9 May 2019

भाष्यकाराते वाट पुसतू

प्रबोधदिनकरू प्रकटला
नमस्कार !
आज वैशाख शुद्ध पंचमी, श्रीमत् गोविन्दभगवत्पूज्यपादशिष्य भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांची आज जयंती !!
हिमालय कसा आहे हो ? उत्तुंग, अपरंपार, अमर्याद, अद्भुत, अलौकिक, भव्य-दिव्य, मनोहर, सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय आणि बरेच काही आहे. थोडक्यात सांगायचे तर, हिमालय हिमालयासारखाच आहे ! आपल्या भारतभूमीचे महान भाग्य की, भगवद्इच्छेने असे असंख्य हिमालय या भूमीवर उत्पन्न झाले आणि पुढेही होत राहतील. या सर्वांच्या शीर्षस्थानी आहेत भगवान भाष्यकार श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराज !! म्हणूनच उत्तुंगतेलाही वर मान करून पाहावे लागेल अशा या महान ज्ञान-हिमालयाला जयंतीदिनी भावभरला साष्टांग दंडवत  !!
श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचे नाव जरी घेतले तरी आपला ऊर अभिमानाने व प्रेमाने भरून येतो, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठत्व सामावलेले आहे.
श्रीमद् आचार्यांची उपलब्ध ग्रंथसूची प्रचंड मोठी आहे. त्यात काही नंतरच्या आचार्यांचेही ग्रंथ नामसाधर्म्यामुळे गणले गेलेले आहेत. तरीही सर्व वाङ्मयाची संशोधित सूची करायची म्हटली तर एकूण १८८ रचना त्यात येतात. (अशी सूची चित्तडोहावरील आनंदलहरी या प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या श्री आचार्य तत्त्वज्ञानावरील अप्रतिम ग्रंथाच्या परिशिष्टात दिलेली आहे.) एवढे प्रचंड वाङ्मय त्यांनी कृपापूर्वक रचलेले आहे. एक आयुष्य पुरणार नाही नुसते वाचायला आपल्याला, ते अभ्यासणे तर दूरच राहिले.
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते. कारण जगाचे गुरुपद भूषविण्यासाठीच श्रीभगवंत त्यांच्या रूपाने अवतीर्ण झाले. आचार्य अवताराचे हे रहस्य जाणूनच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज आपल्या श्री शंकराचार्यांच्या आरतीत स्पष्ट म्हणतात, "...तं वासुदेवदंड्यहमत्रिजमिव वंदे ॥" "भगवान श्री आचार्यांना मी प्रत्यक्ष अत्रिज भगवान श्रीदत्तप्रभूंप्रमाणेच जगद्गुरु मानून वंदन करतो !"
श्री आचार्य हे जगद्गुरूच आहेत. म्हणून तर साक्षात् भगवंत देखील श्री माउलींच्या अवतारात प्रकटल्यावर भगवान भाष्यकारांना सप्रेम वंदन करतात, त्यांच्याच अद्वैत तत्त्वप्रणालीचे अनुसरण करतात. यातच त्यांचे जगद्गुरुत्व दिसून येते.
श्री आचार्यांचे तत्त्वज्ञान कठीण आहे  किंवा आमची बुद्धी तेवढी नाही म्हणून समजायला कठीण वाटते, हे एकवेळ मान्य. पण नित्यनियमाने श्री आचार्यांचे एखादे स्तोत्र तरी आपण नक्कीच म्हणू शकतो की. हेही नसे थोडके ! आजच्या पावन जयंतीदिनापासून आपण सर्वांनी त्यांचे एखादे स्तोत्र तरी नित्यनियमाने म्हणण्याचा निश्चय करून तो प्रेमाने निभावू या.
श्रीसंत एकनाथ महाराज भगवान श्री आचार्यांचे गुणगान गाताना म्हणतात,
वंदूं आचार्य शंकरू ।
जो कां ग्रंथार्थ विवेकचतुरू ।
सारूनि कर्मठतेचा विचारू।
प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥( ए.भा.१.११८)

"ज्यांच्या अलौकिक ज्ञानसंपन्न ग्रंथांनी जगात चातुर्य व विवेकाची प्रतिष्ठा केली आणि धर्माला कर्मठतेच्या शापातून मुक्त करून सर्वसामान्य जनांपर्यंत नेऊन सर्वत्र प्रबोधदिनकराचा, सुखमय ज्ञानसूर्याचा उदय करविला, त्या भगवान आचार्य श्री शंकरांना अनंतकोटी दंडवत प्रणाम असोत !"
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'चित्तडोहावरील आनंदलहरी' ग्रंथात म्हणतात, "भगवत् पूज्यपाद श्रीमदाचार्य हे केवळ त्यांची 'जयंती' साजरी करण्याइतपतच मोठे होते असे नसून, ज्यांची स्मृती पिढ्यान् पिढ्यांनी अंत:करणात अखंडपणे सादर, सविनय जागती ठेवावी, एवढे ते स्थल-काल-मर्यादातीत श्रेष्ठ होते."
आजच्या पुण्यदिनी प्रकटलेल्या या अपरिमितप्रकाशमान, चिद्गगनभुवनदीप अद्वैतज्ञानभास्कराच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सप्रेम समर्पिलेली एक शब्द-पुष्पांजली खालील लिंकवर वाचता येईल.
भाष्यकाराते वाट पुसतू

0 comments:

Post a Comment