15 Apr 2019

॥ ऐक तू येवढे चंदन पाखरा ॥


आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, श्रीवामनद्वादशी ! भगवान श्रीमहाविष्णूंचे पाचवे अवतार भगवान श्रीवामनांची जयंती ! भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा नातू बळीराजासाठी श्रीभगवंतांनी हा अवतार धारण केला. श्रीमद् भागवतामध्ये या अवताराची कथा विस्तृत वर्णिलेली आहे. भगवंतांचे भक्तवात्सल्य आणि भक्ताची अलौकिक अनन्यता, यांचा सुरेख प्रत्यय म्हणजे श्रीवामनावतार.
आजच्याच पावन तिथीला भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त व थोर अवतारी सत्पुरुष प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराजांनी १९१५ साली पुणे मुक्कामी देहत्याग केला. आज त्यांची १०१ वी पुण्यतिथी आहे.
स्वत:ला भगवान " श्रीमाउलींची कन्या " म्हणवून घेणारी ही " पंचलतिका " गोपी अत्यंत अलौकिकच आहे. त्यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात केलेले कार्य हा अद्भुत चमत्कारच आहे. त्यांनी एवढ्या थोड्या काळात १३२ ग्रंथ रचलेले आहेत, विश्वास बसणार नाही आपला हे वाचून. श्रीगुलाबराव महाराजांनी स्वत: "श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत दर्शन " या स्वतंत्र तात्त्विक दर्शनशास्त्राची निर्मिती केलेली आहे. ते चालता बोलता चमत्कारच होते, यात शंका नाही.
आज श्रीगुलाबराव महाराजांच्या पावन पुण्यतिथी दिनी, प्रसाद मासिकात गेल्या वर्षी प्रकाशित झालेले, त्यांच्या एका भावपूर्ण अभंगावरील चिंतन सादर करीत आहे.
       ** ** ** ** ** ** ** **
माहेर !!
प्रत्येक स्त्रीची अत्यंत जिव्हाळ्याची ठेव असते. माहेर म्हणजे मायेची उबदार कूस, पित्याचा प्रेममय आश्वासक स्पर्श, सख्या-सुहृदांचा आधाराचा हात आणि बरेच काही... हृदयाच्या अगदी आतल्या गाभ्यात नित्य-सुगंधित कुपीत जपलेल्या, वेध लावणाऱ्या मनोहर आठवणी म्हणजे माहेर. प्रेमाचा खळाळता झरा म्हणजे माहेर. मुळात स्त्री ही भगवंतांची ममतामूर्ती ; तिचे ममत्व जिथे प्रकर्षाने जडलेले असते ते म्हणजे माहेर. अशा माहेरची नुसती सय जरी आली तरी, वैशाख वणव्याने होरपळलेल्या झाडावर श्रावणमेघाने मनसोक्त वर्षाव करावा तशीच काहीशी स्थिती स्त्रीची होऊन जाते. सासुरवासाचा शीण, घालून पाडून बोललेल्या टोमण्यांचा कड जिथे निःशेष नाहीसा होतो, ते विश्रांतीचे, आधाराचे स्थान म्हणजे माहेर !!
माहेर शब्दातला ' मा ' हा 'माय' या जिव्हाळ्याचा नात्याचा द्योतक आहे. जिथे आपले मायबाप राहतात ते माहेर. लौकिक जगातली ही पद्धत संतांनी आपल्या आध्यात्मिक जगतातही वापरलेली दिसून येते. श्रीपंढरीनाथ भगवंत हे संतांचे माय-बाप; म्हणून मग पंढरी हे संतांचे माहेर. " जाईन  गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥ " अशी प्रेमभावना भगवान श्रीमाउली पण व्यक्त करतात ." माझे माहेर पंढरी । " हा संत एकनाथांचा अभंग तर सुप्रसिद्धच आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजही म्हणतात की, " प्रवृत्ति सासुर निवृत्ती माहेर । तेथे निरंतर मन माझे ॥" अशा या अविनाशी माहेराची सर्व संतांना कायमच ओढ लागून राहिलेली असते.
अर्वाचीन काळातील एक फार थोर अवतारी सत्पुरुष, प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज म्हणजे चालता-बोलता चमत्कारच होते. अवघ्या चौतीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेली ग्रंथनिर्मिती आणि जगदुद्धाराचे कार्य इतके भव्य-दिव्य आहे की आश्चर्यालाही आश्चर्य वाटेल. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींना आपले पिता मानून ही " ज्ञानेश्वरकन्या " त्यांच्या श्रीचरणांचे निरंतर अनुगमन करीत राहिली. माउलींचे पितृत्व पुरेपुर सार्थ ठरवीत या 'पंचलतिका' नावाच्या कृष्णप्रिया गोपीने स्वतंत्र मधुराद्वैत दर्शनाची स्थापना केली. लौकिक अर्थाने बालपणीच दोन्ही डोळ्यांचे अंधत्व प्राप्त झालेल्या या प्रज्ञाचक्षू महात्म्याची अलौकिक दृष्टी जगाच्याही पल्याडचे सारे बसल्याजागी पाहू शकत होती. किती आणि काय बोलणार? श्रीसंत गुलाबराव महाराज म्हणजे श्रीमाउलीकृपेचा जिवंत साक्षात्कारच होते. आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, दि. १३ सप्टेंबर रोजी श्रीसंत गुलाबराव महाराजांची १०१ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त आपल्या प्रेमळ माहेराचे वर्णन करण्याऱ्या त्यांच्या एका नितांतसुंदर पदाचा सप्रेम आस्वाद घेऊन त्याद्वारे आपण त्यांच्या श्रीचरणीं, त्यांना अत्यंत आवडणा-या ज्ञानेश्वरमाउली या सप्ताक्षरी नामब्रह्माच्या गजरात, प्रेमादरपूर्वक भावसुमनांजली अर्पूया !
स्त्री जरी देहाने सासरी वावरत असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात तिचे माहेरपण तिने जपलेलेच असते. मनाने ती माहेरी जाऊन क्षेमसमाधान मिळवत असते. या नित्याच्या पण अव्यक्त सुखानुभूतीला शब्दरूप देत मनरूपी पक्ष्याला विनंती करताना श्रीगुलाबराव महाराज म्हणतात;
ऐक तू येवढे चंदन पाखरा ।
निरोप माहेरा नेई माझा ॥१॥
पुण्याहुनी आहे गाव सहा कोस ।
पुसत वाटेस जाय तेथे ॥२॥
लक्षिजे दुरुनी सोन्याचा पिंपळ ।
बैसे अळूमाळ तया मुळी ॥३॥
माझिये मायेस सांगावे एकांती ।
माझी ही विनंती प्रेमभरे ॥४॥
तुझिया कन्येस सासुरवास मोठा ।
येऊ द्यावी पोटा कृपा काही ॥५॥
कितीवेळ तुज माझा ये आठव ।
काही गुप्तभाव पुसे सख्या ॥६॥
केव्हा धाडशी लवकरी मूळ ।
घेऊनी सकळ भाक येई ॥७॥
तुझे पक्षीराजा वंदिते मी पाय ।
ज्ञानेश्वरमाय भेटवावी ॥८॥
पूर्वीच्या काळी संदेशवहनाचे काम पक्षी करीत. त्याच परंपरेला अनुसरून श्रीगुलाबराव महाराज ही ' चंदन पाखरा ' रचना करीत आहेत. या पक्ष्याचे रूपक खरे तर त्यांनी साधकाच्या चित्तावरच रचलेले आहे. श्रीसद्गुरुकृपेने साधना घडल्याने साधकाचे चित्त शुद्ध होत आलेले आहे. त्याला विवेक आणि वैराग्यरूपी दोन बळकट पंख असून त्यांना साधनेने ताकद मिळालेली आहे. त्याआधारे आता तो चिदाकाशात संचार करून परमात्म्याच्या, श्रीसद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकतो, हे जाणून श्रीमहाराज त्या पक्षीराजाला मोठया प्रेमादराने ' चंदन पाखरा ' असे गौरवून विनंती करीत आहेत. चंदन जसे सर्वांगी शुद्ध, सोज्ज्वळ आणि सुगंधी तसेच हे चित्तही साधनेने शुद्ध झालेले आहे त्याच्याकरवी श्रीमहाराज आपल्या श्रीगुरुमायेला निरोप पाठवत आहेत.
