11 Feb 2017

तेचि वंदू श्रीचरण श्रीगुरूंचें

आज माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला श्रीदत्तसंप्रदायात अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक संतांचे उत्सव असतात. श्रीगुरुप्रतिपदा हीच प्रत्यक्ष शिवावतार भगवान श्री निवृत्तिनाथ महाराजांची जन्मतिथी आहे. वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष, नैष्ठिक ब्रह्मचारी श्री.विष्णुबुवा जोग महाराज, सोलापूर येथील श्रीसंत प्रभाकर महाराज आणि श्रीक्षेत्र औदुंबर येथील प.प.श्री.नारायणानंदतीर्थ स्वामी अशा तीन संतांची ही देहत्यागाची तिथी आहे. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
आजच्या तिथीला भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले होते. तेथे कालांतराने त्यांच्या 'विमल पादुका' स्थापन करण्यात आल्या. औदुंबरहून श्री स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र वाडीला गमन केले. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व त्यांनी तेथे अनेक अद्भुत लीला केल्या. तेथे त्यांनी अाश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' यांची स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्याच पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हे आपण लक्षात घ्यावे.
भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणा-या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ विचारीत असतात, म्हणून आज याच तीन पादुकांसंदर्भात आपण माहिती घेेणार आहोत.
विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत.
औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास्य आपल्या अनुष्ठानात व्यतीत केले होते. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना 'विमल पादुका' म्हणत असावेत. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. या पादुकाही नंतर कोणा भक्ताने श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या तेथील वास्तव्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ, देवांच्याच अद्भुत प्रेरणेने प्रेमादरपूर्वक स्थापन केलेल्या असाव्यात.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वत: भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात,
तुम्हां सहित औदुंबरी ।
आमुच्या _पादुका मनोहरी_ ।
पूजा करिती जे तत्परीं ।
मनोकामना पुरती जाणा ॥श्रीगुरुचरित्र १९.८१॥

वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना श्री स्वामी महाराज म्हणतात की, "जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल !"
भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, गाणगापुरातून शैल्यगमन करण्यापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात,
कल्पवृक्षातें पूजोन ।
यावें आमुचें जेथ स्थान ।
पादुका ठेवितो _निर्गुण_ ।
पूजा करावी मनोभावें ॥श्रीगुरुचरित्र ५१.२१॥

"भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात.
श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि त्यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना 'निर्गुण पादुका' म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ "विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणा-या पादुका", असाच घ्यायला हवा.
या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात.
श्रीदत्त संप्रदायामध्ये मूर्तीपेक्षाही पादुकांनाच अत्यंत महत्त्व दिलेले दिसून येते. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूती, पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "श्रीदत्त संप्रदायात मूर्तिपूजा ज्येष्ठ नाही; गौण आहे. परमश्रेष्ठ आहे ती श्रीचरणपूजा ! तेथून प्राप्त होणारा आदेश आणि त्या तत्त्वाशी एकरूप होऊन बुद्धीच्या वैभवशाली उदरात जागलेला अलख ! ' श्रीचरण ' म्हणजे ' कृपायुक्त, शक्तियुक्त चरण '. या श्रीचरणांची महती कितीही गायिली तरी थोडीच आहे. त्यांच्या व्याप्तीचा आवाका देखील केवढा? तंत्रशास्त्राप्रमाणे एक चरण शिव तर एक शक्ती आहे. एक श्वेतबिंदू आहे तर एक रक्तरजोबिंदू ! आणि या श्रीचरणांच्या सामरस्यातून, संयोगातून जे प्रकट होते ते तर एक विलक्षण परब्रह्म ! ' तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।' अशी अनुभूती देणारेे तेच ते सद्गुरुतत्त्व !!"( संदर्भ: निगूढ योगपंचक, पृ. ११)
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज आपल्या 'विभूती' ग्रंथात सद्गुरूंची व्याख्या करताना म्हणतात, "ज्यांचे चरण म्हणजे साक्षात् श्री." सद्गुरूंचे श्रीचरण म्हणजेच भगवती कृपाशक्ती श्रीजगदंबा होय. तिच्या कृपेनेच साधकाचा परमार्थ सुफळ संपूर्ण होत असतो. म्हणूनच सर्व संप्रदायांमध्ये श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणांचे, श्रीचरण पादुकांचे प्रेमादरपूर्वक पूजन, अर्चन केले जाते. भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी देखील तुम्हां आम्हां भक्तांच्या सर्वांगीण उद्धारासाठीच विमल, मनोहर व निर्गुण या तीन पादुकारूपांचा आविष्कार केलेला आहे. या तिन्ही पादुका म्हणजे भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे सर्वशक्तिसंपन्न असे सगुण रूपच आहे आणि त्यांची अत्यंत निष्ठेने व प्रेमाने केलेली उपासना, सेवा हीच आपल्यासाठी अमृतसंजीवनी आहे. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज आपल्या 'औदुंबर पादुकास्तोत्रा'मध्ये म्हणतात की, "या दिव्य पादुकांच्या ठायी भगवान श्रीदत्तप्रभू, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अशा तिघांचेही एकाचवेळी अधिष्ठान असते. म्हणूनच या पादुका फार प्रभावी व अद्भुत आहेत."
श्रीदत्त, श्रीनाथ व भागवत संप्रदायांचे अध्वर्यू, श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट नेहमी सांगत असत. ते म्हणत की, "नृसिंहवाडी हे श्रीदत्तप्रभूंचे 'दिवाने खास' असून गाणगापूर हे 'दिवाने आम' आहे." याचा अर्थ असा की, श्रीदत्तप्रभू गाणगापूरला विशेषत्वाने आपल्या सर्व भक्तांना त्यांच्या त्यांच्या मनोभावानुसार योग्य ते प्रापंचिक वरदान देतात, तर नृसिंहवाडीला मात्र ते याबरोबरच निवडक अनन्य भक्तांवर अद्भुत असा पारमार्थिक कृपाप्रसाद देखील करतात. म्हणूनच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज नृसिंहवाडीला मोठ्या प्रेमाने "दत्ताची राजधानी सुखाची ।" असे यथार्थ गौरवितात.
पू.मामांच्या या मार्मिक वाक्यावर थोडा विचार करूया. 'दिवाना' या शब्दाचा अर्थ आहे प्रेमात वेडा झालेला. गाणगापूर हे देवांवर प्रेम करणा-या आम भक्तांचे, म्हणजेच गीतेत सांगितलेल्या आर्त, अर्थार्थी व जिज्ञासू अशा तीन प्रकारच्या भक्तांचे स्थान आहे. तर श्रीनृसिंहवाडी हे खास भक्तांचे, म्हणजेच गीतेत सांगितलेल्या ज्ञानी भक्तांचे स्थान आहे. गाणगापूरला देव आर्तांचे लौकिक कल्याण करायला बसलेले आहेत, तर वाडीला तेच भक्तांवर परमार्थाची कृपा करून शाश्वत कल्याण करायला स्थानापन्न झालेले आहेत. पू.मामांच्या या वचनाची प्रचिती आज देखील आपण घेऊ शकतो. गाणगापूर आणि वाडी ही दोन्ही त्यांचीच प्रभावी स्थाने असली, तरी तेथील एकूण वातावरण व भाव पूर्णत: भिन्न आहे. वाडी हे जास्त परमार्थानुकूल स्थान असल्याचे त्वरित जाणवते.
आजच्या या परमपावन पुण्यतिथीला, सर्व संतांचे गुरुस्वरूप असणा-या भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय महाप्रभूंच्या आणि गुरूणां गुरु भगवान श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या सकलतीर्थास्पद अम्लान श्रीचरणकमलीं, सर्वांच्या वतीने वारंवार दंडवतपूर्वक कृपायाचना करतो. आजच्या या श्रीगुरुप्रतिपदा सुमुहूर्तावर, आम्हां सर्वांच्या हृदयात शांतस्निग्ध व नित्यसुगंधी असा श्रीकृपादीप निरंतर उजळो व त्याच्या प्रकाशात गुरूपदिष्ट साधन प्रेमाने व नेमाने अखंड घडून, आमचे अवघे भावविश्वच सद्गुरुमय होऊन ठाको, हीच भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीगुरुरायांच्या श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना  !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

16 comments:

  1. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  2. श्री सदगुरवे नमः
    🙏🙏🙏🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. Avadhoot Chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏 khup sunder lekh.. . .Wonderful.

    ReplyDelete
  4. 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏 अतिसुंदर व प्रभावी ज्ञानामृत भक्तांच्या मनातील श्रीगुरूप्रेम अधिक दृढ करणारा हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. याबद्दल आपणांस शतक: प्रणाम. व धन्यवाद.
    -विठ्ठल पांढरे, पुणे.

    ReplyDelete
  5. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🚩

    ReplyDelete
  6. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  7. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  8. ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
    🙏🙏

    ReplyDelete
  9. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त...
    नारायण..🙏

    ReplyDelete
  10. या सर्व दत्तप्रभु रूप विभूतींना सहस्र दंडवत💐💐

    ReplyDelete
  11. I श्रीराम जयराम जय जय राम II🙏🌹🙏. फार छान लेख. स्वामी नृसिहसरस्वती माऊली.

    ReplyDelete
  12. तस्मै श्री गुरवे नम: 🙏🙏

    ReplyDelete