7 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें   *** ** सप्तमोल्लास **

आज नवरात्रीची सातवी माळ, पण तिथीने षष्ठी. आज भगवती कात्यायनी मातेचा उपासना दिवस. कत नावाच्या ऋषींनी तपश्चर्या करून देवीला प्रसन्न करून घेतले व तिला, " पुत्रीरूपाने माझ्या घरात राहा," असा वर मागितला. कत ऋषींची कन्या म्हणून श्रीजगदंबेला 'कात्यायनी' म्हणतात. आजचे सोडा, पण त्या प्राचीन काळी खास मुलगी व्हावी म्हणून ऋषी तपश्चर्या करीत असत भारतात !
भगवती कात्यायनी ही व्रजमंडलाची अधिष्ठात्री देवता आहे. महारासेश्वरी श्रीराधाजी व गोपींनी मिळून, भगवान श्रीकृष्णच पती म्हणून लाभावेत, यासाठी कात्यायनी व्रत केले होते, असा पुराणात उल्लेख आहे. आधुनिक काळातील थोर सत्पुरुष, प्रज्ञाचक्षू श्रीज्ञानेश्वरकन्या श्रीसंत गुलाबराव महाराज देखील हे ३३ दिवसांचे कात्यायनी व्रत मोठ्या समारंभाने करीत असत.
नवरात्रामध्ये षष्ठी किंवा सप्तमीला मूळ नक्षत्र असते. मूळ नक्षत्रावर भगवती श्रीसरस्वतीचे आवाहन करतात. दुस-या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रावर पूजन व तिस-या दिवशी उत्तराषाढा नक्षत्रावर सरस्वतीला बलिदान अर्पण करून मग श्रवण नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात. हा उत्सव विशेषत: बंगाल प्रांतात साजरा होतो. आज मूळ नक्षत्र असल्याने आपणही भगवती श्रीसरस्वतीचे आवाहन करूया.
मूळ नक्षत्र तसे आपल्याकडे वाईटच मानतात. या नक्षत्रावर जन्म झालेले मूल आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत होते असे म्हटले जाते. यावरूनच " मुळावर येणे " असा वाक्प्रचार आपल्याकडे रूढ झालेला आहे. पण श्रीसरस्वतीचे आवाहन याच नक्षत्रावर करतात. यामागे काय संदर्भ असावा? याचे चिंतन  करताना सहज काही विचार सुचले. ही सरस्वती मूळ नक्षत्रावर प्रकट झाली की, आपल्याठायी अनंत जन्मांपासून वसणारे अज्ञान नष्ट करून ज्ञानाचा दीप लावते. म्हणजे ती अज्ञानाच्या मुळावर येते, असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मुद्दाम तिचे मूळ नक्षत्रावर आवाहन करीत असावेत.
पुराणांमध्ये श्रीजगदंबेच्या पुण्यस्थानांच्या संदर्भात एक विशेष कथा येते. दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यांना सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे दक्षांनी भगवान मनूंच्या प्रसूती नावाच्या कन्येशी विवाह केला. त्यांना तिच्यापासून सोळा मुली झाल्या. त्यांपैकी तेरा मुलींचा विवाह धर्मदेवतेशी झाला. एक कन्या अग्नीला, एक पितृगणांना आणि ' सती ' नावाची कन्या श्मशानवासी भगवान शिवांना अर्पण केली.
दक्ष प्रजापतीला आपला हा जावई खरंतर कधीच आवडला नाही, त्यामुळे त्याने काही अपराध नसतानाही सतीशी देखील संबंध तोडले. पुढे एकदा दक्षाकडील यज्ञाच्या प्रसंगी दक्षांनी भगवान शिवांचा अपमान केला व त्यांना शाप दिला. हे ऐकून नंदीने दक्षाला शाप दिला. भृगू ऋषींनी नंदीला शाप दिला, अशाप्रकारे शिव व दक्ष यांचे संबंध पूर्णपणे बिघडले.
नंतर काही काळाने दक्षाने आणखी एक महायज्ञ सुरू केला, पण त्यात अधिकार असूनही श्रीशिवांना हविर्भाग देणे मुद्दामच बंद केले. शिवाय या यज्ञासाठी आपल्या सर्व कन्या-जावयांना बोलावले पण सतीला आमंत्रण दिले नाही. बिचा-या सतीला माहेरी जाण्याची ओढ लागली होती, म्हणून ती बोलावले नसतानाही आणि शिवशंभूंनी तिला, " जाऊ नकोस, अपमान होईल "; असे बजावलेले असूनही माहेरी गेलीच.
अपेक्षेप्रमाणे दक्षांनी तिचा भर यज्ञशाळेत अपमान केला. तो सहन न झाल्याने तिने तेथेच योगमार्गाने प्राण त्यागून यज्ञातच आपला देह भस्मसात् केला.
