कर्दळीवन : भंपकपणाचा कळस
कलियुगाचे अगदी तंतोतंत वर्णन पुराणांमध्ये व संतांच्या वाङ्मयामध्ये बघायला मिळते. कलियुगात असत्यच सत्याची जागा घेऊन लोकांना भ्रमित करेल, असे त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे. याचा आपल्याला पदोपदी प्रत्यय येत असतो. याच भंपकपणाचा कळस म्हणजे सध्या चर्चेत असलेली कर्दळीवन यात्रा होय.
श्रीगुरुचरित्र या परमपवित्र ग्रंथात भगवान श्रीदत्तप्रभूंच्या कलियुगातील, भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज, या दोन अवतारांच्या लीला सविस्तर वर्णिलेल्या आहेत. आज ५०० हून अधिक वर्षे या ग्रंथाची सेवा हजारो लोक करीत आहेत.
संतांचे वाङ्मय हे वरकरणी सोपे वाटत असले तरी त्यात खूप गूढार्थ भरून राहिलेला असतो. सर्वसामान्य वाचकांना त्याचा मथितार्थ प्रत्येकवेळी कळेलच असे नाही. किंबहुना सद्गुरुकृपेने अंतर्दृष्टी उघडल्याशिवाय त्या शब्दांचा खरा अर्थ उमगतच नसतो. अशी दृष्टी नसलेल्या अभ्यासकांद्वारे मग संतवचनांचे विपरीत अर्थ लावले जातात. सध्याच्या काळात असल्याच प्रकारचे धेडगुजरी अभ्यासक समाजात फार मोठ्या प्रमाणात तयार झालेले असल्याने असे अयोग्य अर्थच प्रचलित होताना दिसत आहेत. शिवाय काही गोष्टी संत मुद्दामहूनच गुप्त ठेवतात किंवा अर्धवट अर्थ सांगून ठेवतात. त्यामुळेही लोक विपरीत अर्थ करतात. कर्दळीवनाच्या बाबतीत हेच झालेले दिसून येत आहे.
श्रीगुरुचरित्राच्या ५१ व्या अध्यायात भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्याचा उल्लेख येतो. श्रीस्वामी महाराजांनी गाणगापुरातून शैल्याला गमन केले व पाताळगंगेत पुष्पांच्या आसनावर बसून त्यांनी आपला दिव्यदेह अदृश्य केला. लौकिक अर्थाने त्यांनी 'कर्दळीवनात गमन केले' असे तेथे म्हटलेले आहे. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी की, भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी व भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. ते केवळ अदृश्य झालेले आहेत !
शैल्यमल्लिकार्जुनाजवळ पाताळगंगेच्या पैलतीरावर एक घनदाट जंगल असून त्यात खूप केळीची झाडे आहेत. तसेच तेथे चिखल, दलदलीचेही साम्राज्य आहे. कदली या संस्कृत शब्दाचा अर्थ केळी. तसाच त्याचा तेलुगु भाषेत अर्थ दलदल देखील. त्यामुळेच या अरण्याचे नाव 'कदलीवन' असे पडले. पूर्वीचे कर्दळीवन आता तसे राहिलेले नाही. कारण कृष्णामाईवर झालेल्या नागार्जुनसागर या प्रचंड धरणामुळे बराचसा भाग आता पाण्याखाली गेलेला आहे.
या कर्दळीवनात वामचारी बौध्द तांत्रिक तसेच शाक्त व कापालिकांचा अड्डा होता. आजही त्यांचा वावर तेथे आहेच. बौध्दांपैकी रससिध्द नागार्जुन याच प्रदेशात राहात होते. त्यांनी त्यांचे अनेक औषधी प्रयोग याच ठिकाणी केलेले आहेत. आद्य शंकराचार्य स्वामींच्या चरित्रातील कापालिकाचा प्रसंगही याच जंगलात घडलेला आहे. तांत्रिकांची अघोरी पंचमकार साधना या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने, सात्त्विक भक्तांनी, उत्तम लक्षणी संन्यासी लोकांनी या ठिकाणी अजिबात जाऊ नये, असा शास्त्रांचा स्पष्ट निर्देश पूर्वी प्रचलित होता. एखादा सुलक्षणी उत्तम पुरुष अशा भागात गेला तर ते तांत्रिक लोक त्याला पकडून त्याचा बळी आपल्या इष्ट देवतेला देत असत. कापालिकाने बळी देण्यासाठीच श्रीमदाद्य शंकराचार्यांना तेथे आमंत्रित केलेले होते. पण भगवान श्रीनृसिंहांनी श्रीपद्मपादाचार्यांच्या देहाचा आश्रय घेऊन कापालिकाचा शिरच्छेद केला होता. अशा ठिकाणी, शास्त्रांचे स्पष्ट निर्देश डावलून श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तपश्चर्येसाठी जातील, असे अजिबात वाटत नाही.
काही जुन्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख येतो की, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. लाकूडतोड्याच्या वारुळावरील घावाचे निमित्त होऊन तेच त्या वारुळातून श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रकटले. श्रीदत्त संप्रदायाच्या मूळ परंपराशाखांमध्ये या गोष्टीला अजिबात प्रमाण मानत नाहीत. ही काल्पनिक असल्याचेच अनेक महात्म्यांचे म्हणणे आहे व त्याला तसे भक्कम पुरावेही आहेत.
राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या जन्मासंबंधी त्यांचे प्रमुख शिष्योत्तम श्रीस्वामीसुत महाराजांना जो दृष्टांत झाला होता, त्यानुसार हरियाणा राज्यातील हस्तिनापुर जवळील छेली या खेडेगावात केळीच्या वनाजवळ, चैत्र शुद्ध द्वितीया, शके १०७१ म्हणजेच इ.स.११४९ साली धरणी दुभंगून आठ वर्षाच्या बटू रूपात श्रीस्वामीमहाराज प्रकटले होते. बव्हंशी स्वामीशिष्य याच घटनेला सत्य मानतात. गोपाळबुवा केळकरांच्या बखरीतही हाच प्रसंग आहे. यानुसार अहमदनगरच्या नानाजी रेखी यांनी श्रीस्वामी महाराजांची पत्रिका तयार केली होती. त्या पत्रिकेला स्वतः श्रीस्वामी महाराजांनी आपल्या हयातीतच मान्यता दिलेली होती. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वतः श्रीस्वामींनीच सांगितलेले होते की, "सख्या, याच देहातून आम्ही गेली आठशे वर्षे कार्य करीत आहोत !"
याचा अर्थ असा की, श्रीस्वामी समर्थ महाराज हे भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्याही आधीपासून, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामींच्या काळापासूनच कार्य करीत आहेत. त्यामुळेच कर्दळीवनात घडलेल्या वरील घटनेला संप्रदायामध्ये मान्यताच नाही. ती केवळ कविकल्पनाच आहे. श्रीदत्त संप्रदायाच्या अवतारक्रमामध्ये, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी हे प्रथम अवतार, श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे द्वितीय अवतार, श्रीस्वामी समर्थ महाराज हे तृतीय अवतार, श्री माणिकप्रभू हे चतुर्थ अवतार व प.प.श्री. टेंब्येस्वामी हे पंचम दत्तावतार मानले जातात. हा अवतारक्रम त्या अवतारांच्या जन्मकालावर आधारित नाही.
वरील पाचही अवतार हे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचेच परिपूर्ण स्वरूप असले तरी त्या प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये खूप फरक आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज हे वेदशास्त्रांचे कट्टर पुरस्कर्ते आणि कोणतीही शास्त्रविरुद्ध गोष्ट कदापि न मानणारे होते. या उलट श्रीस्वामी समर्थ महाराज हे कायमच शास्त्रांना पूर्णपणे बाजूला ठेवून मनःपूत आचरण करणारे होते. ते सर्वतंत्रस्वतंत्रच वागत असत. या दोन्ही अवतारांची ही वैशिष्ट्ये त्यांच्या लीलांमध्ये स्पष्टपणे जाणवतात. एकाच रूपात अशी सर्वथा भिन्न किंवा विरुद्धधर्मी वैशिष्ट्ये कशी काय राहू शकतील? त्यामुळेच श्रीनृसिंहसरस्वती स्वामीच श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या रूपाने पुन्हा कार्यार्थ आले, ही गोष्ट पटत नाही. हे दोन्ही अवतार भिन्नच आहेत.