" अरे (चित्तरूपी)चंदनपाखरा, तू माझे जरा ऐकतोस का? माझा एक निरोप माझ्या माहेरी पोहचव ना ! माझे माहेर आळंदी, हे पुण्याहून सहा कोस आहे. तू वाटेत विचारत विचारत जा आळंदीला. तिथे जवळ पोहोचलास की, तुला देदीप्यमान असा सुवर्ण पिंपळ लांबूनच दिसेल. तो माझ्या माहेरच्या अंगणाची वैभवसंपन्न खूणच आहे. त्याच्या मुळाशी जरा विसावा घे. तिथे बसल्यावर तुझा प्रवासाचा शीण क्षणात नष्ट होईल. ताजातवाना झालास की माझ्या परमप्रेमळ श्रीज्ञानेश्वरमायेस जाऊन भेट. अतीव प्रेमभराने माझा हा निरोप तिला एकांतात सांग.
माझ्या मधाहूनही गोड अशा ज्ञानाईस सांग की, तुझ्या या कन्येस खूप कठीण सासुरवास भोगावा लागत आहे. प्रपंचरूपी सासरी तिला खूप कष्ट करावे लागतात. या कन्येसाठी तुझ्या पोटी काही माया येऊ देत. तुझ्या प्रेमकृपेशिवाय ही व्यथा कोण हरण करणार? माझ्या आईला विचार की, तुला किती वेळ आपल्या लेकीची आठवण येते? मला तर अखंडच तिची सय येत असते. पक्षीराजा, तिला जरा अशा काही गुप्त गोष्टी विचार. कारण तिला जरी माझी आठवण येत असली तरी वरवर ती ते दाखवणार नाही. म्हणून ही लोकांपासून तिने गुप्त ठेवलेली गोष्ट तू मात्र प्रेमाने तिला विचारून जाणून घे व मला येऊन सांग. माझ्या आईला माझी आठवण येते, हे ऐकून मी किती सुखावेन काय सांगू तुला !
खूप दिवस, वर्ष झाली आईची भेट नाही, माहेरी जाणे झालेले नाही. माझ्या प्रेमार्द्र ज्ञानमातेस विचार की, ती मला माहेरी येण्यासाठी कधी मूळ पाठवणार आहे? मी चातकासारखी वाट पाहत आहे. असे तिचे मूळवणे आल्याशिवाय मला सासरचे लोक सोडणार नाहीत. म्हणून हे विहगा, तू माझ्या कोमल हृदयाच्या अलंकापुरस्वामिनीस सगळ्या गोष्टी नीट विचारून तिचे आश्वासन माझ्यासाठी घेऊनच परत ये !
हे माझ्या प्रिय द्विजवरा, तू माझी आणि माझ्या ज्ञानेश्वरमायेची भेट लवकरात लवकर घडवून आण. मी तिच्या विरहाने कशी दिवस कंठते आहे ते तू पाहतोच आहेस. बा पक्षीराजा, मी तुझ्या पायी वंदन करते पण तू माझा एवढा निरोप माझ्या परमप्रिय मातेला जाऊन सांग आणि तिचे आधाराचे शब्द मला ऐकवून सुखी कर !
माहेराच्या आठवणीने व्याकूळ होऊन आपल्या आईस भेटण्यासाठी आतुर झालेल्या सासुरवाशिणीचे अंतरंग अगदी मोजक्या पण चपखल शब्दांमध्ये श्रीसंत गुलाबराव महाराजांनी येथे मांडले आहे. ही केवळ त्यांची कविकल्पना नाही, तर प्रत्यक्ष त्यांचा अनुभवच ते येथे व्यक्त करीत आहेत. म्हणूनच त्यांच्या या अनुभवातील चैतन्य नुसतेच स्पष्ट जाणवते असे नाही, तर आपलेही हृदय ते उजळून काढते. या श्रीज्ञानेश्वरकन्येचे अंतःकरणही, आपल्या जगद्वंद्य मायमाउलीसारखेच कुसुम-कोमल आहे, हळवे आहे. अपरंपार करुणेची प्रसन्न श्रीमूर्तीच या भावगर्भ पदातून शब्दरूप सुरेख पैठणी लेवून आपल्यासमोर उभी ठाकते. नजर ठरणार नाही अशा त्या देखण्या पैठणीचा तलम पोत, तेजस्वी रंग, नाजूक नक्षीकाम, मनमोहक वेलबुट्टी पाहता पाहता मोहरलेलो आपण, या ज्ञानेश्वरकन्येच्या चिरंतन-माहेरी, ज्ञानमाउलीच्या उबदार मायकुशीत कधी विसावतो ते आपल्यालाही कळत नाही. मनी मानसी भरून उरते ती केवळ अद्भुत प्रेमकृपेची चंदनचर्चित नित्यसुगंधी जाणीव ! सतत हवीहवीशी वाटणारी, अंतर्बाह्य सुखावणारी, ज्ञानमाउलीच्या माहेराचे माहेरपण पुन्हा एकदा सार्थ ठरवणारी  !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.

http://rohanupalekar.blogspot.in)

0 comments:

Post a Comment