13 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ४

संसाररूपी महान विषारी नागाच्या चाव्याने व्याकूळ झालेला जीव भगवान श्रीनृसिंहांना कळवळून प्रार्थना करीत म्हणतो,
संसार-सर्प-विष-दिग्ध-महोग्र-तीव्र
दंष्ट्राग्र-कोटि-परिदष्ट-विनष्ट-मूर्ते: ।
नागारि-वाहन सुधाब्धिनिवास शौरे
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥७॥

"प्रभो नरहरीराया ! ह्या संसाररूपी महाभयंकर नागाने (महोग्र) मला दंश केला आहे. या नागाच्या विषाने भरलेल्या तीक्ष्ण व अणकुचीदार दाढा माझ्या शरीरात रोवल्या गेल्याने, मी अगदी गलितगात्र झालो आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. माझ्या शरीरात आता कसलेही त्राणच उरलेले नाहीत. तेव्हा हे गरुडवाहना, अमृतोपम क्षीरसागरात निवास करणा-या देवाधिदेवा ! आपणच आता मला हात देऊन यातून बाहेर काढावे, माझे संरक्षण करावे."
श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांनी येथे फार महत्त्वाची व नेमकी अशी तीन विशेषणे वापरलेली आहेत. नागारि म्हणजे गरुड, ते ज्यांचे वाहन आहे, ते 'नागारिवाहन'. संसाररूपी नागाच्या विष-पीडेतून सोडवण्यासाठी त्या नागांचा शत्रू असणा-या गरुडाचाच ते येथे मुद्दाम उल्लेख करतात.
नागाच्या विषाने मरायला टेकलेल्या माणसावर अमृताचा शिडकावा झाला, तरच तो त्यातून नक्की वाचू शकेल. म्हणून ते येथे 'सुधाब्धिनिवास' हेच विशेषण वापरतात. अर्थात् अमृतमय क्षीरसागरात निवास करणा-या प्रभूंनाच अमृताची वृष्टी करण्याची ते प्रेमाने विनवणी करतात.
तसेच त्यांनी 'शौरी' हेही विशेषण वापरले आहे. शौरी म्हणजे शूर कुलात जन्मलेले, स्वभावाने शूर असणारे. शूर व्यक्ती शरण आलेल्याचा कधीच अव्हेर करीत नाही, हे जाणून माझाही तुम्ही अव्हेर करू शकत नाही, करू नये ; अशी विनवणी श्रीमद् आचार्य येथे करीत आहेत. अतिशय अचूक व यथार्थ शब्दयोजना करणे ही तर श्रीमद् शंकचार्यचरणांची खासियतच आहे !
संसाररूपी भयानक वृक्षाच्या भयाने कासावीस झालेला जीव भगवंतांची प्रार्थना करताना आठव्या श्लोकात म्हणतो,
संसारवृक्षमघबीजमनन्तकर्म-
शाखायुतं करण-पत्रमनङ्गपुष्पम् ।
आरुह्य दुःखफलिनं पततो दयालो
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥८॥

"हे दयालू नरहरीराया ! ह्या अतिशय जटिल व अडचणीच्या अशा संसारवृक्षावर मी अज्ञानाने चढलेलो आहे. नकळत फार वरपर्यंत गेलो आहे. यावरून मी आता पडू पाहात आहे, त्यामुळे आपणच कृपा करून मला हात देऊन सांभाळावे, माझे रक्षण करावे !"
श्रीमद् आचार्यांची शैली अत्यंत सुंदर आहे. ते कठीण तत्त्वज्ञानाचा विषय मनोहर रूपकांमधून अगदी सोपा करून आपल्या समोर मांडतात. त्यांच्या शैलीचे प्रसन्न दर्शन या श्लोकात आपल्याला होते.
हा संसारवृक्ष कसा आहे ? तर, अघबीज म्हणजे पाप हेच त्याचे बी आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये जी पाप-पुण्यकर्मे आम्ही केली, तीच या जन्माला (या जन्मांतील भोगांना ) कारणीभूत झालेली आहेत. म्हणून पाप हे याचे बीज आहे. या संसारवृक्षाला अनंत प्रकारच्या कर्मरूप शाखा आहेत. आपली इंद्रिये हीच त्याची पाने आहेत. कारण इंद्रियांच्याच माध्यमातून जीव कर्मांना प्रवृत्त होत असतो. काम हाच या संसारवृक्षाचा फुलोरा आहे. काम म्हणजे यच्चयावत् सर्व प्रकारच्या कामना. या कामना दिसायला फुलांसारख्या छान असल्या तरी शेवटी त्या दु:खदायकच ठरतात. त्यामुळे विविध प्रकारची दु:खे हीच या कामनारूप फुलांपासून बनलेली संसारवृक्षाची फळे आहेत. अशा या अत्यंत जटिल व भयंकर संसारवृक्षावर मी स्वत:च्या कर्मांनी चढून तर बसलोय, पण दयाळा नरहरीराया ! आता या संकटातून केवळ आपणच माझा उद्धार करू शकता. आपण जर हात दिला नाहीत, तर मी या संसारवृक्षावरून खाली पडून माझा कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. तेव्हा दयेचे सागर असणा-या हे नरहरीराया, आता आपणच माझे संरक्षण करा !
अशा रचना पाहिल्या की जाणवते, भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे फार फार विलक्षण असे शब्दप्रभूच आहेत. या दोन्ही महान अवतारांना केवळ मौनभावाने साष्टांग दंडवत घालणेच आपल्याला शक्य आहे आणि तेच आपले परमभाग्यही ठरावे !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ४
(श्रीनृसिंह पुराणातील मार्कंडेय महामुनींची कथा.)
विदारूनि महास्तंभ.... - ४
(भगवद्भक्तीचे श्रेष्ठत्व व भक्तराज प्रल्हादांचे माहात्म्य.)

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_24.html?m=1


0 comments:

Post a Comment