22 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख दुसरा



आज भगवान श्रीनरहरीरायाच्या नवरात्राचा दुसरा दिवस. काल आपण भगवान श्रीनृसिंहांचे स्मरण सर्वप्रकारच्या भयांचा नाश करते हा भाग पाहिला. कालाचेही महाकाल असणारे भगवान श्रीनृसिंह आपल्याला शरण आलेल्या भक्ताचे भयापासून संरक्षण करतात. म्हणूनच श्रीमद् भागवतातील पंचम स्कंधातील अठराव्या अध्यायात भक्तश्रेष्ठ  प्रल्हादजी आपल्या सारख्या सामान्यजनांना उपदेश करतात की, नृसिंहपादं भजताकुतोभयमिति ।
" इच्छा, लोभ, द्वेष, राग, भय, दु:ख आदी गोष्टींचे मूळ असणा-या, अंतिमत: दु:खदायकच असणा-या घरादारात, प्रपंचात फारसे न गुंतता, अभय देणा-या श्रीनृसिंहचरणांचाच सदैव आश्रय करून राहावे !"
कालचा लेख वाचून अनेकांनी विचारले की, श्रीनृसिंहांचे स्मरण कोणत्या मंत्राने करायचे? म्हणून आज मुद्दाम त्यावरच लेखन करीत आहे.
भगवान श्रीनृसिंहांचे असंख्य पुराणोक्त व तंत्रोक्त मंत्र प्रचलित आहेत. परंतु त्या मंत्रांचे नियम व पद्धती अतिशय क्लिष्ट व कडक आहेत. त्या भानगडीत पडून फायद्यापेक्षा तोटा होण्याचाच धोका अधिक. म्हणून त्या मंत्रांपेक्षा अतिशय सोपे व साधे परंतु तेवढेच प्रभावी असणारे श्रीनृसिंह नाममंत्र जपून आपण श्रीनरहरीरायाचे स्मरण करणे जास्त हिताचे ठरते. नृसिंहाय नम: । किंवा नारसिंहाय नम: । हे दोन्ही श्रीनरहरीरायाचेच प्रभावी नाममंत्र आहेत.
" अटव्यां नारसिंहश्च । " म्हणजे जंगलात असताना 'नारसिंहाय नम: ।' या नामाचाच जप करावा असे वैष्णवशास्त्रात सांगितलेले आहे. या नामांचा जप करता येतो किंवा या नामांनी श्रीनरहरीरायाच्या प्रतिमेवर तुलसी/बिल्व/पुष्पार्चनाही करता येते. तुलसीअर्चना ही भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांना अतिशय आवडणारी उपासना आहे. याविषयी उद्याच्या लेखात सविस्तर लिहिणार आहे.
आज गंगासप्तमी, भगवती गंगेची उत्पत्ती तिथी आहे. म्हणून मुद्दामच सद्गुरु श्री माउलींच्या भक्तिचिद्गंगेच्या रूपकाचे, श्रीनृसिंह-प्रल्हादचरित्राच्या माध्यमातून केलेले विवरण खालील लिंकवर जाऊन आवर्जून वाचावे. श्रीनृसिंहलीलेतील भक्तिमर्म हे खरोखर अंतर्बाह्य स्तिमित करणारेच आहे. त्याच्या मननाने भावविभोर व्हायला होते आणि आपसूकच आपल्या मुखातून भक्तकरुणाकर श्रीनरहरीरायांचा जयजयकार उमटतो, भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ  
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख दुसरा 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_2.html

1 comments:

  1. नृसिंह उपासनेचे सोपे मंत्र आपण सांगितलेत, धन्यवाद

    ReplyDelete