30 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - चतुर्थ पुष्प

चतुर्थ पुष्प
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आजवर अनेक महात्म्यांनी काव्य व ग्रंथरचना केलेल्या आहेत. परंतु श्रीगुरुचरित्र किंवा श्रीनवनाथभक्तिसाराप्रमाणे पारायणासाठी त्यांचे स्वतंत्र ओवीबद्ध चरित्र उपलब्ध नव्हते. सद्गुरु श्री माउलींच्याच प्रेरणेने त्यांचे पूर्णकृपांकित भक्तराज प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यांच्याकडून २४०० ओव्यांचे "श्रीज्ञानदेव विजय" हे महाकाव्य रचले गेले. या अतिशय सुंदर, ओघवत्या व प्रासादिक रचनेने ही उणीव पूर्णपणे भरून काढलेली आहे. पंधरा अध्यायांमधून पू.श्री.मामांनी भगवान श्री माउलींच्या दिव्य चरित्रातील काही सामान्यपणे माहीत असलेल्या व फारशा प्रचलित नसलेल्या ब-याच लीला साध्यासोप्या तरीही अत्यंत रसाळ भाषेत सांगितलेल्या आहे. माउलींच्याच कृपेने ही रचना इतकी भावपूर्ण झालेली आहे की, वाचताना वारंवार आपले अंत:करण सात्त्विकतेने भरून येते, नेत्र पाझरू लागतात, अंगावर काटा उभा राहतो, माउलींच्या प्रेमाने गहिवरून यायला होते आणि सर्वांग व्यापून उरणारी एक विलक्षण आणि मधुरातिमधुर प्रेममयता आपल्यालाही प्राप्त होते. खरोखरीच, अतीव गोड रचना आहे ही.
आपल्याला माहीत असलेल्या रेडा बोलवणे, भिंत चालवणे याबरोबरच, वेगळ्या अशा माउलींच्या काही अलौकिक लीला प.पू.श्री.मामांनी या ग्रंथात सविस्तर सांगितलेल्या आहेत. श्री गहिनीनाथांचे पूर्वचरित्र, क-हाडच्या रामराजाचे गर्वहरण व त्याला कृपादान, पांडुरंगांच्या प्रसादमालेची प्राप्ती, गोपाळ बालकाला जीवनदान, पैठण येथील श्राद्धाच्या वेळी ब्रह्मवृंदाच्या पूर्वजांना जेऊ घालणे, उज्जैनच्या वीरमंगलाची रोमांचकारी कथा व मंगलेश्वर शिवलिंगाची स्थापना, हरिपाल डाकूचा उद्धार, काशीनगरीतील महायज्ञाच्या वेळचा अग्रपूजेचा प्रसंग व भगवान विश्वेश्वरांचे प्रकट होऊन माउलींच्या हातून पुरोडाश भक्षण, मृत सायन्नाचार्याच्या मुखातून सत्यकथन, नेवाशाच्या मशिदीला बोलते केल्याचा प्रसंग; यांसारख्या सद्गुरु श्री माउलींच्या अनेक अनवट लीला पू.मामांनी फार सुंदर भाषेत या ग्रंथात कथन केलेल्या आहेत. हे सर्व वाचताना आपण अगदी रममाण होऊन जातो. यांपैकी गोपाळ बालकाची व हरिपाल डाकूची कथा वाचताना तर फारच भरून येते. पू.मामांची विलक्षण शब्दरचना हृदयात अक्षरश: माउलीप्रेमाची व एका वेगळ्याच आनंदाची कारंजीच निर्माण करते. मला तरी ही रचना त्यामुळेच अत्यंत आवडते. कधीही हा ग्रंथ हातात घ्यावा आणि दोन-चार पाने वाचावीत, त्वरित श्री माउलींच्या प्रेमाचा प्रसन्न आविष्कार होतोच आपल्या मनात. कितीही व्यग्र असले तरी एकदम शांतच होऊन जाते ते. आपल्या मनातल्या श्री माउलींविषयीच्या प्रेमभक्तीचे नि:संशय संजीवनच आहे हा अनमोल ग्रंथ !
[  http://rohanupalekar.blogspot.in ]
'श्रीज्ञानदेव विजय' हा ग्रंथराज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने ( संपर्क ©-02024356919 ) प्रकाशित केलेला आहे. प्रत्येक माउलीभक्ताच्या संग्रही असायलाच हवा इतका हा महत्त्वाचा ग्रंथराज आहे.
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचे नाम जो नित्यनेमाने व प्रेमाने घेईल तो परमार्थाचा अधिकारी होतो, असे अनेक महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहे. श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो ।
वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे जो ।।
ज्यावेळी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताच्या गुहेत श्री निवृत्तिनाथ महाराजांना सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराजांकडून अनुग्रह लाभला, तेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तप्रभू , श्री मत्स्येंद्रनाथ महाराज व श्री गोरक्षनाथ महाराज प्रकटले होते. तेव्हा त्यांनी दिलेला आशीर्वाद प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या 'श्रीज्ञानदेव विजय' चरित्रात वर्णिलेला आहे की,
जे तुमचे नाम जपतील ।
ते पापमुक्त होतील ।
सर्वदा यशस्वी व्हाल ।
आशीर्वादे आमुच्या ॥४.१४३॥
तसेच काशीतील महायज्ञाच्या प्रसंगी पुन्हा एकदा हेच त्रिमूर्ती प्रकट झाले होते. त्यावेळी सर्व संतसमुदायही सोबत होता. तेव्हा परत एकदा भगवान श्रीदत्तप्रभू आणि दोन्ही नाथसिद्धांनी माउली व तिघा भावंडांना विशेष आशीर्वाद दिलेला आहे. प.पू.श्री.मामा म्हणतात,
तिघा नाथांनी ज्ञानेशांस ।
प्रेमे दिले आशीर्वादास ।
"प्रकट करोनी भक्तिमार्गास ।
अनंत जनांसी उद्धराल ॥६४॥
तुमचे नित्य नामस्मरण ।
जे करितील संसारी जन ।
ते त्वरे पापमुक्त होऊन ।
मोक्षासी जातील निश्चये !"॥१३.६५॥
अशाप्रकारे सद्गुरु श्री माउलींच्या नामाला सद्गुरु परंपरेचा दिव्य आशीर्वाद लाभलेला असल्यानेच, वारकरी संप्रदायामधील श्रीसंत नामदेवराय, श्रीसंत जनाबाई, श्रीसंत चोखोबाराय, श्रीसंत एकनाथ, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत निळोबाराय यांसारखे सर्व थोर महात्मे आवर्जून या ब्रह्मनामाचे गुणगान गाताना दिसतात. या पावन नामाच्या नित्यजपाने आजवर अगणित भक्त उद्धरून गेले आहेत व जगाच्या अंतापर्यंत उद्धरणार आहेतच !
आपणही या पुण्यसप्ताहामध्ये भगवान सद्गुरु श्री माउलींच्या परमपावन नामाचे व सुमधुर लीलांचे श्रद्धाप्रेमाने निरंतर संस्मरण करून धन्य होऊया ! तेच या लेखमालेचे एकमात्र प्रयोजनही आहे.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।


3 comments:

  1. द्न्यानोबांचि थोरवी अचाटच आणि प.पू.मामान्चा श्रीद्न्यानदेव विजय ग्रंथ म्हणजे अमुल्य ठवाच होय

    ReplyDelete
  2. ज्ञानदेव ज्ञानदेव

    ReplyDelete