27 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सातवा



श्रीनृसिंह पुराणात भगवान श्रीनृसिंहांच्या पूजेच्या व उपासनेच्या अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यात एक विशेष कथाभाग आलेला आहे. पांडुवंशामध्ये एक विष्णुभक्त राजा होता, तो रोज सकाळी आपल्या विष्णुमंदिरात जाऊन स्वहस्ते मंदिर झाडून शेणाने सारवून घेत असे. या सेवेत तो कधीच कुचराई करीत नसे. त्याच्या पुजा-याने त्याला याचे कारण विचारले. त्यावर त्याने त्याच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. तेव्हा तो रैवत नावाचा ब्राह्मण होता. तो शास्त्रविरुद्ध वागत असते. अत्यंत अनाचारी असा तो नीच रैवत एकदा कामेच्छेने काही स्त्रियांना घेऊन जंगलातील एका पडक्या विष्णुमंदिरात गेला. त्यांच्याशी संग करण्यासाठी त्याने आपल्या वस्त्राने त्या मंदिरातील थोडी फरशी स्वच्छ केली. तेवढ्यात तेथे राजाचे काही सैनिक आले व त्यांनी याला चोर समजून याचा शिरच्छेद केला. आश्चर्य म्हणजे त्या पापी रैवताला नेण्यासाठी तेथे विष्णुदूत आले व त्याला विमानातून वैकुंठाला घेऊन गेले. त्या दूतांनी त्याच्या अशा अलौकिक गतीचे कारण सांगितले की, कामेच्छेने का होईना त्या रैवताने नृसिंह मंदिर स्वच्छ केले. त्यामुळे त्याचे सर्व पाप तत्काळ नष्ट झाले व तो वैकुंठाचा अधिकारी झाला. तोच पुढे जयध्वज राजा म्हणून जन्माला आला. त्याची पूर्वस्मृती जागृत असल्याने तो नित्यनियमाने मंदिर झाडून लिंपण्याची सेवा करीत असे.
म्हणूनच श्रीनृसिंहांचे मंदिर झाडण्याची, तेथील परिसर स्वच्छ करण्याची सेवा या उपासनेत अतिशय महत्त्वाची मानली जाते. किती साधी गोष्ट आहे, पण त्याचे फळ पाहा किती महान !! म्हणूनच आपणही आपल्या जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन तेथील स्वच्छता करण्याची, जाळेजळमटे काढण्याची, मंदिराचे आवार स्वच्छ करण्याची सेवा करायला हवी. नृसिंहमंदिरातच करायला हवी असे नाही, कोणतेही मंदिर असले तरी चालेल. सर्वत्र भगवान नारायणच व्यापून राहिलेले आहेत, असे उपनिषदात स्पष्ट म्हटलेले आहे. दिवसाच्या व्यस्त कामातून फक्त पाच-दहा मिनिटे काढली तरीही ही सेवा आपण करू शकतो. ऑफिसला जाताना किंवा येताना वाटेतल्या मंदिरात जाऊन मनोभावे नामस्मरण करीत तेथील झाडलोट करणे असे किती कठीण ठरेल सांगा? अवघ्या पाच मिनिटांच्या सेवेसाठी एवढे प्रचंड फळ देणे हे श्रीभगवंतांचे अलौकिक भक्तवात्सल्यच नाही का? भगवान श्रीनृसिंहांची आपल्याला जमेल तेवढी, खारीचा वाटा म्हणा हवे तर, पण तेवढीही सेवा घडणे हे अापले परमभाग्यच आहे आणि ते हरप्रयत्नाने साधणे हेच आपले कर्तव्य आहे.
श्रीनृसिंह पुराणात श्रीनृसिंहांच्या पूजेतील विविध उपचारांचेही वेगवेगळे माहात्म्य सांगितले आहे. त्यांना मनोभावे केवळ भांडेभर पाणी घातले तरी तेवढ्याने ते संतुष्ट होतात. अहो, प्रेमाने अर्पण केलेल्या एखाद्या पानाफुलाच्या बदल्यात पूर्णकृपा करण्याची या भगवंतांना आवडच आहे. तसे अभिवचनच त्यांनी दिले आहे गीतेत. म्हणजे या कृपाळू कनवाळू श्रीभगवंतांची भक्ती करणे हे किती सोपे नाही का? काही साधनसामग्री लागत नाही की मोठा समारंभ लागत नाही त्यांना. केवळ ख-या प्रेमाचेच ते भुकेले आहेत. जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याच्यावर त्याच्या हजारपटीने अधिक तेही प्रेम करतात. त्यांना प्रेमाने साद तर घालून बघा ना एकदा. आपण करत तर काहीच नाही, फक्त आरडाओरडा करत बसतो काहीच होत नाही म्हणून. आपणच काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय कसे बरे काही चांगले होणार आपल्याबाबतीत?
श्रीभगवंतांचे स्मरण करीत आपली नित्याची कामे केली तरी तीही सेवाच ठरते असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. श्रीभगवंतांचे भक्तप्रेम इतके मोठे आहे की आपल्या भक्तांच्या छोट्या छोट्या गोष्टीही खूप मोठ्या मानून ते मातृवात्सल्याने कौतुक करतात, त्याच्यावर भरभरून करुणाकृपा करतात. या नवरात्राच्या निमित्ताने आपण सर्वांनी आतापासून निश्चय करूया की, जेवढी जमेल तेवढी मनोभावे सेवा सतत करायचा प्रयत्न मी नक्की करीन.
श्रीनृसिंह भगवंतांच्या असंख्य लीलांपैकी भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या संदर्भातील एक अलौकिक अाणि मधुर लीला खालील लिंक वरील लेखात आहे, कृपया तीही आवर्जून वाचावी ही विनंती.
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सातवा 
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_7.html?m=1

2 comments:

  1. रोहन, खूप भक्ती पूर्ण लेखक

    ReplyDelete
  2. लक्ष्मी नृसिंह भगवान , दंडवत!!

    ReplyDelete