15 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ६



जंगलामध्ये संरक्षण करणारी देवता म्हणून भगवान श्रीनृसिंह सुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे संसाररूप अरण्यात हरवलेला, घाबरलेला जीव त्यांची कळवळून प्रार्थना करताना म्हणतो,
संसार-घोर-गहने चरतो मुरारे
मारोग्र-भीकर-मृग-प्रचुरार्दितस्य ।
आर्तस्य मत्सर-निदाघ-सु-दुःखितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥११॥
"हे (मुरारे) मुर दैत्याचा नाश करणा-या भगवंता ! या संसाररूप निबिड आणि घोर अरण्यात निरर्थक भटकणा-या माझ्या मागे, कामरूपी उग्र ढाण्या वाघ लागलेला आहे. त्याच्या भीतीने, त्रासाने मी पार घायकुतीला आलेलो आहे, मला काहीच सुचेनासे झाले आहे. त्यातच या अरण्यातल्या द्वेष व मत्सररूप उन्हाच्या तापाने मी पूर्ण त्रासून गेलो आहे, अस्वस्थ झालेलो आहे. अशा या घोर अरण्यात आपल्याशिवाय माझे रक्षण दुसरे कोण बरे करणार ? म्हणून हे दीनदयाळा, आता आपणच माझे संरक्षण करा, मला या भयंकर संसार अरण्यातून बाहेर काढा, माझा उद्धार करा !"
प्रत्येक जीव अाठ पाशांनी बांधलेला असतो, म्हणूनच त्याला 'पशू' म्हटले जाते ; आणि त्यातून बाहेर काढणारे भगवंत 'पशुपती' म्हटले जातात. पशुपती हे खरेतर भगवान श्रीशिवांचे नाव आहे. पण इथे ते भगवान श्रीनृसिंहांनाही लागू होते, कारण मुळातच ते मृगेंद्र म्हणजे सर्व पशूंचे राजेच तर आहेत. अशा पशुपती भगवान श्रीनृसिंहांना संसाराच्या शेकडो पाशांनी बांधला गेलेला जीवरूप पशू व्याकूळ होऊन विनवितो की,
बद्ध्वा गले यमभटा बहु तर्जयन्त:
कर्षन्ति यत्र भवपाशशतैर्युतं माम् ।
एकाकिनं परवशं चकितं दयालो
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१२॥
"आधीच आशा, ममता, इच्छा, द्वेष इत्यादी शेकडो भवपाशांनी बांधल्या गेलेल्या मला, आता हे दुष्ट यमदूतही गळ्यात गच्च पाश अडकवून, गळफास लावून प्रचंड ओढत आहेत. मी पूर्णपणे एकाकी पडलेलो असून परवशही झालेलो आहे. सर्वस्वी या यमदूतांच्या मर्जीवरच माझे सगळे अवलंबून आहे. मला एकट्याला तुमच्याशिवाय आता कसलाही आधार राहिलेला नाही. म्हणूनच, हे अहेतुकदयानिधी नरहरीराया ! आता आपणच माझा कृपाळूपणे सांभाळ करा, माझा उद्धार करा !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना. 
नरहरी तो माझा - ६ 
(पूर्णब्रह्म भगवान श्रीनृसिंहांचे पूर्णावतार स्वरूप स्पष्ट करणारा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ६
(भगवान श्रीनृसिंह आणि श्रीदत्तसंप्रदायाचा विलक्षण ऋणानुबंध स्पष्ट करणारा महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण लेख.)
https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html?m=1
)


0 comments:

Post a Comment