3 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** तृतीयोल्लास **

आज शारदीय नवरात्रीची तिसरी माळ, नवदुर्गांपैकी आदिमाया भगवती चंद्रघंटा देवीची आज उपासना करतात. चंद्राप्रमाणे शीतलता देणारी, भक्तांना आल्हाद देणारी ती चंद्रघंटा होय. भगवती जगदंबा ही मायारूपाने क्षणिक का होईना पण आनंद देतेच ना आपल्याला. साधे जेवण जेवलो तरी अल्पसे व थोडाच वेळ टिकणारे पण समाधान असतेच. हे समाधानही त्या मायारूप चंद्रघंटेचेच स्वरूप आहे. म्हणून तिला आल्हाद देणारी म्हणतात. पण जेव्हा तीच जगदंबा श्रीरूपाने परमार्थाची कृपा करते, तेव्हा मात्र ते अखंड टिकणारे व शाश्वत समाधान असते. त्याचाच विचार आजच्या तृतीयोल्लासात आपण करणार आहोत.
प्रलयकालीन अथांग जलात वटपत्रावर स्वांत:सुखाय शयन करणा-या भगवान श्रीबालमुकुंदांच्या मनात एकदा एक संकल्प स्फुरला, आपण एकटेच आहोत म्हणून आपली करमणूक होत नाही, तर आपण अनेक रूपांनी विस्तारावे ! त्यांच्या ठायी हा संकल्प स्फुरल्याबरोबर त्यांच्या पासून अगदी त्यांच्याच सारखी आणि त्यांच्याइतकीच सामर्थ्यसंपन्न अशी त्यांची आदिशक्ती भगवती आदिमाया जगदंबा निर्माण झाली. वेदान्तमतानुसार भगवंत निष्क्रीय आहेत. ते केवळ मायाध्यक्ष मानले जातात. त्यांची मायाशक्तीच हे सर्व कार्य त्यांच्या अधिष्ठानबलावर करते. त्या जगदंबेच्या स्वरूपातूनच हे संपूर्ण चराचर जगत निर्माण झाले.
म्हणजे तीच विश्वरूपाने विस्तारलेली, नटलेली आहे.
तिनेच गंमत म्हणून परमशुद्ध अशा शिवाला वासनांचे आवरण घालून त्याचा जीव केला आणि नाना कर्मांच्या जाळ्यात त्याला गुंतवले. त्यामुळे तिचे ते अवघड कर्मजाळे तोडून बाहेर येणे जीवाला स्वप्रयत्नाने कधीच शक्य होत नाही. तो कर्मांच्या कचाट्यातून सुटण्याचा जेवढा काही प्रयत्न करतो, तेवढा त्या जाळ्यात तो अधिकच गुंतत जातो. पुन्हा जेव्हा त्या आदिमायेला त्या जीवाची दया येते, तेव्हाच मग ती भगवती आई आपल्या ' सद्गुरु ' या विलक्षण स्वरूपाच्या माध्यमातून त्या जीवावर अनुग्रहकृपा करते. मग मात्र त्या भाग्यवान जीवाचा परतीचा प्रवास सुरू होतो.
आजवर जो जीव ' मी ' आणि ' माझे ' एवढ्याच चाकोरीत गोल गोल फिरत असतो, तो हळू हळू ते सोडून ' तू ' आणि ' तुझे ' या भक्तीच्या प्रवाहात येतो. जीवाचा ' मी ' जाऊन, श्रीभगवंतांचा, श्रीसद्गुरूंचा ' तू ' सुरू होतो. श्रीसद्गुरूंच्या परमकृपेने होणा-या जीवाच्या याच भाव-स्थित्यंतराला नाथ आणि दत्त संप्रदायांमध्ये ' प्रेम-मुद्रा ' अर्थात् ' भक्तीची दीक्षा ' म्हणतात. आपल्या श्रीसद्गुरूंच्या, श्रीभगवंतांच्या विषयी असे निखळ व अपरंपार प्रेम हृदयात दाटून येणे, हेच भक्तीच्या दीक्षेचे म्हणजेच शक्तिपाताचे व्यवच्छेदक लक्षण आहे. बाकी सर्व लक्षणे पूर्णत: गौण आहेत. या प्रेममुद्रेविषयी आजवर सर्वप्रथम प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनीच आपल्या वाङ्मयात सविस्तर सांगून ठेवलेले आहे.
ही प्रेममुद्रा ' प्राप्त व्हावी ' लागते; स्वत:च्या बळावर कधीच मिळविता येत नसते. त्यासाठीच श्रीसद्गुरूंच्या कृपेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींनी आपल्या वाङ्मयातून हा विचार सूचकपणे मांडलेला आहे. श्रीअनुभवामृताच्या सुरुवातीच्या नमनात माउली म्हणतात,
गुरुरित्याख्ययालोके साक्षाद्विद्याहि शाङ्करी ।
