26 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सहावा



देवदेवेश्वर भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीमहाविष्णूंच्या दशावतारातील चौथे अवतार. भगवंतांचा हा पहिलाच पूर्णावतार आहे. गर्गसंहितेत अवतारांचे जे प्रकार दिले आहेत, त्यात श्रीनृसिंहांना पूर्णावतार म्हटलेले आहे. मत्स्य, कूर्म व वराह हे त्यांच्या आधीचे तीन अवतार काही विशिष्ट कार्यासाठीच झाले होते. त्यामुळे ते कार्य संपन्न झाल्यावर पुढे त्या अवतारांचे उपासना संप्रदाय निर्माण झाले नाहीत. परंतु भगवान श्रीनृसिंहांच्या रूपाने झालेल्या या पहिल्या पूर्णावतारापासून उपासना संप्रदाय निर्माण झाला. भगवान श्रीनृसिंहांनी पहिला अनुग्रह भक्तराज प्रल्हादांवरच केला व त्यांच्यापासून पुढे परंपरा निर्माण झाली.
श्रीभगवंतांच्या अवतार घेण्यामागचे रहस्य श्रीभगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे की,
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४.८॥
सज्जनांचे, साधूंचे रक्षण, पाप्यांचे व दुष्टांचे निर्दालन व धर्माची स्थापना या तीन प्रमुख उद्देशांसाठी भगवंत अवतार घेतात. हे पूर्णावतारांच्या कार्याचेच व्यवच्छेदक लक्षण आहे. भगवान श्रीनृसिंहांनी आपल्या अनन्यभक्ताचे रक्षण करण्यासाठी व दुष्ट हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला. त्याचबरोबर प्रल्हादांवर कृपा करून भक्तीची परंपरा निर्माण करून धर्माची संस्थापनाही केली. आजही तो भक्तिसंप्रदाय अव्याहत चालू आहे. म्हणूनच भगवान श्रीनृसिंह हे पूर्णावतार म्हटले जातात; आणि आजमितीस असलेला त्यांच्या भक्तीचा प्रचंड विस्तार पाहिला की ते मनापासून पटते देखील.
भगवान श्रीनृसिंहांची अनंत स्थाने पुराणकालापासून प्रसिद्ध असून आजही अतिशय जागृत म्हणून ख्याती पावलेली आहेत. श्रीनृसिंह कुलदैवत असलेल्या कुलांची संख्याही प्रचंड आहे. किंबहुना दशावतारातील इतर अवतारांच्या मानाने श्रीनृसिंह हेच सगळ्यात जास्त कुलांचे कुलस्वामी आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे स्पष्ट द्योतक आहे. उपासनाक्षेत्रातील श्रीनृसिंह भगवंतांचा वाटा देखील प्रचंड मोठा आहे. मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, नाथ, दत्त व भागवत संप्रदाय तसेच विविध वैष्णव संप्रदायांच्या सर्व शाखांमध्ये श्रीनृसिंह उपासना आजही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. श्रीनृसिंह ही सर्वपूज्य देवच आहेत, यात तिळमात्र शंका नाही.
श्रीनृसिंहांच्या पूर्णब्रह्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा एक सुंदर ध्यानश्लोक संप्रदायात प्रचलित आहे की,
उपास्महे नृसिंहाख्यं ब्रह्मवेदान्तगोचरम् ।
भूयोलालितसंसारच्छेदहेतुं जगद्गुरूम् ॥
"वेदान्ताद्वारे, अपरोक्षानुभूतीने जाणले जाणारे निर्गुणनिराकार परब्रह्मच प्रत्यक्ष श्रीनृसिंहरूपात सगुणसाकार झालेले असून, आपल्या अमोघ कृपेने बंधनकारक व दुर्लंघ्य अशा संसाराचा समूळ नाश करून भक्ताला ब्रह्मस्वरूप करणारे ते साक्षात् जगद्गुरूच आहेत, म्हणून आम्ही मनोभावे त्यांचीच उपासना करतो !"
भगवान श्रीनृसिंह, भगवान श्रीरामचंद्रप्रभू, भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभू व भगवान श्रीदत्तप्रभू, हे चारही पूर्णावतार जगद्गुरूच म्हटले जातात. यांचे उपासना संप्रदाय आजही कार्यरत आहेत. एकूणएक सर्व अनुग्रहपरंपरा यातीलच कोणा ना कोणापासून सुरू झालेल्या आहेत.
जगद्गुरु भगवान श्रीनृसिंह आणि जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू यांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे. कारण यांचे कार्यही एकच आहे ना ! गेल्यावर्षीच्या लेखात या दोन्ही पूर्णावतारांचा मधुर स्नेहबंध काहीप्रमाणात उलगडला होता. त्याचविषयीचा आणखी थोडा भाग आजच्या सेवेत मांडलेला आहे. खालील लिंकवर गेल्यावर्षीचा लेख उपलब्ध आहे, तोही साक्षेपाने आवर्जून वाचावा ही विनंती.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी मोठ्या करुणेने हा सर्व गूढ भाग मला समजावून सांगितला, म्हणून तो आपल्यासमोर ठेवीत आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर आजवर इतरत्र कुठेच कोणी सविस्तर लिहिलेले नाही. म्हणून हा लेख आपापल्या संपर्कात आवर्जून शेयर करून ही मौलिक व अनवट माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचवावी ही सादर विनंती करतो !
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सहावा 
श्रीदत्तसंप्रदाय व भगवान श्रीनृसिंह : अलौकिक ऋणानुबंध  
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_6.html?m=1

2 comments:

  1. नृसिंहांचा पूरणावतार आहे हे माहीत नव्हते,हिरण्यकश्यपू ला मारणे एव्हडाच उद्देशाने हा अवतार झाला असा गैरसमज होता, असो आपल्याला धन्यवाद आणि भगवंतांना साष्टांग दंडवत

    ReplyDelete