10 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - १

आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी परमकरुणामूर्ती भगवान श्रीनरहरीरायांच्या परमपावन नवरात्राचा प्रथम दिन. भगवान श्रीनृसिंहराज महाराजांच्या प्रतिवार्षिक गुणगायन सेवेचा आज शुभारंभ.
काल ज्यांची जयंती आपण साजरी केली ते अद्वैतज्ञानभास्कर भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीनरहरीरायांचे निस्सीम भक्तराज होते. त्यांनी अतीव भावपूर्ण शब्दांमध्ये आपल्या या आराध्य दैवताचे विविध स्तोत्रे रचून गुणवर्णन केलेले आहे. यावर्षी नवरात्राच्या पर्वकालात आपण श्रीमदाचार्यांच्या 'श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बन' स्तोत्राच्या माध्यमातून श्रीचरणीं सप्रेम तुलसी-पुष्पांजली समर्पू या !
कर्दळीवनातील दुष्ट कापालिकाने श्री आचार्यांचा बळी देऊन आपल्या दैवताची प्रसन्नता मिळवण्याचा हीन प्रयत्न केला. पण भक्ताभिमानी श्रीनृसिंह भगवंतांनी श्रीमद् पद्मपादाचार्यांच्या देहाचा आश्रय घेऊन त्या कापालिकाचाच वध केला. तेव्हापासून श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांना भगवान श्रीनृसिंहांबद्दल अत्यंत प्रेम वाटू लागले. देवांनी सदैव त्यांचा पितृवत् सांभाळ केला व श्रीमदाचार्यही त्यांच्याविषयी पुत्रवत् प्रेमानेच कायम कृतज्ञता बाळगून होते. त्यांच्या त्या स्वाभाविक प्रेमावेगाचे सुमधुर दृश्य रूप म्हणजेच श्री आचार्य रचित ही सर्व नृसिंह स्तोत्रे होय. श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्र हे त्या सर्व नृसिंहस्तोत्रांमधील अात्यंतिक अर्थगर्भ, भावमय, सुगेय व लालित्यपूर्ण असे स्तोत्र आहे. स्वत: श्रीमद् आचार्यांनाही हे स्तोत्र अतिशय आवडत असे व श्रीनृसिंहदेवांनाही त्यामुळेच हे स्तोत्र विशेष प्रिय आहे. या स्तोत्राच्या प्रेमभावे केलेल्या पठणाने भगवान श्रीनृसिंहाचा कृपाप्रसाद लाभतो व अतिशय दुर्मिळ अशी त्यांची प्रेमभक्ती देखील प्राप्त होते. तसा श्रीभगवंतांनी स्वत:च या स्तोत्राला प्रेमाशीर्वाद दिलेला आहे. म्हणूनच, यावर्षी श्रीनृसिंह जयंती नवरात्रात आपण या मधुरातिमधुर स्तोत्रातील श्लोकांचा यथामती विचार करू या व त्याद्वारे इवलासा का होईना पण आपलाही मोडका तोडका श्रद्धा-प्रेमभाव श्रीचरणीं समर्पून धन्य होऊ या ! स्तुतिप्रिय श्रीभगवंत आमच्या या लेकुरवाचेने होणा-या सेवापुष्पांना स्वीकारोत, हीच त्यांच्या अम्लान श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना !
भगवत्पूज्यपाद श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्राच्या पहिल्या चरणात म्हणतात,
श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे
भोगीन्द्रभोगमणिराजित पुण्यमूर्ते ।
योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१ ॥

"सर्व रत्नांच्या संपत्तीने, ऐश्वर्याने युक्त असा क्षीरसागर (पयोनिधी) ज्यांचे निवासस्थान (निकेतन) आहे, ज्यांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी हातात सुदर्शन चक्र धारण केलेले आहे, ज्यांची पुण्यकारक परम मंगलमय श्रीमूर्ती सर्व सर्पांचा राजा (भोगींद्र) अशा शेषनागाच्या उत्तम देहावर (भोगमणि) शोभून दिसते आहे, जे सर्व योग्यांचे ईश आहेत, या मर्त्य जगात केवळ जे एकच शाश्वत, अविनाशी असून, शरण आलेल्या भक्तांचा सर्व बाजूंनी सांभाळ करण्यात सदैव रत आहेत ; आणि जे भयंकर अशा भवसागरातून सहज पार जाण्यासाठी जणू जहाजच (भवाब्धिपोत) आहेत, अशा हे श्रीलक्ष्मीनृसिंह प्रभो ! आपण मला आपल्या हातांचा आधार द्या, माझा उद्धार करा !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंहचरित्र विषयक दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - १
विदारूनि महास्तंभ.... - १

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post.html?m=1 )

0 comments:

Post a Comment