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम्  ॥
श्रीभगवंतांच्या अत्यंत करुणामय, दयार्द्र आणि साक्षात् ज्ञानस्वरूप अशा " सद्गुरु " या महान रूपाला नमस्कार असो ! सद्गुरु हे साक्षात् भगवान शिवांची अर्धांगिनी अशी प्रत्यक्ष भगवती आदिशक्तीच आहेत. त्यांच्या कृपारूप आज्ञेचा निरंतर जयजयकार असो !
भगवान श्रीमाउलींनी अमृतानुभवात परब्रह्म परमात्मा, त्याची शक्ती आणि सद्गुरु हे तिन्ही एकरूप असून एकाच तत्त्वाची तीन रूपे आहेत असे म्हटलेले आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णच भगवंत, भगवती व सद्गुरु ही तीन रूपे धारण करतात. या तिघांचे कार्य भिन्न असले तरी स्वरूप एकच आहे. परब्रह्म नि:संग असून अधिष्ठानरूप आहे; परब्रह्माची शक्ती ही क्रियाशील असून तीच सुख-दु:खाचा भोग घेणा-या जीवाला जन्म देते व त्याला बंधनांमध्ये अडकवते; व श्रीसद्गुरु हे त्या जीवाचे ते मायानिर्मित सर्व बंध नष्ट करून पुन्हा त्याला आपले मूळचे आनंदमय शिवस्वरूप प्रदान करतात. तीन कार्ये करणा-या या तीन रूपांनी एकच परब्रह्म लीलाविलास करीत असते. या तिन्ही तत्त्वांचा सुंदर समन्वय परब्रह्माच्या " श्रीदत्तात्रेय " या स्वरूपात झालेला दिसून येतो. याच सर्वांगीण अर्थाने श्रीदत्तप्रभूंना ' आदिगुरु किंवा जगद्गुरु ' असे संबोधले जाते.
भगवती आदिशक्तीचे हे शारदीय नवरात्र, तिच्या अशाच अद्भुत लीलांचे स्मरण करण्यासाठी, तिच्या अगाध स्वरूपाचे चिंतन-मनन करण्यासाठी आणि तिच्याविषयी परमप्रेम दाटून येऊन तिची करुणा भाकण्यासाठी म्हणूनच साजरे करायचे असते. यास्तव नवरात्रोत्सव हा तिचाच एक संपन्न कृपा-महोत्सव आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही !
या आदिमाया श्रीसद्गुरुमाउलीचे कल्पनातीत स्वरूप आणि विलक्षण कार्य यांचे सुरेख वर्णन करणारा आणि एका ज्ञानी भक्ताने केलेली तिची ज्ञानपूर्ण पूजा फार अप्रतिमपणे वर्णन करणारा असा, शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचा एक सुंदर गोंधळ आहे. तोच गोंधळ प्रेमभावे गाऊन, आजच्या नवरात्रीच्या तिस-या माळेला, तीन रूपांनी अखंड कार्यरत असलेल्या या आदिशक्ती जगदंबा मातेच्याच परमविलक्षण, परमकरुणामय श्रीसद्गुरु स्वरूपाच्या श्रीचरणीं आपणही विनम्रभावे नतमस्तक होऊन, विशुद्ध परमार्थ-प्राप्तीचा वरप्रसाद मागूया !!
सुदिन सुवेळ तुझा गोंधळ मांडिला वो ।
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो ।
घालुनि सिंहासन वरूते घट स्थापियला वो ॥२॥
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ॥ध्रु.॥
प्रवृत्ती निवृत्तीचे घालुनि शुद्धासन वो ।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिले चरण वो ।
काया वाचा मनें एकविध अर्चन केले वो ।
द्वैत अद्वैत भावे दिले आचमन वो ॥२॥
भक्ति वैराग्य ज्ञान याही पूजियली अंबा वो ।
सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो ।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो ।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http:// rohanupalekar.blogspot.in )

2 comments:

  1. अप्रतिम , ज्ञानात भर घालणारे नितांत सुन्दर विवेचन !

    ReplyDelete
  2. अतीशय सुंदर निवेदन. भगवती देवीचे स्वरूप आपल्या चक्षुंसमोर येते व मन श्र्श्रद्धा व भक्तीने अतिशय भरून जाते. धन्यवाद.

    ReplyDelete