नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख आठवा
आज भगवान श्रीनरहरीरायांचा परमपावन अवतार दिन. म्हणून या प्रसन्न प्रभाती भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत घालून आपण आपल्या श्रीनरहरी-गुणानुवाद सेवेला प्रारंभ करू या !
यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. कारण श्रीनरहरीरायांचा जन्म सायंकाली, सूर्यास्तसमयी झाला. म्हणून ज्या दिवशी सूर्यास्ताला चतुर्दशी असते, त्याच दिवशी जन्मकाळ साजरा केला जातो. म्हणून आज सूर्योदयाला त्रयोदशी असूनही आजच श्रीनृसिंहजयंती आहे. त्यामुळे आज आपण सकाळी एक व संध्याकाळी समारोपाचा एक अशा दोन लेखांद्वारे श्रीनरहरीरायांच्या चरणी आपली सेवा समर्पिणार आहोत.
जोवर आपल्याला आपल्या आराध्य दैवताविषयी तीव्र माझेपणाची भावना निर्माण होत नाही, तोवर आपल्याकडून प्रेमपूर्वक भक्तीही घडू शकत नाही. श्रीनरहरीराया माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, हा भाव दृढ झाल्याशिवाय आपल्या मनात सतत त्यांचे विचार येणार नाहीत. हे विचार काही आपले कामधाम सोडून करायचे नाहीतच. आपल्या सगळ्या कर्तव्यांमध्ये, आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, back of the mind सदैव आपल्या आराध्याचे, परमप्रिय भगवान श्रीनरहरीरायांचे स्मरण किंवा विचार करीत राहायला हवा. आपल्या प्रत्येक सुख-दु:खात आपल्या सरगळ्यात जवळचे म्हणून जर सर्वात प्रथम त्यांची आठवण आपल्याला झाली, तरच मग आपल्या मनात त्यांची भक्ती हळू हळू दृढ होत आहे असे समजायला हरकत नाही. जेव्हा आपले आराध्य भगवंतच आपली पहिली प्रायोरिटी होतील तेव्हाच मग आपणही त्यांच्या प्रायोरिटी लिस्ट वर असू. हे जोवर होत नाही तोवर आपली भक्ती हा केवळ देण्या-घेण्याचा निव्वळ एक व्यवहारच आहे. या नृसिंह नवरात्राच्या निमित्ताने आपली निरपेक्ष भक्तिभावना सुदृढ व सुस्थिर व्हावी यासाठीच आपण सर्वांनी मनापासून प्रयत्नशील होऊया. हीच सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील.
श्रीनृसिंह पुराणात भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींच्या अद्भुत भक्तिभावनेचा फार सुंदर परामर्श घेतलेला आहे. त्यातील एक अत्यंत भावमधुर व सुंदर कथा खालील लिंकवरील लेखात आहे. तसेच त्याच लेखात अतिशय महत्त्वपूर्ण अशा श्रीनृसिंहकोशाची देखील काही माहिती दिलेली आहे. श्रीनृसिंहकोशाचा पहिला खंड आता पूर्णपणे संपलेला आहे. दुस-या व तिस-या खंडाच्या अगदी मोजक्या प्रती आता उपलब्ध आहेत. ज्यांना हव्या असतील त्यांनी श्रीवामनराज प्रकाशनात त्वरित संपर्क करावा ही विनंती.
आजचा दिवस श्रीनृसिंह भगवंतांचा आहे, तो त्यांच्याच सप्रेम स्मरणात, लीलागुणानुवादनात, त्यांच्याच भावपूर्ण विचारात व्यतीत व्हावा हीच प्रेमळ प्रार्थना !
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख आठवा
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_8.html
खूप छान माहिती. धन्यवाद 🙏
ReplyDelete