17 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ८

आज भगवान श्रीनरहरीरायांचा परमपावन प्रकटदिन. आजच्या सायंकाळी ते परब्रह्म पुन्हा अवतरणार आहे, भक्तकरुणाकर हे आपले ब्रीद परत एकदा सार्थ करण्यासाठी !
गेले आठ दिवस आपण श्रीकृपेनेच श्रीनृसिंह भगवंतांच्या गुणानुवादनात रमलेलो आहोत. आजच्या सायंकाळच्या, शेवटच्या लेखाबरोबर ही सेवा संपन्न होणार आहे. आजचा दिवस आपण परमकरुणामूर्ती भगवान श्रीनृसिंहराज महाराजांचा भरभरून जयजयकार करू या, त्यांचे यथामती व जास्तीत जास्त स्मरण करू या !
भगवान श्रीलक्ष्मीनृसिंह प्रभूंच्या अतीव देखण्या, प्रसन्न षड्भुज श्रीमूर्तीचे मनोहर ध्यान तितक्याच गोड शब्दांमध्ये वर्णन करताना भगवत्पूज्यपाद श्रीमद् शंकराचार्य महाराज म्हणतात,
एकेन चक्रमपरेण करेण शङ्ख-
मन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन् ।
वामेतरेण वरदाभय-पद्म-चिन्हं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१४॥

"प्रभो लक्ष्मीनृसिंहा ! आपण आपल्या डाव्या बाजूच्या वरच्या हातात दुष्टांचा शिरच्छेद करणारे आपले सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र धारण केलेले आहे. मधल्या हातात ज्ञानस्वरूप शंख धारण केला आहे. तिस-या हाताने आपण आपल्या शक्तीला आधार देऊन आपल्या राजसिंहासनावर विराजमान झालेला आहात. आपला उजवीकडील सर्वात वरचा हात वरमुद्रेत असून, त्याद्वारे आपण आपल्या भक्तांना इच्छित वर प्रदान करता. मधल्या हाताने आपण अभयमुद्रा धारण केलेली आहे, ज्याद्वारे आपण शरण आलेल्या जीवांना सर्वप्रकारच्या संकटांमधून अभय प्रदान करता. आपले रूप अत्युग्र असले तरी स्वभाव (हृदय) मात्र अतिशय कोमल आहे, हे सांगण्यासाठी तिस-या हातात आपण शुभदायक असे कमल धारण केलेले आहे. या कमलाद्वारे आपण आपल्या भक्तांची पूजा करता. आपले हे अतीव मनोहर रूप सर्व पापांचा नाश करणारे, भक्तांच्या हृदयात मधुर अशी भावभक्ती निर्माण करणारेच आहे. मी आपल्या या भक्तवात्सल्यमय रूपाला मनोभावे वंदन करून, मला आपल्या हातांचा आधार देऊन या भवसागरातून पार करावे अशी विनम्र प्रार्थना करतो !"
स्तोत्राच्या शेवटाला भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांची सप्रेम प्रार्थना करताना नृसिंहभक्त जीव कळवळून म्हणतो,
अन्धस्य मे हृत-विवेक-महाधनस्य
चोरैर्महाबलिभिरिन्द्रिय-नामधेयैः ।
मोहान्धकार-कुहरे विनिपातितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१५॥

"करुणावरुणालय भगवंता ! मी मुळातच अंधळा आहे, कारण मला कर्तव्य व अकर्तव्याचा विचारही कधीच नीट सुचत नाही. त्यात माझे विवेकरूपी धन इंद्रिये (पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये) नामक महाबलवान चोरांनी पूर्ण लुटून नेले आहे. तेवढ्यावरच ते थांबलेले नाहीत, तर अतिशय अंधा-या अशा मोहरूप भयावह दरीत त्यांनी मला ढकलून दिले आहे. आता मी यातून बाहेर कसा येऊ ? आपणच आता दया दाखवून मला यातून बाहेर काढले नाहीत, तर मी कायमचा नष्टच होऊन जाईन. मला आता देवा आपणच वाचवावे, माझा उद्धार करावा !"
(आजच्या पोस्ट सोबत दिलेले चित्र हे प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील एका अतिशय दुर्मिळ व जुन्या फोटोचे छायाचित्र आहे.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ८
( श्रीनृसिंह स्मरणाचे महत्त्व सांगणारा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ८
वैशाख कृष्ण त्रयोदशी, श्रीवेदव्यास जयंती निमित्त त्यांचे माहात्म्य कथन करणारा व श्रीनृसिंहपुराणातील भक्तराज प्रल्हादांच्या एका अप्रसिद्ध कथेचे विवरण करणारा लेख.)
https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_81.html?m=1

0 comments:

Post a Comment