31 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - पंचम पुष्प

पंचम पुष्प

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे चरित्र व वाङ्मय दोन्ही माधुर्यालाही मधुरता देणारे, आनंदालाही आनंदित करणारे व समाधानाला समाधान देणारे आहेत. श्रीभगवंतांचे अंशावतार बरेच होत असले तरी, सर्वांगपरिपूर्ण आणि बोलाबुद्धीच्या पलीकडचा असा एखादाच परिपूर्णावतार युगायुगांतून होत असतो. आश्चर्य म्हणजे, भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू व भगवान श्री ज्ञानराज माउली या अशाच दोन्ही महान आणि अलौकिक युगावतारांची जयंती एकाच दिवशी आहे. खरंतर आश्चर्य हे म्हणायला नुसते; ते दोन काय वेगळे थोडीच आहेत ? "कृष्णस्तु भगवान्स्वयम् ।" आणि "ज्ञानेशो भगवान् विष्णु: ।" हेच सत्य आहे त्यातले.
श्रीकृष्णावतार हा श्रीभगवंतांचा परिपूर्णतम अवतार आणि श्री ज्ञानदेव माउली देखील परिपूर्णतम श्रीकृष्णप्रभूच !
कृष्णदेव ज्ञानदेव, एकरूप एकदेह ।
एक भाव एक ठाव, भेद नाही द्वैत वाव ॥
सद्गुरु श्री माउली हे त्यांच्या काळातील सर्व संतांचे अत्यंत लाडके होते. Center of attraction च होते ते सगळ्यांचे. तो काळही किती भन्नाट म्हणावा लागेल नाही ? एकाहून एक थोर महात्मे त्यावेळी पृथ्वीवर अवतरलेेले होते आणि सगळे मिळून हरिभक्तीचा कल्लोळ करीत होते. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे त्याबद्दल नेहमी सांगतात की, तो भारतीय आध्यात्मिक वैभवाचा सुवर्णकाळच होता ! त्यांच्या आधी किंवा त्यानंतर आजवर असे कधीच पुन्हा झालेले नाही. श्रीगुरुपरंपरेच्या सात-आठ पिढ्या एकाचवेळी एकत्र नांदत होत्या. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज हे परंपरेचे आद्यगुरु तर श्री चोखोबारायांचे चिरंजीव श्री कर्ममेळा हे त्यांच्या सातव्या पिढीतील शिष्य; अशा श्रीगुरुपरंपरेच्या सात पिढ्या एकत्र लीला करीत होत्या. त्या संपन्न काळाचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. एखाद्या खऱ्या महात्म्याच्या सान्निध्यात नित्यश्रीर्नित्यमंगलम् असा महोत्सवच चालू असतो. इथे तर अनेक महात्मे एकाचवेळी कार्य करीत होते. ते सर्व आषाढी वारीला जेव्हा पंढरीत जमत असतील, तेव्हा काय अद्भुत असेल तो सोहळा याची कल्पनाही करवत नाही. बुद्धीच नाही तेवढी आपली. कठोर साधना करणा-या योग्यांच्या मनातही प्रकट न होणारे श्रीभगवंत, या संतांच्या मांदियाळीत मात्र साक्षात् प्रकट होऊन मनसोक्त नाचत असत, प्रेमाने विलक्षण लीला करीत असत म्हणजे बघा ! प्रत्यक्ष जगत्पालक भगवान पंढरीनाथच जिथे वेडावून जातात, तिथे आपली काय कथा मर्त्य मानवांची ?
या सगळ्या संतमांदियाळीमध्ये भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजच उत्सवमूर्ती असायचे. सगळ्यांच्या सगळ्या लीला त्यांच्या भोवतीच साकारत असत. माउलींचा वेधच एवढा जबरदस्त होता की, एकदा त्यांच्याकडे ओढली गेलेली कोणीही व्यक्ती पुन्हा कधी लांब जाऊच शकत नसे. ती कायमचा त्यांचीच होऊन जाई. श्री माउलींचे स्वरूपच असे तेजस्वी, ओजस्वी आणि महन्मंगल आहे !
आपण सायन्स फिक्शन मूव्हीज मध्ये टाईम मशीन पाहतो. तसे जर खरंच कधी सापडले ना, तर आपण लगेच त्यातून श्री माउलींच्या काळातच जाऊ आणि मग ते मशीनच गायब करून टाकू. त्या अद्भुत काळातून इथे परत कोण येणार ? त्या काळाचा नुसता विचार करून देखील अंगावर रोमांच उभे राहतात, डोळे चमकू लागतात आणि आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात; मग जर प्रत्यक्ष तो काळच अनुभवता आला तर काय भन्नाट होईल ते ! सद्गुरु श्री माउलीराया, एवढी प्रार्थना पूर्ण करा कधीतरी आमची !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी सद्गुरु श्री माउलींच्या चरित्रावर "श्रीज्ञानदेव विजय" हे महाकाव्य जसे रचले, तसेच "चैतन्यचक्रवर्ती" नावाचे एक चार अंकी संगीत प्रदीर्घ नाटकही रचलेले आहे. या नाटकाची संहिता श्रीवामनराज प्रकाशनानेच छापलेली आहे. त्या संहितेत प.पू.श्री.मामांनी इतके देखणे व सुंदर संवाद साकारलेले आहेत की बस ! माउली व इतर संतांचे, माउलींचे व त्यांच्या भावंडांचे, विशेषत: मुक्ताबाईंबरोबरचे आणि माउली व श्रीगुरु निवृत्तिनाथांचे संवाद फार फार अप्रतिम लिहिलेले आहेत. ती संहिता वाचताना आपण जणू तो दिव्य चरित्रपट साक्षात् समोर अनुभवतो आहोत असेच वाटत राहते. चैतन्यचक्रवर्ती पुस्तक हातात घ्यावे नि कोणतेही पान काढून वाचू लागावे, मन मोहरून नाही आले तरच नवल !
प.पू.श्री.मामांनी त्यात काही अद्भुत प्रवेश लिहिलेले आहेत. शास्त्रसिद्धांतांचा तसेच माउलींच्या चरित्राचा व संतांच्या वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास असल्याचे त्यातून स्पष्ट दिसते. हे संगीत नाटक असल्याने त्यांनी संतांचे अगदी नेमके अभंग ठायी ठायी पेरलेले आहेत. शिवाय भाषा इतकी गोड आहे की काय सांगू ! श्री माउलींबद्दलचे पू.मामांचे प्रेम अगदी भरभरून उतू जात असते सतत. पू.श्री.मामांच्या कल्पनाशक्तीला भगवान श्री माउलींच्या कृपेने वास्तव अनुभूतीची एक अलौकिक किनार असल्याने, ह्या संहितेला अपरंपार गोडवा आणि वाचकांच्या ( प्रेक्षकांच्या ) मनाचा ठाव घेण्याचे जगावेगळे सामर्थ्य लाभलेले आहे. ही संहिता वाचताना तर मला खरंच टाईम मशीनची वारंवार आठवण येते. खरोखर काय बहार येईल ना ते सर्व प्रसंग प्रत्यक्ष समोर अनुभवायला मिळाले तर ?
श्रीसंत चोखामेळा महाराज हे सद्गुुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या शिष्यपरंपरेतील थोर विभूतिमत्त्व. श्री माउली - श्री सोपानदेव - श्री विसोबा खेचर - श्री नामदेव - श्री चोखामेळा महाराज अशी ही दिव्य गुरुपरंपरा. चोखोबांना माउलींचा खूप सहवास लाभलेला होता. त्यांनी त्यांच्या अभंगांमध्ये माउलींवर भरपूर लिहिलेले आहे. त्यांचा एक अतिशय समर्पक आणि गोड अभंग आहे. तो पं.भीमसेनजींनी अतिशय सुंदर आणि भावपूर्ण पद्धतीने गायलेला देखील आहे. त्या अभंगाच्या पठणाने आपण आजचे हे पंचम पुष्प भगवान सद्गुरु श्री माउलींच्या श्रीचरणीं समर्पू या आणि त्या अभंगात म्हटल्याप्रमाणे श्री माउलींच्या श्री ज्ञानदेवीला शरण जाऊन खरोखरीच सुखरूप होऊ या !
सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली ।
जेणें निगमवल्ली प्रकट केली ॥२॥
संसारी आसक्त मायामोहे रत ।
ऐसे जे पतित तारावया ॥३॥
चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
श्री चोखोबाराय म्हणतात, "संतांच्या चरणी अनुपम सुख नेहमीच असते. पण तेच सुख साकार होऊन, पुरे म्हणे पर्यंत प्रसाद देणा-या अलंकानगरीत सद्गुरु श्री माउलींच्या रूपाने प्रत्यक्ष नांदत आहे. तेच हे महाराज होत ज्यांनी, संसारात आसक्त झाल्याने मायेत रममाण होऊन मोहात गटांगळ्या खाणा-या अज्ञानी पतित जीवांच्या उद्धारासाठी वेदांचे सार असणारी भगवती श्री ज्ञानदेवीची रचना केलेली आहे. हे त्यांचे उपकार फार मोठे आहेत. श्री ज्ञानदेवी ग्रंथ हा अत्यंत श्रेष्ठ असून, जो या ग्रंथाला शरण जाईल तो नि:संशय सनाथ होईल. म्हणजेच त्याला परंपरेने आलेल्या अधिकारी महात्म्यांची पूर्णकृपा लाभून, साधनेच्या माध्यमातून तो धन्य होईलच !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।




2 comments:

  1. ||ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम || 🌹🌹🙏🙏🌹🌹

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लेख!! सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी साष्टांग दंडवत!🙏🏻

    ReplyDelete