावास्येला सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात, म्हणून आपल्याला चंद्र दिसत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक म्हणतात. मन ही वास्तविक मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या कल्पनेचा अनाकलनीय विस्तार म्हणजे हा मायिक प्रपंच ; म्हणून प्रपंचाचे द्योतक असणारा हा चंद्र, सद्गुरुकृपारूपी सूर्य उगवल्याने पूर्ण अस्त पावतो व कृपेने जागलेल्या त्या विवेकतेजाच्या प्रकाशात साधकाची वाटचाल सुरू होते. आधी फक्त प्रपंच एके प्रपंच करणारा साधक हळूहळू परमार्थात रस घेऊन प्रेमाने साधना करू लागतो. प्रपंचातली अमावास्या ही परमार्थात खरी लक्ष्मीच होय. याच कृपालक्ष्मीची आराधना करणे अर्थात् श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना नेमाने व प्रेमाने करणे, हेच मग त्या साधकासाठी खरे लक्ष्मीपूजन ठरते ! हाच सद्गुरु श्री माउलींना वरील ओवीतून अभिप्रेत असलेल्या अपूर्व-मनोहर "ज्ञान-तेजोत्सवा"चा दुसरा दीपोत्सव आहे !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment