15 Apr 2019

श्रीनृसिंह द्वादशीचे वास्तव



काही दिवसांपूर्वी श्रीनृसिंह द्वादशीच्या संदर्भाने मी एक प्रामाणिक खुलासा पोस्ट केला होता. त्यामुळे अनेकांच्या शेपट्यांवर पाय पडल्याने बरेच लोक चवताळून उठले. साहजिकच आहे, धंदा बुडतोय म्हटल्यावर राग तर येणारच ना !!
तो खुलासा वाचून आमचे एक सन्मित्र श्री.शिरीष मधुकर कुलकर्णी चांगलेच संतापले की हो. (मी काही त्यांना प्रत्यक्ष ओळखत नाही, पण ते स्वत: श्रीनृसिंहभक्त आहेत म्हणतात, म्हणून सन्मित्र म्हटले आहे एवढेच.) नुसते संतापले नाहीत, तर धडधडीत पुरावेच दिले त्यांनी. आता मलाही त्यावर काही बोलणे भाग आहे, म्हणून त्या तथाकथित पुराव्यांचाच जरा शास्त्रशुद्ध समाचार घ्यावा असे ठरवले.
पहिला पुरावा ते प्रसाद मासिकाच्या १९८३ सालच्या नृसिंह विशेषांकाचा देतात. या अंकातील रानडे यांच्या लेखात व म.स.घोलपांच्या लेखात द्वादशीच्या व्रताचा उल्लेख आहे. मीही ते दोन्ही संदर्भ पाहिलेले आहेत. त्या ठिकाणी कुठेही मूळ ग्रंथांचा काहीही संदर्भ दिलेला नाही. तसेच तोच संदर्भ फारसा फेरफार न करता नोंदवणारे नंदीबुवा-आंबुलगे, बोठे, पितळे यांनीही कुठेच नृसिंह द्वादशीचा उल्लेख असणा-या मूळ ग्रंथाचा संदर्भ दिलेला नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
रूढी म्हणून अनेक घराण्यांमध्ये परंपरेने नृसिंह द्वादशी साजरी होतही असेल व ते चूक आहे हे मीही म्हटलेले नाही. पण आज ज्या संदर्भाने ती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचा खटाटोप केला जातोय, तो मात्र नि:संशय व्यावसायिक लाभ डोळ्यांसमोर ठेवूनच केला जातोय, हे एखादा शेंबडा लहान पोरगाही सांगू शकेल. कुलकर्णी यांनी उल्लेख केलेल्या कोणाही लेखकांनी, "नृसिंह द्वादशीला श्रीनृसिंह मंदिरात हरभरा डाळ-गूळ अर्पण करावी म्हणजे अलाणा फलाणा दोषांचा परिहार होतो, शनिचा दोष जातो वगैरे लिहिलेले नाही. घोलप एवढेच म्हणतात की, नृसिंह द्वादशीला भगवंतांच्या प्रतिमेची पूजा करावी म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते.
आपापल्या घरात नृसिंह पूजा करायला कोणाचीच कधीही हरकत नसावी, माझीही काहीच नाहीये. पण त्याचे हे बाजारू रूप नक्कीच चुकीचे व फसवे आहे, यात तिळमात्र शंका नाही. म्हणून मी त्याचा आजही पुन्हा पुन्हा तीव्र निषेधच करतो आहे.
श्री.कुलकर्णी स्वत: कोणत्याही ग्रंथाचे एकही पान उघडून न पाहता छातीठोकपणे एक विधान करतात की, अर्थात या सर्वांनी नृसिंह पुराण, नृसिंह उपनिषद, नृसिंह तापनीय या पौराणिक ग्रंथांमधूनच हे संदर्भ मिळविले हे उघड आहे.
हे विधानच पूर्णपणे चूक आहे. मुळात नृसिंह उपनिषद नावाचे उपनिषद अस्तित्वातच नाही. नृसिंह पूर्वतापनीय व नृसिंह उत्तरतापनीय अशी दोन उपनिषदे आहेत. याशिवाय नृसिंह षट्चक्रोपनिषद नावाचेही एक उपनिषद आहे. या तिन्ही उपनिषदांमधून भगवान श्रीनृसिंहांच्या पूर्णब्रह्म स्वरूपाचा उत्तम ऊहापोह केलेला असून, श्रीनृसिंह मंत्रराजाच्या पदांचा समग्र अभ्यास मांडलेला आहे. ही पूर्णपणे तात्त्विक स्वरूपाची उपनिषदे असून यात एका शब्दानेही लौकिक उपासना किंवा व्रतांचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे यात नृसिंह द्वादशीचा संदर्भही नाही हे वेगळे सांगायला नको.
श्रीनृसिंह पुराण हे अडुसष्ट अध्यायांचे एक उपपुराण असून, यातही नृसिंह द्वादशी व्रताचा कुठेही उल्लेख नाही. मी आधीचा खुलासा करण्यापूर्वीच एकदा नृसिंहपुराण पाहिलेले होते व कुलकर्णींची पोस्ट वाचल्यावर पुन्हा नीट पाहिले. त्यात मलातरी कुठेही नृसिंह द्वादशीचा एका ओळीतही संदर्भ सापडला नाही. कुलकर्णींनी स्वत: कष्ट घेऊन हे कोणतेही संदर्भ पाहिलेले नाहीत, हे मलाही माहीत होतेच. तरीही केवळ परत एकदा खात्री करावी म्हणून मी पुन्हा तपासले.
श्रीनरहरीरायांच्या कृपेने मला उलट एक फारच महत्त्वाचा संदर्भ सापडला.
कुलकर्णी मला 'व्यासांचा अाधुनिक अवतार' असे हिणवून म्हणतात की, "याउलट रोहन उपळेकर यांनी जे फाल्गुन शुद्ध एकादशीचे व्रत सांगितले आहे त्या व्रताचा संदर्भ मला अद्याप सापडलेला नाही. मात्र मला सापडला नाही म्हणून तो नाहीच असं रोखठोक म्हणायला मी रोहन उपळेकर यांच्यासारखा व्यासांचा आधुनिक अवतार नाही." कुलकर्णींच्या दुर्दैवाने आणि भगवान श्रीनरहरीरायांच्या कृपेने मला ब्रह्मपुराणात शुक्ल द्वादशीचाच स्पष्ट संदर्भ सापडला !
शिवाय डॉ.गौरव देशपांडे यांच्या सूर्यसिद्धांतावर आधारलेल्या पंचांगात फाल्गुन शुद्ध  एकादशी व द्वादशीचे एक व्रत नोंदवलेले आहे. फाल्गुन शुद्ध एकादशीला श्रीनृसिंहांच्या सुवर्णाच्या नृसिंहमूर्तीची साग्रसंगीत पूजा करावी व द्वादशीला ती मूर्ती ब्राह्मणाला दान द्यावी, असे या व्रताचे विधान आहे.
ब्रह्म पुराणाच्या ५८ व्या अध्यायात श्रीनरसिंह माहात्म्य सविस्तर वर्णिलेले आहे. त्यातील २२व्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की, "(प्रत्येक) शुक्ल द्वादशीला साधकाने निराहार राहून स्वत: स्थापन केलेल्या किंवा सिद्धस्थानातील भगवान नृसिंहांच्या मूर्तीची पूजा करून वीस लक्ष जप करावा." पुढेही त्यात पूजेच्या ब-याच उपचारांबद्दल लिहिलेले आहे. शुद्ध पक्षातील द्वादशी ही नृसिंह उपासनेची विशेष तिथी आहे, हे यावरून स्पष्ट होते. 
न्यायमूर्ती रानडे, य.गो.जोशी, म.स.घोलप व प्र.रा.अहिरराव या विद्वानांबद्दल माझ्या मनात नि:संशय प्रेमादरच आहे व मी कुठेही यांच्या विद्वत्तेला कधीच आव्हान दिलेले नाही की मी त्यांच्याहून अधिक विद्वान आहे, असे म्हटलेलेही नाही. पण तरीही अभ्यासांती हे स्पष्ट सांगू इच्छितो की, यांनी कोणीही नृसिंह द्वादशीच्या व्रताचा एकही प्राचीन ग्रंथोक्त संदर्भ दिलेला नाही. या सर्वांनी श्रीनृसिंह द्वादशीच्या व्रताचा काही ठिकाणी रूढीने चालत आलेलाच संदर्भ नोंदवलेला असावा. कारण या व्रताचे विधानच कुठेही उपलब्ध नाही. म्हणूनच यांपैकी कोणीही आपापल्या लेखात त्याबद्दल काहीच बोललेले नाहीत. त्यामुळे आज जे हरभरा डाळ व गूळ घेऊन श्रीनरहरीरायांच्या दारी भीक मागायला जायचे तद्दन व्यावसायिक व्रत निर्माण केले गेले आहे, ते पूर्णत: अशास्त्रीय व संदर्भहीनच आहे, हे वारंवार सांगू इच्छितो आहे. आजमितीला नव्याने प्रचलित केले जाणारे नृसिंह द्वादशीचे व्रत हे कुडमुडे ज्योतिषी, मंदिराचे पुजारी व इतर व्यावसायिक अशाच कोणाच्यातरी, फायद्यासाठी सतत कल्पना लढवणा-या सुपीक डोक्यातून आलेलाच काहीतरी स्वार्थी प्रकार असून, याला कसलाही शास्त्रीय आधार नाहीये.
भगवान श्रीनृसिंहांची पूजा करण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी फाल्गुनातली द्वादशीच कशाला हवी? ती तर रोजही करता येईलच की. उलट रोज केलीच पाहिजे उपासना. अशी वर्षातून केवळ एक दिवस लाच देऊन तुमचे पूर्ण वर्ष उत्तम घालवायला देव काय वेडेबिडे वाटले की काय? असली लांडीलबाडी परमार्थात चालत नसते. श्री गाडगेबाबा कीर्तनात म्हणत की, "देवापुढे नारळ फोडून त्यातला नखाएवढा खोब-याचा तुकडा समोर ठेवून आम्ही आमची चिंगी, पिंगी, मंगी, आमचा चिनू, मनू, सोनू, बंड्या, खंड्या वगैरेंची आख्खी पलटण सुखी ठेव म्हणतो. अहो त्या देवाचा स्क्रू काय ढिला आहे का तसे करायला ?" तेच येथे आठवले मला. आणि जगात कधीच कुठेही अल्प कष्टांत प्रचंड लाभही मिळत नसतात हे पक्के लक्षात ठेवायला हवे. जो सतत उपासना करतो, प्रेमाने व मनापासून सेवा करतो, त्याचेच परमात्मा सुयोग्य रक्षण करीत असतो. पावसाळ्यात उगवणा-या भूछत्रांप्रमाणे कधीतरीच केलेल्या एखाद्या दिवसाच्या अत्यल्प उपासनेने परमात्मा का बरे आपल्याकडे लक्ष देईल? त्यामुळे अशा भंपक गोष्टींपासून सर्वांनी कायमच चार हात दूर राहावे हेच उत्तम.
कुलकर्णी म्हणतात की, श्रीसंत गोंदवलेकर महाराज हे व्रत करीत असत. पण मला तसाही संदर्भ त्यांच्या चरित्रात कुठेच सापडला नाही. कुलकर्णींनी तो कोठून मिळवला हे तेच जाणोत. त्यांच्यापाशी विश्वासार्ह संदर्भ असेल तर त्यांनी तो द्यावा, नुसत्या ढगात गोळ्या मारून काय उपयोग ?
"राहता राहिला प्रश्न गूळ व हरभरा डाळ यांचा........" असे म्हणत कुलकर्णींनी मस्त विनोदीच मते मांडलेली आहेत. नृसिंह उपासनेत पुरणावरणाचाच नैवेद्य असतो, असे ते म्हणतात. आमच्याही घराण्यात नृसिंह जयंतीच्या दुस-या दिवशी, पारण्याला पुरणावरणाचाच नैवेद्य असतो. आमचे कुलदैवत असलेल्या नीरा-नृसिंहपूर स्थानी तर देवांना दररोज अकरा पुरणपोळ्यांचाच महानैवेद्य असतो. पण याचा अर्थ ते नृसिंह उपासनेचे अंग आहे, असा करणे हे विनोदीच मत झाले ना ! अहो, महाराष्ट्रात होळी पासून ते बैलपोळ्यापर्यंत सर्वच सणांना पुरणपोळीच करायची पद्धत आहे. ते तुम्हां-आम्हां मराठी माणसांच्या जिभेचे चोचले आहेत, त्यांचा त्या त्या सणांच्या दैवतांशी काय संबंध ? हाच नियम वापरायचा तर मग उद्या बैलपोळ्यालाचा सुद्धा संबंध जोडता येईल तुम्हांला भगवान नृसिंहांशी, पुरणपोळीच्याच संदर्भाने. काहीही वाटेल ते बोलायचे का??
श्रीनृसिंह उपासना तर संपूर्ण भारतात होते, पण महाराष्ट्र व त्या जवळचा काही भाग सोडता, इतर कुठेच पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायची पद्धत नाही. गुजराथेत तर तुरीच्या डाळीचेही पुरण करतात. म्हणजे हे पुरणवरण फक्त आपल्या प्रांतात चालते. यावरून स्पष्ट कळते की ही देखील पडलेली एक रूढीच आहे, त्याचा प्रत्यक्ष श्रीनृसिंह उपासनेशी काहीही संबंध नाही.
तरीही शिरीष कुलकर्णींच्या या विनोदी मताचा आदर करीत मी नृसिंहपुराणात काही संदर्भ सापडतात का पाहिले. पण तिथेही त्यांचे दुर्दैवच सोबत होते, त्यामुळे हरभरा डाळीचा कणही सापडला नाही. श्रीनृसिंह पुराणाच्या चौतिसाव्या अध्यायात मार्कंडेय ऋषी व सहस्रनीक राजा यांच्या संवादाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध श्रीनृसिंह पूजनाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. त्यातील २९ ते ३१ या तीन श्लोकांमध्ये नैवेद्य म्हणून तूप-साखरयुक्त उत्तम साळीच्या तांदळाचा भात व सातूच्या पीठाची लापशी किंवा खीर यांचाच उल्लेख आलेला आहे. या नैवेद्याने देव संतुष्ट होऊन त्याचे काय फळ देतात, तेही तिथेच लिहिलेले आहे. इथेही नृसिंहपुराणकार पुरणाचा, हरभ-याच्या डाळीचा किंवा गुळाचा साधा उल्लेखही करीत नाहीत, हे नीट लक्षात घ्यावे. जर ह्या गोष्टीच भगवंतांना आवडत असत्या, तर पुराणात त्यांचा उल्लेख आलाच असता ना ! शिरीष कुलकर्णींनी कसा काय पुरणाचा उल्लेख केलाय हे माहीत नाही. त्याशिवाय असे निराधार मत त्यांनी एवढे छातीठोकपणे कसे काय मांडले बुवा ?? किंवा खाल्लेल्या पुरणाने वाताची बाधा झाली असावी त्यांना, म्हणूनच पुरणाचे रटाळ पुराण लावले त्यांनी एवढे. श्रीभगवंत तर भाव पाहतात भक्ताचा. ते तेवढ्याच एकमेव दुर्मिळ गोष्टीचे भुकेले आहेत. पुरणावरणाची त्यांच्यासमोर काय मातब्बरी हो? ते तर परमप्रेमाने अर्पिलेल्या साध्या वाळक्या पानाफुलानेही संतुष्ट होतात. स्वत: गीतेत त्यांनीच स्वमुखाने तसे सांगितले आहे. पण हे प्रेमच अतिशय दुर्मिळ असते व असल्या स्वार्थाने बरबटलेल्या दीड दमडीच्या नवीन व्रतात काय तसले विशुद्ध प्रेम येणार? हरभरा डाळ व गुळाची लाच देऊन भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान नरहरीरायांना फसवायला जाणा-या या आधुनिक भिका-यांकडे ते ढुंकूनही पाहणार नाहीत.