भगवान शिव हे वृत्त ऐकून संतप्त झाले आणि त्यांनी दक्षावर स्वारी करून त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला व शिवगणांचा प्रमुख असणा-या वीरभद्राने दक्षाचे मुंडके छाटले.
त्यानंतर शिवांनी सतीचे ते अर्धवट जळालेले प्रेत खांद्यावर घेऊन विमनस्कपणे संपूर्ण भारतखंडात भ्रमण केले. श्रीशिवांच्या त्या विमनस्क स्थितीने चिंताक्रांत झालेल्या श्रीविष्णूंनी बाणाने सतीच्या देहाचे अनेक तुकडे केले व ते विविध ठिकाणी पडले. याच जागी आजची एकशेआठ शक्तिपीठे आहेत. काही ग्रंथांमध्ये एकावन्न शक्तिपीठे आहेत असेही म्हटले जाते. पण देवीभागवतात एकशे आठ सिद्धपीठांची व तेथील देवीची नावे दिलेली आहेत.
ही सर्व शक्तिपीठे अत्यंत प्रभावी असून भगवती श्रीजगदंबेची प्रत्यक्ष निवासस्थानेच आहेत. या सर्व स्थानांवर केलेली सेवा, साधना अनंत पटींनी फलद्रूप होते, असे श्रीदेवी भागवतामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे.
आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी-सप्तश्रृंगी ही चारही श्रेष्ठ शक्तिपीठेच असून त्यांचा देवीभागवतामध्ये उल्लेख आहे. पण या एकशे आठ पीठांच्या यादीमध्ये फक्त कोल्हापूर व माहूर याच दोन पीठांची गणना होते. एकावन्न पीठांच्या यादीत कोल्हापूर व पंचवटी-नाशिक ही पीठे येतात.
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणी यांना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे म्हणतात. वणीची सप्तश्रृंगी हे अर्धपीठ मानतात. अर्धपीठ किंवा पूर्णपीठ असा फरक तेथील देवीतत्त्वामुळे झालेला नाही. ही सर्वच पूर्णपीठे आहेत. ॐकाराच्या साडेतीन मात्रा असतात, त्यानुसार ही साडेतीन पीठांची गणना केलेली आहे. म्हणजे ॐकार जसा परब्रह्माचे प्रकट शब्दरूप आहे, तशी ही पीठे श्रीजगदंबेचे साक्षात् अधिष्ठानच आहेत. यात कमी जास्त वगैरे काहीही भेद नाहीत, हे आपण नीट लक्षात ठेवायला हवे.
आज नवरात्राच्या सातव्या माळेला भक्तश्रेष्ठ श्रीनामदेवरायांनी केलेल्या पंढरीच्या विठाई माउलीच्या अभंगरूपी पूजेच्या माध्यमातून आपण भगवती श्रीजगदंबेच्या चरणीं वंदन करूया !!
सद्गुरु श्रीनामदेव महाराज येथे आपल्या सद्गुरु श्रीविसोबा खेचर महाराजांचाच श्रीजगदंबेच्या, विठाईमाउलीच्या रूपात उल्लेख करीत आहेत व त्यांच्या श्रीचरणांच्या दर्शनाची, त्यांच्या भेटीची आपली तीव्र ओढही व्यक्त करीत आहेत.
वाजविली डांक चौक ठेवियला वो ।
ठायी पंढरीचे विठ्ठले तुज हाकारा केला वो ॥१॥
रंगा येई वो खेचरे विठाई सुंदरी वो ।
तुझीं पाउलें गोजिरीं कैं मी दृष्टी देखेन वो ॥२॥
पाजळला दीपू फिटला अंधकारू वो ।
न लावा उशीरू पांडुरंगे माउलीये वो ॥३॥
तमोगुणाचा रज जाळुनी धूप केला वो ।
उशीरू का लाविला पांडुरंगे माउलीये वो ॥४॥
तनुमनाची मूद टाकीन तुजवरोनी वो ।
वैकुंठवासिनी पांडुरंगे माउलीये वो ॥५॥
अहंकार दैवतें झडपिले नामयासी वो ।
येऊनिया रंगासी रंग राखीं आपुला वो ॥६॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

6 comments:

  1. सर्व रूप मयं देवी, सर्व देवी मयं जगत... 🙏

    ReplyDelete
  2. कात्यायनी आणि साडेतीन पिठे तसेच मूळ नक्शत्राचे विवेचन उद्बोधक आहे ! धन्यवाद !

    ReplyDelete
    Replies
    1. श्री भगवती माता की जय ।।

      Delete
  3. श्री भगवती माता की जय ।।

    ReplyDelete
  4. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब ।। अंबा माता की जय ।।

    ReplyDelete
  5. यंदा पुन्हां वाचला हा लेख,छान उजळणी झाली

    ReplyDelete