11 Apr 2018

कीं तयाचें पशुत्व वावो जाहालें; पावलियां मातें


नमस्कार मित्रहो,
आज चैत्र कृष्ण एकादशी !
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी ज्या ग्यान्या नावाच्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले, त्या परम पुण्यवान रेड्याची आज पुण्यतिथी !!
श्री माउलींची ही अद्भुत लीला-कथा खरेतर भक्तिशास्त्रातील अनेक रहस्ये विशद करणारी आहे. शुद्धिपत्र मागायला आलेल्या माउलींची पैठणच्या ब्रह्मवृंदाने परीक्षा घेतली. त्यावेळी माउलींनी रेड्याच्या पाठीवर मारलेल्या आसुडाचे वळ आपल्या पाठीवर उठलेले दाखवून, सर्व जीव भगवंतांचेच अंश असून एकरूप आहेत, हे सिद्ध केले. तेवढ्यानेही समाधान न वाटून त्या ब्रह्मवृंदाने त्याच रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याची माउलींना मुलखावेगळी आज्ञा केली.
आपल्या श्रीगुरूंच्या संमतीने माउलींनी एक अत्यंत विलक्षण लीला केली आणि त्या ' ग्यान्या ' नावाच्या रेड्याकडून वेदवाणी वदविली. तो रेडा पौष अमावास्येपासून माघ शुद्ध पंचमी पर्यंत सलग पाच दिवस वेदपठण करीत होता. त्यावेळच्या ब्राह्मणांनी आपल्या सह्यांनिशी दिलेल्या शुद्धिपत्रामध्ये या वेदपठणाच्या चमत्काराचा स्पष्ट उल्लेख असून हे शुद्धिपत्र आजही उपलब्ध आहे.
या रेड्याची कथा मोठी विलक्षण आहे. पूर्वी एक मलय नावाचा गंधर्व होता. देवर्षी नारदांच्या शापामुळे त्याला पशुयोनीत जन्म घ्यावे लागले. पण त्याच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन, त्या जन्मांमध्ये महात्म्यांच्या कृपेने तुझा उद्धार होईल, असा उश्शाप नारदांनी त्याला दिला. तो मलय गंधर्व संत मुकुंदराजांच्या काळात आंबेजोगाईच्या जैत्रपाळ राजाचा घोडा झाला. मुकुंदराजांच्या कृपेने त्या योनीतून सुटून पुढच्या जन्मी मग तो माउलींचा रेडा झाला. त्यानंतर त्याला मनुष्य जन्म मिळून समर्थ श्री रामदास स्वामींच्या कृपेने तो मोक्षास गेला.
वेदपठण केल्यानंतर तो रेडा माउलींच्या कायम बरोबरच राहिला. पुढे नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर आळंदीला जाताना वाटेत जुन्नर जवळील आळे या गावी त्या भाग्यवान रेड्याने माउलींच्या समक्ष देहत्याग केला. भगवान श्री माउलींनी स्वहस्ते त्याला समाधी दिली. आजमितीस तेथे त्या रेड्याचे मोठे मंदिर आहे. आजच्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. या पुण्यवान रेड्याची पालखी देखील दरवर्षी आषाढी वारीसाठी आळे गावातून पंढरपूरला येते.
महात्म्यांचा आशीर्वादच नाही तर शापही आपला उद्धारच करतो, हा भक्तिशास्त्रातला सिद्धांत या लीला प्रसंगातून माउलींनी आपल्या समोर पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे !!
सद्गुरु श्री माउली ज्ञानेश्वरीत भक्तराज गजेंद्राच्या संदर्भात म्हणतात,
पाहें पां सावजें हातिरुं धरिलें ।
तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहालें ।
पावलिया मातें ॥ज्ञाने.९.३१.४४२॥
या परम पुण्यवान रेड्याच्या बाबतीत माउलींनी देखील त्यांचा हा सिद्धांतच स्वत: खरा करून दाखविला आहे.
रेड्यामुखी वेद बोलविण्याचे विलक्षण सामर्थ्य अंगी बाळगणारे भगवान श्री माउली आणि त्यांचा लीलासहचर असणारा तो महापुण्यवान ग्यान्या रेडा, या उभयतांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत !!
या संपूर्ण प्रसंगावर व त्यातील भक्तिरहस्यावर बापरखुमादेविवरु मासिकात मी एक सविस्तर लेख पूर्वी लिहिला होता. त्या लेखाच्या पीडीेएफची लिंक खाली देत आहे. कृपया पूर्ण लेख आवर्जून वाचावा व या जगावेगळ्या लीलेचा सप्रेम आनंद घेऊन श्री माउलींच्या श्रीचरणी नतमस्तक व्हावे ही विनंती.
लेखाची लिंक -  
https://drive.google.com/file/d/1UjfACrA-g3816BYYpq9e--GRC8HcH6DR/view?usp=drivesdk
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment