21 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पहिला



आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीरायांच्या जयंती नवरात्राचा पहिला दिवस. आजपासून आमच्या लाडक्या भगवंतांच्या विशेष उपासनेला सुरुवात होत आहे. या नवरात्रात आपल्याला भगवान श्रीनृसिंहांचा उदंड भक्तिकल्लोळ करायचा आहे. त्यासाठी सर्वांचे येथे मन:पूर्वक स्वागत करतो.
श्रीनृसिंह अवताराच्या विलक्षण लीलांवर गेल्यावर्षी श्रीकृपेने स्वतंत्र लेखमाला लिहिली गेली होती. यंदा आता त्याहून वेगळे, पण रोचक आणि भक्तिवर्धक असे नवीन काही देण्याचा प्रयत्न करतो आहे. दररोजच्या लेखात गेल्या वर्षीच्या लेखाची लिंक दिलेली असेलच. वाचकांनी त्या लिंकवरून आधीचे लेखही वाचावेत ही विनंती. त्यामुळे पुन्हा तेच न सांगता नवीन माहिती तेवढी या लेखातून दिली जाईल.
भगवान श्रीनृसिंह ही वेदकालीन देवता नसावी, असे अनेक अभ्यासकांचे प्रामाणिक मत आहे. कारण वेदांमध्ये व ब्राह्मणग्रंथांमध्ये कुठेही श्रीनृसिंहांचा उल्लेख सापडत नाही, परंतु आरण्यक ग्रंथांपैकी कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय अारण्यकात पहिल्यांदा श्रीनृसिंह गायत्री मंत्र आलेला आहे. पुराण वाङ्मयात मात्र या देवासंबंधी विपुल माहिती आलेली आहे. मुख्य अठरा पुराणांपैकी चौदा पुराणांमध्ये श्रीनृसिंहांची कथा कमी-अधिक प्रमाणात येते. तसेच उपपुराणांमध्ये गणले जाणारे श्रीनृसिंहपुराण हे अडुसष्ठ अध्यायांचे सुंदर असे स्वतंत्र पुराणही उपलब्ध अाहे. यावर्षीच्या या लेखमालेतून नृसिंहपुराणातील काही विशेष कथा व घरच्या घरी करता येऊ शकतील अशा श्रीनृसिंह उपासनांचा भाग आपण पाहणार आहोत.
भगवान श्रीनृसिंहांचे नाम हे सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्ती देणारे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे भय उत्पन्न झाले असता किंवा संकट प्राप्त झाले असता श्रीनृसिंहस्मरण करावे, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. जंगलात वाट चुकून आपण एकाकी पडलो असताना किंवा जंगली श्वापदांची भीती उत्पन्न झाली असताना जोरजोरात श्रीनृसिंहनामाचा गजर करावा असे पूर्वीच्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहे. श्रीनृसिंहस्मरण करणा-याला जगात कसलेही भय राहात नाही, असे प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरांनी पार्वतीमातेला सांगितलेले आहे. दुर्लंघ्य अशा कालभयाचाही नाश नृसिंहस्मरणाने होतो, असे जगाला ग्रासणारा महाकालच येथे सांगत आहे. श्रीनृसिंहस्मरणाचे माहात्म्य काय अलौकिक आहे पाहा ! म्हणूनच आजच्या श्रीनृसिंह नवरात्राच्या प्रथमदिनी, श्रीनरहरीरायाच्या आवडत्या शनिवारी, स्तुतिप्रिय भगवान श्रीनृसिंहराज महाराजांचा मनोभावे नामगजर करून आपणही या नवरात्र उपासनेचा श्रीगणेशा करू या !!
भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ  
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पहिला 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post.html?m=1

1 comments: