1 Feb 2017

वसंतपंचमीचा सुमुहूर्त

आज माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमी ! या तिथीला श्रीपंचमी देखील म्हणतात.
उत्तरभारतात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वसंतोत्सवाची सुरुवात म्हणून गोकुळातही हा आनंददायक उत्सव साजरा होतो. भगवती श्रीसरस्वतीची विशेष उपासना या दिवशी केली जाते. कारण ही ज्ञानदात्या शारदा वागीश्वरीची, भगवती श्रीसरस्वतीची जयंतीच मानली जाते. तसेच ही कामदेवांचीही जयंती. त्यामुळे उत्तम वैवाहिक जीवनासाठी यादिवशी रती-कामदेवांचेही पूजन करण्याचा आपल्याकडे पूर्वापार प्रघात आहे.
आजच्या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे, आजच्याच सुमुहूर्तावर भगवान श्रीकृष्ण व वज्रचूडेमंडित अखंडसौभाग्यवती भगवती रुक्मिणीमातु:श्रींचा विवाह द्वारकापुरीत संपन्न झाला होता. तसेच आजच्याच तिथीला भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या आई-वडिलांचा, श्री विठ्ठलपंत व सौ.रुक्मिणीबाईंचाही आळंदी येथे विवाह झाला होता.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी पैठण क्षेत्री इ.स.१२८८ मध्ये रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. अर्धोदय पर्वणीवर, पौष अमावास्येला सुरू झालेले ते वेदपठण, वसंत पंचमीच्याच पावन मुहूर्तावर पाच दिवसांनी पूर्ण झाले होते. साक्षात् भगवान श्री माउलींची अमोघ कृपा लाभलेला तो ज्ञान्या रेडा, पाच दिवस अविरत वेदपठण करीत होता. त्यावेळी पैठण मधील बोपदेवादी ब्रह्मवृंदाने सही शिक्क्यानिशी श्री माउलींना दिलेले 'शुद्धीपत्र' आजही उपलब्ध आहे. यात भगवान श्री माउलींनी केलेल्या अलौकिक लीलांचा, त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षीने केलेला स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो.
आजच्याच तिथीला इ.स.१६०९ मध्ये संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय, देहू गावातील आंबिले(मोरे) या निष्ठावंत वारकरी घराण्यात, कनकाई व बोल्होबा यांच्या पोटी जन्मले. त्यांच्या घराण्यात महाजनकी म्हणजेच सावकारी होती. पण सगळे वारकरी संस्कार असल्याने लोकांची अजिबात पिळवणूक होत नसे.
श्री तुकोबाराय हे भगवंतांचे नित्य पार्षदच होते. श्रीनृसिंह अवतारात भक्तवर प्रल्हाद, श्रीरामावतारात अंगद, श्रीकृष्णावतारात सखा उद्धव, श्री माउलींच्या अवतारकालात श्री नामदेव महाराज व नंतर श्री तुकोबाराय, त्यानंतर पंढरी क्षेत्री श्री तुकाविप्र महाराज व शेवटी श्री चिदंबरशिष्य श्री राजाराम महाराज; असा हा युगानुयुगे चालू असलेला अद्भुत अवतारक्रम आहे.
श्री तुकोबांना सद्गुरु श्री.बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नात अनुग्रह केलेला होता. त्यांची अलौकिक अभंगरचना हा एक चमत्कारच आहे. रोकडा ब्रह्मानुभव नेमक्या व स्वानुभूत शब्दांमध्ये, परखडपणे सांगण्याची त्यांची हातोटी अद्वितीयच म्हणायला हवी.
अशी ही वसंतपंचमी म्हणजे एक मोठा उत्तम मुहूर्तच होय. या पावन पर्वानिमित्त, भगवान श्रीरुक्मिणी-पांडुरंग, भगवान श्री माउली व श्रीसंत तुकोबाराय यांच्या अम्लान श्रीचरणारविंदी आपण साष्टांग दंडवत घालून विनवूया ! "आमच्या हृदयी सद्गुरुकृपा रूप सरस्वतीचे प्रकटीकरण करवून, आमच्या चित्तात प्रसन्नमाधवी बहरून अर्थात् कृपा-वसंताची संपन्न पखरण करून खरी 'वसंतपंचमी'  घडवून आम्हांलाही धन्य करावे" ; हीच कळकळीची प्रार्थना करूया !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

9 comments:

  1. छान. प्रेरणादायी. सप्तशती 11 व अध्याय लगेच म्हटला.

    ReplyDelete
  2. वसंत पंचमी हा खरच महापर्वणी दिनच होय !

    ReplyDelete
  3. भरच पडते ह्या पावन दिनाची

    ReplyDelete
  4. भरच पडते ह्या पावन दिनाची

    ReplyDelete
  5. अप्रतिम आणि माहितीपूर्ण लेख रोहनजी. वसंत पंचमी बद्दल एवढी सविस्तर माहिती प्रथमच वाचली. धन्यवाद

    ReplyDelete
  6. वसंत पंचमी चे खूप छान वर्णन 🙏🙏🙏

    ReplyDelete
  7. आजच्या दिन विशेषाबद्दल छान माहिती 👌

    ReplyDelete