श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या अनेक लीलांमध्ये, गाणगापूरला राहून काम्यार्थ उपासना करणा-या भक्तांना स्वतः श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी दृष्टांत देऊन अक्कलकोटला पाठवले व त्यांचे कार्य श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पूर्ण झाले; अशा असंख्य लीला आहेत. आम्ही आणि श्रीस्वामी समर्थ महाराज एकच आहोत असेही त्या दृष्टांतांमध्ये सांगितलेले आढळते. तत्त्वदृष्ट्या हे खरेच आहे कारण दोघेही श्रीदत्तप्रभूंचेच अवतार आहेत. पण श्रीनृसिंहसरस्वती स्वामीच श्रीअक्कलकोट स्वामींच्या रूपाने पुन्हा आले, ही गोष्ट मात्र पटणारी नाही.
आता आणखी एक प्रश्न उरतो तो, श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाच्या उल्लेखाचा. जे कर्दळीवन आज दाखवले जाते त्याचा व श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाचा काहीही संबंध नाही. श्रीदत्तसंप्रदयातील थोर विभूती, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीवामनराज त्रैमासिकाच्या कार्तिक शके १९३५ च्या अंकामध्ये छापलेल्या 'कृष्णातिरीच्या वसणा-या' या प्रवचनात याविषयी खूप मौलिक माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी सदर प्रवचन आवर्जून वाचावेच. त्यात ते म्हणतात, "मूळ कर्दळीवन नामक दिव्य तपोभूमी ही प्रत्यक्ष श्रीदत्तलोकातच आहे; आणि त्या श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात जाण्याचा मार्ग हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगामधूनच सुरू होतो. त्या लिंगात योगबलाने प्रवेश केला असता तेथून थेट श्रीदत्तलोकातील त्या दिव्य कर्दळीवनात जाता येते.
श्रीदत्तसंप्रदायाच्या सांकेतिक भाषेत, स्थूलमानाने श्रीमल्लिकार्जुन लिंग आणि त्याभोवतीच्या साडेतीन कोस परिघाच्या परिसरालाच 'कर्दळीवन ' असे म्हणण्याचा प्रघात आहे! "
भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज वर वर्णन केलेल्या पध्दतीनेच श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात निघून गेले. लौकिक अर्थाने ते पृथ्वीतलावरून अदृश्य झाले. पण ज्यांना श्रीदत्तसंप्रदायाचे रहस्यच माहीत नाही; खरा संप्रदाय माहीत नाही असे लोक व्यर्थच पाताळगंगेच्या पैलतीरावरील अघोरी उपासना चालणा-या व त्याज्य मानलेल्या कर्दळवनाचा स्वतःच्या फायद्यासाठी सध्या खूप प्रचार-प्रसार करताना दिसत आहेत. कलियुगाचा विचित्र महिमा म्हणूनच की काय, अशा स्थानांशी अनेक दंतकथांचा संबंध जोडून आज शेकडो लोक भलत्याच कर्दळीवनाच्या यात्रा करीत आहेत.
सध्याच्या काळात कर्दळीवन यात्रा हा फार मोठा धंदा झालेला आहे. अनेक धूर्त लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. भोळ्या भाविक लोकांना भावनिक स्तरावर ब्लॅकमेल करून, त्यांच्या श्रद्धेशी खेळून या यात्रेला येण्यासाठी भरीस पाडले जात आहे. एवढेच नाही तर, सरकारी अभयारण्य असलेल्या या कर्दळीवनाच्या विकासासाठी संघ, संस्था, गोशाळा इत्यादी स्थापून त्यांच्या नावावर देश-विदेशातून बख्खळ पैसा जमवला जात आहे. ही भाविक भक्तांची घोर फसवणूकच आहे. भाविकांनी असल्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये.
गेल्या एक-दोन वर्षात या कर्दळीवनाचे खोटेच माहात्म्य सांगणारे अनेक ग्रंथ बाजारात आलेले दिसतात. पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांच्या मानसिकतेवर वारंवार मारा करून या ग्रंथाच्या हजारो प्रती खपवल्या जात आहेत. लोकांच्या श्रद्धेशी खेळून, त्यांची हकनाक दिशाभूल करून आपली तुंबडी भरण्याचा हा हीन उद्योग किळसवाणाच आहे. अशा एकजात सर्व पुस्तकांमध्ये छापलेले अनुभव देखील अतिशय सामान्य स्तरावरील भावनिक व मानसिक खेळच आहेत. शास्त्रांच्या दृष्टीने त्यांना अनुभव देखील म्हणता येणार नाही. ते शुद्ध कल्पनाविलासच आहेत. पण व्यवहारात जेव्हा अशा गोष्टी विविध माध्यमांमधून वारंवार समोर येतात, तेव्हा स्वाभाविक मानसिकता म्हणून मग लोकांना त्यात तथ्य असावेसे वाटू लागते. हीच पद्धत वापरून खोट्या नाट्या प्रसिध्दीचा अवलंब करून सध्या कर्दळीवन यात्रांचा धंदा तेजीत चालू आहे.
