12 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ३

संसार दु:खमूळच असल्याने, त्यात जन्माला आलोय म्हणजे आपल्या सर्वांना ते अटळ दु:ख सहन करावे लागणारच. त्या दु:खाने व्याकूळ झालेल्या जीवाची जीवघेणी व्यथा श्रीनरहरीरायांना सांगताना, श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्राच्या पाचव्या चरणात म्हणतात,
संसारकूमपतिघोरमगाधमूलं
सम्प्राप्य दुःख-शत-सर्प-समाकुलस्य ।
दीनस्य देव कृपया पदमागतस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥५॥

"प्रभो नरहरीराया ! हा संसार एक भयंकर असा खोल कूप (लहान तोंडाची अतिशय खोल विहीर) आहे. याच्या तळाचा थांगच लागत नाही. दुर्दैवाने मी या कूपात पडलोय. चोहोबाजूंनी शेकडो विषारी सापांनी घेरावे, त्याप्रमाणे मला अनंत दु:खांनी वेढलेले आहे. या दु:खांमुळे अतिशय व्याकूळ होऊन आता हे दीनदयाळा, तुमच्याच चरणीं मी शरण आलेलो आहे. दीनांचे आपणच कैवारी आहात, तेव्हा आता मला हात देऊन माझी या संसारकूपातून सुटका करा, माझा उद्धार करा !"
संसार हा जणू मागे लागलेला पिसाळलेला हत्तीच आहे, अशा भावनेने प्रार्थना करणारा जीव म्हणतो,
संसार-भीकर-करीन्द्र-कराभिघात-
निष्पीड्यमान-वपुषः सकलार्तिनाश ।
प्राण-प्रयाण-भव-भीति-समाकुलस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥६॥

"हे भगवंता, श्रीनरहरीराया ! अतिशय खवळलेला, पिसाळलेला असा हा संसाररूपी मोठा हत्ती (करीन्द्र) माझ्यामागे लागलेला आहे. तो आपल्या सोंडेने पकडून मला सारखा आपटत आहे. त्याच्या आघातांनी माझे शरीर जर्जर झाले आहे, पिळवटून निघत आहे (निष्पीड्यमान-वपुष). त्यामुळे आता माझे प्राणही वाचतील की नाही हे सांगता येत नाही. देवाधिदेवा, आपण तर 'सकलार्तिनाश' आहात, म्हणजेच सर्वांच्या दु:खांचा समूळ नाश करणारे म्हणूनच प्रसिद्ध आहात. तेव्हा संसाररूपी हत्तीमुळे आर्त झालेल्या माझाही या भयानक दु:खातून आता आपणच उद्धार करा, मला आता हात देऊन आपणच सुखरूप बाहेर काढा."
कळवळून केलेली प्रत्येक प्रार्थना श्रीभगवंतांपर्यंत नक्कीच पोचते, म्हणूनच श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराज येथे भगवान श्रीनरहरीरायांची मनोभावे प्रार्थना करीत आहेत.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ३
विदारूनि महास्तंभ.... - ३

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_23.html?m=1 )




0 comments:

Post a Comment