2 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** द्वितीयोल्लास **

शारदीय नवरात्रात दररोज एकेका दुर्गारूपाची उपासना केली जाते. पहिल्या दिवशी भगवती शैलपुत्री अर्थात् हिमालयकन्या शिवपत्नी भगवती पार्वतीची उपासना होते. आज नवरात्रीची दुसरी माळ, त्यामुळे आज नवदुर्गांपैकी ' माता ब्रह्मचारिणी ' ची उपासना करतात. तीर्थराज काशीमध्ये या नवदुर्गांची स्वतंत्र मंदिरे आहेत. पंचगंगा घाटावर श्रीब्रह्मचारिणी मातेचे सुंदर मंदिर आहे.
भगवान श्रीशिवांची पत्नी दक्षकन्या सती ही आपल्या वडिलांकडून यज्ञाच्या प्रसंगी अपमानित झाली. ते सहन न होऊन तिने त्याच यज्ञात उडी घेऊन देहत्याग केला. त्यामुळे शिवगणांनी यज्ञाचा विध्वंस केला. पुढे हिमालयाने केलेल्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तीच सती त्याच्या पोटी पार्वती म्हणून प्रकटली. ही संपूर्ण कथा आपण पुढील भागांत पाहणारच आहोत. भगवान श्रीशिवांच्या प्राप्तीसाठी शैलपुत्री पार्वतीने तप केले. त्या तपश्चर्या काळात तिने खूप काटेकोरपणे व्रतस्थ राहून उपासना केली होती. म्हणून तिला ' ब्रह्मचारिणी ' म्हटले जाते. आज दुस-या माळेला श्रीब्रह्मचारिणी मातेचे पूजन करतात.
मातृवात्सल्य ही प्रेमभावनेच्या प्रांतातील सर्वात जास्त गौरविली गेलेली निरपेक्ष प्रेमभावना आहे. इतर प्रकारच्या सर्व प्रेमभावना आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत, पण मातृप्रेम हे सर्व जीवांमध्ये तितकेच गहिरे व संपन्न आहे. मातृप्रेमाला इतर कसलीही उपमा देता येत नाही. मातृत्वात नुसते जन्म देणेच नाही, तर पालन, पोषण व संरक्षण देखील अभिप्रेत असते. या सर्वांबरोबरच, संस्कार व शिक्षणाचीही सुरुवात प्रथमत: मातेकडूनच होत असते.
मातृत्वाच्या या सर्व पैलूंचा विचार केल्यावर, भगवती आदिशक्ती जगदंबा माताच डोळ्यांसमोर येते. आपल्या लेकरांवर इतके भरभरून व निखळ प्रेम केवळ ती जगज्जननी अंबामाताच करू शकते !
भगवान श्रीज्ञानेश्वर माउली भगवती श्रीअंबाबाईची स्तुती करताना म्हणतात,
म्हणोनि अंबे श्रीमंते ।
निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें ।
ग्रंथनिरूपणीं ॥ज्ञाने.१२.०.१०॥
श्रीमाउली भगवती अंबेला 'श्रीमंत' व 'निजजनकल्पलता'  ही दोन मार्मिक विशेषणे येथे मुद्दामच वापरीत आहेत. श्रीभगवंतांच्या कृपाशक्तीलाच " श्री " म्हणतात तर त्यांच्या वैभवसंपन्नतेला " महालक्ष्मी " म्हणतात. येथे भगवान श्रीमाउलींनी खुबीने भगवतीच्या या दोन्ही कार्यरूपांचा सुंदर उल्लेख केलाय. श्रीज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रकटलेली ही अलौकिक कृपाशक्ती, तिला शरण आलेल्या भक्तावर या दोन्ही प्रकाराने कृपाप्रसाद करते, हेच त्यांना त्यातून सूचित करायचे आहे.
भगवती अंबा जेव्हा शरण आलेल्या जीवावर अनुग्रहकृपा करून त्याला परमार्थाचे दान देते, तेव्हा तीच श्रीरूप होते. तर जेव्हा ती त्या जीवाच्या सर्व प्रापंचिक इच्छा पूर्ण करते तेव्हा ती " निजजनकल्पलता " होते. तिला शरण आलेल्या जीवांच्या सर्व कल्पना, कामना पूर्ण करणारी तीच " कल्पलता " असते. मग आपण जर, " माझ्या प्रपंचाचाच परमार्थ होऊ दे ", अशीच तिच्या चरणीं प्रार्थना केली तर? सगळेच काम फत्ते ! कल्पनाच नष्ट करणारी ही कल्पलता मग, अकल्पनाख्य असा भगवत्प्राप्तिरूप मोठा वरप्रसाद देण्यासाठी म्हणून आपल्यावर सर्वार्थाने कृपावंत होईल ! अर्थात् हे कृपाकार्य त्या भगवती जगदंबेच्याच ' श्रीसद्गुरु ' या स्वरूपाद्वारे होत असते. म्हणूनच परब्रह्म भगवान शिव, त्यांची अभिन्ना शक्ती भवानी व करुणाकर श्रीसद्गुरु हे तिन्ही एकरूपच आहेत, एकाच परब्रह्मतत्त्वाचे हे तीन भाग आहेत; असे भगवान श्रीमाउली बाह्या उभारून वारंवार सांगतात !
यासाठीच आज नवरात्रीच्या द्वितीय दिवशी, प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या व अवघ्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचे, तुळजापूरच्या आदिशक्ती श्रीभवानीमातेच्या विविध रूपांचे प्रसन्न दर्शन घेऊन नतमस्तक होऊया आणि तिला कृपा-वरप्रसाद मागूया !
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
भवानी भवानी भवानी त्रिवारं
उदारं मुदा सर्वदा ये जपन्ति ।
न शोको न मोहो न पापं न भीति:
कदाचित्कथंचित्कुतश्चित् जनानाम् ॥
'भवानी' हे पावन नाम जो केवळ तीनवेळा सतत आनंदाने जपतो, त्याला शोक, पाप, मोह व भीती इत्यादी कधीच, केव्हाही, कोणाकडूनही व कुठेही अनुभवाला येत नाहीत, असे साक्षात् श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या  'भवानीभुजङ्गस्तोत्रा'मध्ये स्पष्ट सांगतात. त्यांचेे हे सांगणे आपण या नवरात्र महोत्सवामध्ये मनापासून पालन करूया आणि येता जाता भवानी नामाचा प्रेमादरपूर्वक जप करून धन्य होऊया !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

3 comments:

  1. अप्रतिम लेखन ,शुभेच्छा
    आई ब्रह्मचारिणीचा उदोउदो

    ReplyDelete
  2. छान लिहिले , शुभेच्छा

    ReplyDelete