आज जे कर्दळीवन 'महान पवित्र ठिकाण' म्हणून दाखविण्यात येते. तिथे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कधीच गेलेलेही नाहीत. मग तेच श्रीस्वामी समर्थ म्हणून तेथून पुन्हा प्रकटले, हेही खोटेच ठरते. शिवाय ते स्थान अपवित्र, अयोग्य म्हणूनही मानलेले आहे. अशा ठिकाणी मोठ्या श्रद्धेने यात्रा करून, प्रचंड कष्ट सोसून काय पदरात पडणार? जंगलात निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर मग कर्दळीवनच कशाला हवे? इतरही जंगले आहेतच की !
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. श्रीदत्तसंप्रदायातील कारंजा, पीठापूर अशी स्थाने प्रथमतः प.प.श्रीमत् टेंब्येस्वामींनी शोधून काढली. कुरवपूर, नृसिंहवाडी, औदुंबर इत्यादी प्रमुख श्रीदत्तस्थानांचा विकासही त्यांनीच करवला. पण त्यांनी या कर्दळीवनाचा साधा उल्लेखही कुठे केलेला नाही आपल्या वाङ्मयात. ते आसेतुहिमाचल भ्रमण करीत असताना मल्लिकार्जुनाला गेले पण कर्दळीवनात अजिबात गेले नाहीत. म्हणजे जे स्थान त्यांना मान्यच नव्हते, त्याचे महत्त्व आजच्या या लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीची स्वत:हूनच ठेकेदारी घेतलेल्या तथाकथित बाजारबुणग्यांना जाणवले; असे म्हणायचे का? का या थोर (?) महाभागांचा अधिकार श्रीमत् टेंब्येस्वामींपेक्षा मोठा आहे? असल्या या तद्दन भंपकपणाला भाविकांनी अजिबात भीक घालू नये आणि कर्दळीवनाच्या यात्रांच्या फंदातही पडू नये, हीच कळकळीची विनंती ! प्रचंड हाल-अपेष्टा सोसून या कर्दळीवनात यात्रेला जाण्यापेक्षा घरी बसून केलेली यथाशक्य उपासना देखील जास्त लाभदायक ठरेल !
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या प्रवचनातून या भयंकर प्रकाराला सर्वप्रथम वाचा फोडलेली असून, फार मोलाची माहिती त्यात सांगितलेली आहे. भाविकांनी ती मुळातून वाचावी व असल्या भलत्याच यात्रांच्या भानगडीत पडून आपली आर्थिक, मानसिक आणि भावनिक फसवणूक करून घेऊ नये. यासाठीच अत्यंत तळमळीने हा लेखन-प्रपंच करीत आहे.
संतांच्या ग्रंथातील वरवर न समजणारी रहस्ये अधिकारी विभूतींकडूनच समजून घेतली पाहिजेत. विद्वान असेल पण सद्गुरुकृपा व संप्रदायोक्त साधना नसेल तर अशांच्या म्हणण्याला काडीची किंमत नसते. आज प्रचंड खप होणारी ही कर्दळीवनाबद्दलची सर्व पुस्तके भलतीच माहिती सांगणारी आहेत. त्यात संप्रदायाला धरून काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे उगीचच अशा भूलथापांना, कल्पनाविलासाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, ही सादर विनंती !
अशा कोणत्याही गोष्टींना, आपल्या सारासार विवेकाच्या मोजपट्टीवर व अधिकारी संतांच्या आधाराने तपासून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा, त्यातच आपले खरे हित असते !
लेखक : रोहन विजय उपळेकर
श्रीक्षेत्र दत्तधाम
द्वारा- श्री. श्रीराम नारायण जोशी
मु.पो. कोयनानगर, ता. पाटण
जि. सातारा - ४१५२०७
भ्रमणभाष- ८८८८९०४४८१
( यासंदर्भातील आणखी काही लेख खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
http://kardaliwanachivastusthiti.blogspot.in )
0 comments:
Post a Comment