17 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - १

वन्दे आलन्दिवल्लभम् - १
आजपासून सात दिवसांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. आपले दोन्ही परमाराध्य भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती हा आपल्यासाठी मोठाच पर्वकाल आहे. या निमित्ताने श्रीगुरुकृपेच्या बळावर आपल्या लाडक्या आराध्यांची यथामती शब्दपूजा बांधण्याचा प्रयत्न आपण आजपासून या लेखमालेद्वारे करू या !
गेल्यावर्षी लिहिलेल्या जन्माष्टमीच्या लेखमालेचे लेख यावर्षी देखील प्रत्येक लेखाखाली दिलेल्या लिंकवर वाचता येतील.  यावेळी विविध संतांनी सद्गुरु श्री माउलींच्या प्रेमाने रचलेले अभंग आपण अभ्यासून श्रीचरणीं भावपुष्पांजली समर्पू या !
सद्गुरु श्री माउलींचे माहात्म्य वर्णिताना त्यांचे पूर्णकृपांकित सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे अतिशय मधुर शब्दांत म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझें जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥

"अहो सद्गुरु ज्ञानराज भगवंता ! सागराची गंभीर गाज त्यालाच शोभते. लहानश्या थेंबुट्याने अथांग सागरासमोर काय मिजास मारावी ? तसे बापा ज्ञानराया ! तुमच्या समोर आम्हां सर्वार्थाने लहान असणाऱ्या लेकरांनी काय वाचाळी करावी ? आम्ही कितीही बोललो तरी ते हास्यास्पदच ठरणार आपल्यापुढे.
आपल्या बाळाचे बोबडे बोल ऐकून वत्सल बाप नक्कीच रिझतो, कौतुक करतो. पण ते कौतुक झाले म्हणून त्या बाळाचे अज्ञान आहे ते काही जात नसते. मी तर तुमचे अज्ञ, अंध, पंगू असे अबोध बाळच आहे. मला तुमच्याशिवाय कोणताही आधार नाही. तेव्हा आता आपणच कृपावंत होऊन मला आपल्या कृपेचा उच्छिष्ट प्रसाद द्यावा, मला खूप भूक लागलेली आहे.
श्रीगुरुकृपेने या 'अमृते'ला पुरेपूर जाणीव आहे की, आपल्यासमोर मर्यादेचे मौनच खरोखर योग्य आहे. आम्हां पामरांनी आपल्यासमोर शास्त्रोचित असे मौन बाळगूनच राहिले पाहिजे, त्यातच आमचे खरे हित आहे. आपण आमचा सांभाळ करण्याचे यथायोग्य जाणताच, त्याप्रमाणे सदैव करीतही आहात. त्यामुळे आम्हांला त्यासाठी आपल्याला वेगळी विनवणी करण्याची काहीच गरज नाहीये. म्हणूनच आपल्यासमोर आपल्याच कृपेने लाभलेल्या प्रेमादराच्या स्वाभाविक मर्यादेने आम्ही शरणागत होऊन राहिलेलो आहोत !"
( श्रीसंत नामदेव महाराज व श्री माउलींच्या प्रेमसंबंधांवर प्रकाश टाकणारा लेख खालील लिंकवर.... )
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - १
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_49.html?m=1

0 comments:

Post a Comment