18 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ९

भगवान श्रीनरहरीरायांच्या अनन्यभक्तांचे प्रेमभावे स्मरण करताना भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज म्हणतात,
प्रल्हाद-नारद-पराशर-पुण्डरीक-
व्यासादि-भागवत-पुङ्गवहृन्निवास ।
भक्तानुरक्त-परिपालन-पारिजात
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१६॥

"हे प्रभो नरहरीराया ! प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक(पुंडलीक), व्यास आदी आपल्या श्रेष्ठ भागवतांच्या, अनन्यभक्तांच्या हदयातच आपण सदैव वास करता, आपल्यावर अनुरक्त झालेल्या आपल्या भक्तांचे आपण अत्यंत प्रेमाने, मातृवात्सल्याने पालन करता. त्यांच्यासाठी आपण प्रत्यक्ष पारिजात म्हणजे कल्पतरूच आहात, त्यांच्या सर्व इच्छा आपणच पूर्ण करता. तेव्हा हे करुणामय देवाधिदेवा, आता आपण माझीही इच्छा पूर्ण करा, मला आपल्या हातांचा आधार देऊन या भवसागरातून पार करा !"
प्रस्तुत करावलम्बन स्तोत्राची अलौकिक फलश्रुती सांगताना भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात म्हणतात,
लक्ष्मीनृसिंहचरणाब्जमधुव्रतेन
स्तोत्रं कृतं शुभकरं भुवि शंकरेण ।
ये तत्पठन्ति मनुजा हरिभक्तियुक्ता-
स्ते यान्ति तत्पद-सरोजमखण्डरूपम् ॥१७॥

"भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील मकरंद सतत सेवन करण्याचे व्रत घेतलेल्या, अर्थात् श्रीनृसिंहचरणीं सदैव रत असलेल्या मी शंकराने हे स्तोत्र जगाच्या कल्याणासाठीच रचलेले आहे. या स्तोत्राचे जे भक्त मनोभावे पठण करतील त्यांच्या हृदयात अतिशय दुर्लभ अशी हरिभक्ती प्रकट होईल अाणि शेवटी सच्चिदानंदघन श्रीभगवंतांच्या श्रीचरणांची त्यांना प्राप्ती होईल !"
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या स्तोत्र रचनांमधील अतीव सुंदर, माधुर्यपूर्ण व गेय अशी ही रचना आहे. हे स्तोत्र प्रत्यक्ष श्री आचार्यांनाही आवडत असे व भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांचेही या स्तोत्रावर अतिशय प्रेम आहे. म्हणूनच या स्तोत्राच्या माध्यमातून श्रीभगवंतांनी या नवरात्रकालात आपल्याकडून ही जी आराधना करवून घेतली, ती सर्व त्याच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो. आपणही सर्वांनी नियमितपणे या स्तोत्राचे पठण करून श्रीनृसिंह भगवंतांची कृपा संपादन करावी ही प्रेमळ विनंती.
काल श्रीनृसिंह जयंतीच्या दिवशी भगवान श्रीनृसिंहराज महाराजांची सहस्र बिल्व, तुलसी व श्वेतपुष्पांची अर्चना व जन्मकाल महापूजा संपन्न झाली. त्याचेही फोटो या पोस्ट सोबत देत आहे.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ९
(श्रीनृसिंह नवरात्र लेखमालेच्या सांगतेचा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ९
(श्रीनृसिंह नवरात्र लेखमालेच्या सांगतेचा लेख.)
https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html?m=1

0 comments:

Post a Comment