11 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - २

राजराजेश्वर भगवान श्रीनृसिंहप्रभू हे सर्व देवांनाही पूज्य असून साक्षात् परब्रह्मच आहेत, हे सांगताना श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज करावलम्बन स्तोत्राच्या दुस-या श्लोकात म्हणतात,
ब्रह्मेन्द्र-रुद्र-मरुदर्क-किरीट-कोटि-
संघट्टिताङ्घ्रिकमलामल-कान्ति-कान्त ।
लक्ष्मीलसत्कुच-सरोरुह-राजहंस
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥२॥

"हे देवाधिदेवा ! जगत्पिता ब्रह्मदेव, महाकाल रुद्र, इंद्रादी देवता, मरुद्गण आणि सूर्यासारखे कोट्यवधी देवही सदैव आपल्या श्रीचरणीं मस्तक ठेवून आपल्याला प्रणाम करीत असतात. त्यावेळी त्यांच्या मस्तकांवरील मुकुटांची टोके आपल्या पदकमलांना घासली जातात. अर्थात् या प्रभावशाली देवताही आपल्यासमोर नतमस्तक होत असतात. आपल्या दिव्य देहाची कांती, म्हणजेच तेज हे अतिशय स्वच्छ व निर्दोष (अमल) आहे, ज्यामुळे आपण फारच मनोहर दिसत आहात. आपली अभिन्न शक्ती असलेल्या श्रीलक्ष्मीमातेच्या कमलाप्रमाणे शोभून दिसणा-या वक्ष:स्थलरूप सरोवरात आपण जणू ऐटदार राजहंसाप्रमाणे दिसत आहात.(अर्थात् आपण सदैव भगवती लक्ष्मीमातेच्या हृदयातच विराजमान असता.) अशा सर्वसामर्थ्यसंपन्न राजाधिराज श्रीलक्ष्मीनृसिंह प्रभो, आपण मला आपल्या हातांचा आधार द्यावा, माझे संरक्षण करावे !"
स्तोत्राच्या तिस-या श्लोकात, सभोवतीच्या भयंकर संसारतापाने पोळलेल्या व श्रीनृसिंहांना शरण आलेल्या जीवांचे प्रतिनिधी म्हणून श्री आचार्य श्रीनृसिंहप्रभूंना कळवळून प्रार्थना करताना म्हणतात,
संसारदावदहनाकुल-भीकरोरु-
ज्वालावलीभिरतिदग्धतनूरुहस्य ।
त्वत्पादपद्मसरसीं शरणागतस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥३॥

प्रभो नरहरीराया ! माझ्या अवतीभवती भडकलेला हा संसाररूप वणवा (संसारदाव) आणि चोहोबाजूंनी उठणा-या त्याच्या ज्वाला फार भयंकर आहेत. त्यांच्यामुळे माझ्या अंगावरील केसही जळून गेलेले आहेत. मी यात पुरता होरपळून निघत आहे. म्हणूनच आता या असह्य तापातून शांती व शीतलता मिळवण्यासाठी, मी आपल्याच श्रीचरणकमल रूपी सरोवराचा (पादपद्मसरसी) आश्रय आता घेतला आहे. मी आपल्याला सर्वभावे शरण आलेलो आहे, आता आपणच दयावंत होऊन मला आपल्या करकमलांचा आधार द्यावा, माझे या संसारतापातून रक्षण करावे."
गळाला लागलेल्या माशाप्रमाणे अपार वेदनांनी तडफडणा-या, संसाररूप गळाला लागलेल्या जीवरूप माशाचे करुण मनोगत व्यक्त करताना श्री आचार्य स्तोत्राच्या चौथ्या श्लोकात म्हणतात,
संसारजालपतितस्य जगन्निवास
सर्वेन्द्रियार्थबडिशाग्रझषोपमस्य ।
प्रोत्कम्पित-प्रचुर-तालुक-मस्तकस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥४॥

"हे जगन्निवासा नरहरीराया ! आमिषाच्या लालसेने गळाला लागलेल्या माशाला, जसे त्या गळाच्या अणकुचीदार टोकाने (बडिश-अग्र) टाळू फाटल्यामुळे तीव्र वेदना होत असतात, तशाच या संसाररूप गळाला लागून टाळू फाटलेल्या माझ्यासारख्या जीवरूप माशाला (झषोपमस्य) अपार वेदनांचाच सतत अनुभव येत असतो. या संसाररूप जाळ्यात सापडलेल्या व त्यातील गळाच्या वेदनेने तडफडणा-या (प्रोत्कंपित) माझ्यासारख्या शरणागत जीवावर आपण आता दया करावी, त्याला आपल्या शुभद करकमलांचा आधार देऊन सुखी करावे, हीच कळकळीची प्रार्थना !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - २
विदारूनि महास्तंभ.... - २

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_28.html?m=1 )


0 comments:

Post a Comment