मी पूर्वी एक कथा वाचली होती. एका गुरूंनी आपल्या एका शिष्याला एक जादुई आरसा दिला. त्यात ज्या कोणाचा चेहरा पाहील त्याचे अवगुण स्पष्ट दिसत असत. त्या बहिर्मुख शिष्याला त्यामुळे नवीनच छंद लागला. तो ज्याचा त्याचा चेहरा त्या आरशात पाहून लोकांचे अवगुण शोधत बसू लागला. त्याची मजल शेवटी आपल्या गुरूंपर्यंत गेली. तो त्यांचाच चेहरा त्या आरशात पाहायला गेला. शेवटी ते गुरु त्याला रागावून म्हणाले, "अरे गाढवा, मी तुला तुझे अवगुण पाहून त्यात दुरुस्ती करता यावी, तू सुधारावास म्हणून तो आरसा तुला दिला होता. तू ते समजून न घेता फालतूपणाच करत बसलास !" त्या शिष्यात व कुलकर्णींमध्ये काहीच भेद नाही. शिरीष मधुकर कुलकर्णी यांनी देखील मला किंवा इतर कोणालाही आरसा दाखवण्यापूर्वी, आपलेच श्रीमुख त्यात एकदा जरी पाहिले असते, तरी अशी हसे होण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. स्वत: चार ग्रंथ पाहून, अभ्यास करून जर ते व्यक्त झाले असते तर फार बरे पडले असते. शिवाय नृसिंहद्वादशीच्या सध्या प्रचलित होऊ पाहत असलेल्या भंपकपणाने भरलेल्या व्रताचा मी का विरोध करतोय, त्यामागची माझी शुद्ध व निरपेक्ष तळमळ काय आहे ; हेही त्यांनी नीट पाहायचा, समजून घ्यायचा अल्पसा जरी प्रयत्न केला असता, तरी ते उपयुक्त ठरले असते. माझ्या लाडक्या भगवान श्रीनृसिंहांची कोणी मनापासून उपासना करीत असेल, भक्ती करीत असेल तर त्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. पण म्हणून आमच्या या लाडक्या दैवताच्या नावाने कोणी उपटसुंभ नवीन धंदा काढत असेल, काहीतरी खोटेनाटे व्रत तयार करून लोकांची दिशाभूल करून, फसवणूक करून आपला स्वार्थ साधत असेल ; तर त्याचा आम्ही प्राणपणाने विरोध करणारच ! भक्त म्हणून ते आमचे कर्तव्यच आहे. पण दुर्दैवाने तेवढी पोच श्री.कुलकर्णींच्या ठायी नसल्याने, त्यांना माझी ती प्रामाणिक तळमळ समजलीच नाही. मत्सराच्या भावनेने अंध झाले की असेच होते.
शिवाय भगवद् गीतेत श्रीभगवंतांनी स्वत:च सांगून ठेवलेले आहे की, क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: । क्रोधाने सारासारविवेक नष्ट होतो व विवेक नष्ट झाला की स्मृतीही लोप पावते. स्मृती लोपली की बुद्धीही नष्ट होऊन सर्वनाश ओढवतो. श्री.शिरीष कुलकर्णी यांनी आधीच आपला अनाठायी क्रोध आवरला असता, तर विवेकाने विचार केल्यामुळे त्यांना वास्तवाचे भान राहिले असते आणि अशी निरर्थक व बिनबुडाची मुक्ताफळे त्यांनी उधळलीच नसती. पण तेवढी कृपा काही श्रीनरहरीरायांनी त्यांच्यावर आत्ता केलेली दिसत नाही. असो आपण better luck next time म्हणू या त्यांना.
श्रीनरहरीरायांनीच माझ्याकडून करून घेतलेल्या अल्पस्वल्प अभ्यासांती ज्ञात झालेल्या संदर्भांच्या आधारे, नृसिंह द्वादशीच्या नवीन रूढ होऊ पाहात असलेल्या या खोट्या व्रताचा खुलासा करून कोणा व्यक्तीचा किंवा कुलपरंपरेचा मी कसलाही अधिक्षेप केला आहे, असे मला अजिबात वाटत नाही. उलट असल्या तद्दन खोट्या व्यावसायिक भंपकपणाची भलावण करून, श्री.शिरीष कुलकर्णींनीच साक्षात् भगवान श्रीनरहरीयांच्या विशुद्ध भक्तीचा अपमान केला आहे. देव त्यासाठी त्यांना क्षमा करोत !
कोणाच्याही श्रद्धेशी असा खेळ करणे हे अतिशय भयानक पाप आहे आणि त्याचे प्रचंड वाईट फळ भोगावेच लागते. आजवर कोणीही या पापातून सुटलेले नाहीत. त्यामुळे कलियुगाचा प्रभाव म्हणून असे कितीही भंपक प्रकार जरी लोकांमध्ये प्रचलित झाले, तरी एक ना एक दिवस त्यांचे बिंग फुटतेच. तीच गत या श्रीनृसिंहद्वादशीच्या नवीन व्रताचीही होणारच आहे. तरीही सुज्ञांची व भाविकांची फसवणूक होऊ नये, म्हणूनच केवळ मी या प्रकाराचा हिरिरीने विरोध करीत आहे ; व शिरीष कुलकर्णींसारख्या कोणीही माझ्यावर कितीही अश्लाघ्य टीका केली, तरीही माझे प्रामाणिक प्रयत्न मी सोडणार नाहीये. भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीराय माझ्याच बाजूने आहेत व पुढेही असतीलच याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच तर, अनेक सद्भक्तांना माझा खुलासा योग्य वाटला व माझे त्याबद्दलचे मतही मनापासून पटले. ते नवीन व्रत हा खोटेपणाच आहे, शेवटी कधीतरी उघडा पडणारच ना तो !
खरोखर कोणी असे श्री.शिरीष कुलकर्णी अस्तित्वात आहेत की कोणीतरी दुसराच त्यांच्या डमी नावाने हे लिहिले आहे, हेही मला माहीत नाही. तरीपण मी श्री.शिरीष कुलकर्णींना मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांच्या वायफळ बडबडीच्या निमित्ताने माझे भगवान श्रीनृसिंहांच्या संदर्भाने पुन्हा एकदा वाचन-मनन झाले. त्याचे श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे.
मला खरोखर वाद घालत बसायची इच्छा नाही, वेळही नाही व त्यात आनंदही नाही. पण एखादी भंपक गोष्ट अशी प्रचलित केलेली मला बघवतही नाही. भगवान श्रीनरहरीरायांच्या शुद्ध उपासनेचे जे स्वरूप आहे, ते पूर्वीच्या ज्ञानी ऋषिमुनींनी व संतांनी जसे घालून दिले आहे, तसेच करण्यात आपले खरे हित आहे. अशा कोणत्याही तथाकथित व्रतांचा, उपासनांचा चुकूनही अंगीकर करू नये. कारण अशा सर्व गोष्टी पूर्णपणे स्वार्थातूनच तयार केलेल्या असतात, त्यामुळे त्यांचे फळही मानसिक व अत्यल्पच मिळते. ख-या पुण्यलाभापेक्षा मनस्तापच होण्याचा जास्त धोका त्यात असतो. मनापासून व प्रेमाने घरी बसूनही आपण उपासना करून श्रीनरहरीरायांची कृपा संपादन करू शकतो व तेच आजच्या फसवणुकीने भरलेल्या कलियुगात अधिक श्रेयस्कर ठरणारे आहे, इतकेच मला म्हणायचे आहे. ज्याने त्याने आपापला विचार करून निर्णय घ्यावा. प्रल्हादवरदे जय जय नरहरी शामराज ।
- रोहन विजय उपळेकर. 
( © - 8888904481)

0 comments:

Post a Comment