14 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ५

अत्यंत भयानक अशा संसाररूपी महासागराच्या भीतीने व्यथित झालेला जीव, दयानिधी भगवान श्रीनृसिंहराज महाराजांची प्रार्थना करताना म्हणतो,
संसार-सागर-विशाल-कराल-काल
नक्र-ग्रह-ग्रसित-निग्रह-विग्रहस्य ।
व्यग्रस्य राग-निचयोर्मि-निपीडितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥९॥

"हा अत्यंत विशाल असा संसारसागर आणि त्यात राहणा-या कराल सुसरी-मगरी व अन्य हिंस्र प्राण्यांनी माझा निग्रह (मनाचा संयम, निश्चय) आणि देह (विग्रह) जणू गिळूनच टाकलेला आहे. मी या संसाराच्या भानगडीत एकदम व्यग्र होऊन गेलोय, पूर्णपणे गुंतलोय, गोंधळलोय. मला काहीच सुचेनासे झालेले आहे. या संसारसागरात (चित्तात) निर्माण होणा-या विविध विषयांच्या ऊर्मी व वासनारूप भयंकर लाटांच्या थपडांनी (निचयोर्मि-निपीडितस्य) मी बेजार झालो आहे. देवा नरहरीराया ! आता आपणच हात देऊन माझी या संसारसागरातून सुटका करा, माझा सांभाळ करा !"
संसार-सागर-निमज्जन-मुह्यमानं
दीनं विलोकय विभो करुणानिधे माम् ।
प्रल्हाद-खेद-परिहार-कृतावतार
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१०॥
"हे करुणानिधान भगवंता ! या गहन संसारसागरात मी सतत गटांगळ्या खातो आहे. जणू काही गटांगळ्या खाण्याचे ते एकमेव कामच मी पत्करले आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे मी अतिशय दीन अवस्थेला येऊन ठेपलेलो आहे.
हे दयासागरा ! आपण पूर्वी भक्तवर प्रल्हादांच्या अशाच भयावह दु:खांचा परिहार करण्यासाठी अवतार धारण केला होतात. तेव्हा आता माझ्याही या तीव्र संसारदु:खांचा आपणच नाश करावा. मला तरी आपल्याशिवाय अन्य कोणाचा आधार आहे ? आपण आता माझ्याकडेही तशाच दयादृष्टीने पाहून मला सौख्य प्रदान करावे, माझे संरक्षण करावे."
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ५
(श्रीनृसिंह पुराणातील मार्कंडेय महामुनींच्या कथेचा पुढील संदर्भ व नृसिंहनामाचे माहात्म्य सांगणा-या यमगीतेचा भावार्थ.)
विदारूनि महास्तंभ.... - ५
(हिरण्यकश्यपूची पूर्वकथा व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी कथन केलेले श्रीनृसिंह अवताराचे गूढगहन आणि अभिनव योगार्थ-विवरण.)

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_25.html?m=1 )


0 comments:

Post a Comment