24 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख चौथा



श्रीनृसिंह पुराणाच्या सुरुवातीलाच भगवान मार्कंडेय महामुनींची कथा आलेली आहे. भृगू ऋषींचे नातू असणा-या या मार्कंडेयमुनींना बारा वर्षांचेच आयुष्य होते. त्यामुळे अतिशय बुद्धिमान असणा-या मार्कंडेयांनी आपल्या आजोबांना त्यावर उपाय विचारला. भृगू म्हणाले की, "वत्सा, मोठी तपश्चर्या करून भगवान नारायणांचे मनोभावे अर्चन केल्याशिवाय मृत्यूला कोणीच जिंकू शकत नाही. म्हणून तू भगवान नृसिंहांचे स्मरण करीत द्वादशाक्षर मंत्राद्वारे तपश्चर्या कर."
भृगूंच्या आज्ञेने बाल मार्कंडेयांनी सह्याद्री पर्वतावरील तुंगभद्रा नदीच्या तीरावर तपश्चर्या आरंभिली. त्यांच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्यांनी स्नान करून विधिपूर्वक विष्णुपूजन केले व हरिध्यान करीत नामस्मरण करायला सुरुवात केली. तेवढ्यात यमाचे दूत तेथे पोचले. ते मृत्युपाश टाकणार एवढ्यात पराक्रमी विष्णुदूतांनी आपल्या मुसळाने मारून त्यांना पळवून लावले. जाता जाता ते यमदूत म्हणाले, "आम्ही तर जातो, पण आमचे स्वामी यमधर्मच येतील आता." त्यानंतर प्रत्यक्ष मृत्यूदेवता  आली, पण मार्कंडेयांना स्पर्शही करू शकली नाही. कारण लोखंडी मुसळ उगारलेले वीर विष्णुदूत तेथे उभेच होते. त्यासमयी मार्कंडेयांनी भगवान विष्णूंचे मृत्युंजयस्तोत्राने स्तवन केले. हे अतिशय प्रभावी स्तोत्र महामृत्यूवरही विजय मिळवून देण्यात समर्थ आहे. त्यामुळे भगवान नृसिंहांच्या कृपेने मार्कंडेय मृत्युभयातून कायमचेच मुक्त झाले.
मृत्युदेवता व दूतांनी यमराजांना सर्व प्रसंग कथन केला. आम्हांला मारणारे ते कोण होते? असे विचारल्यावर यमराजांनी क्षणभर ध्यान लावले व सत्य जाणून ते म्हणाले, "अहो, तो मार्कंडेय महान तपस्वी आहे. त्याने भगवान नृसिंहांचे स्मरण करीत द्वादशाक्षरमंत्राने तपश्चर्या केलेली आहे. त्याला आपण कोणीही काहीही इजा करू शकत नाही. भगवान विष्णूंना शरण गेलेल्या जीवाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू सुद्धा शकत नाही. तुम्हांला मारणारे ते विष्णुदूत होते. म्हणून येथून पुढे जेथे विष्णुभक्त, नृसिंहभक्त असतील तेथे तुम्ही कधी जाऊच नका."
तेवढ्यात नरकात खितपत पडलेल्या करोडो दुर्भागी जीवांकडे यमराजाचे लक्ष गेले. त्यांची करुणा येऊन त्याही जीवांवर कृपा व्हावी म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. "हे दुर्दैवी जीवांनो, तुम्ही क्लेशहरण करणा-या भगवान केशवांची आराधना का करीत नाही? पूजेचे काहीही सामान जवळ नसले, तरी मनोभावे अर्पण केलेल्या केवळ ओंजळभर जलानेही जे संतुष्ट होतात, त्या भगवान मधुसूदनांचे तुम्ही का बरे पूजन करीत नाही? कमलासारखे नेत्र असणा-या करुणामूर्ती भगवान नृसिंहांचे नुसते प्रेमाने स्मरण केले तरी ते त्या महापापी जीवाला त्याक्षणी मुक्ती देतात. म्हणून तुम्ही त्यांचेच स्मरण करावे, यातच तुमचे खरे हित आहे ! त्यासाठी मी पूर्वी महात्म्यांकडून ऐकलेले प्रत्यक्ष भगवान श्रीनारायणांचेच मधुर वचन तुम्हांला सांगतो." असे म्हणून यमधर्माने काही उपदेश केला. त्याला "यमगीता" असे म्हणतात. नरकयातनांपासून मुक्ती देणारा, यमराजांनी कथन केलेला हा मार्मिक भाग आपण उद्या सविस्तर पाहू.
भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीराया हे दिसायला उग्र असले, तरी प्रत्यक्षात भक्तवात्सल्य दाखविण्यासाठीच प्रकटलेले असल्याने अत्यंत प्रेमळच आहेत. त्यांच्या ख-या प्रेमाचा अास्वाद घेतला अनन्यभक्त प्रल्हादांनी. कारण त्यांचेही भगवंतांवर अात्यंतिक प्रेम होते. सद्गुरु श्री माउलींनी देखील प्रल्हादांचे वेळोवेळी यथार्थ स्तवन केलेले आहे. देव-भक्ताच्या जगावेगळ्या प्रेमाचा अद्भुत आविष्कार म्हणून प्रल्हादांची कथा आपण बालपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. त्या कथेची माधुरी अपूर्वच आहे. म्हणूनच सद्गुरु माउलींच्या शब्दांत या भक्तिकथेचे मर्म खालील लिंकवरील लेखातून आपण जाणून घेऊ या; आणि उच्चरवाने भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय । असा जयजयकार नृसिंहनवरात्राच्या आजच्या चतुर्थ दिनी प्रेमभराने करून श्रीभगवंतांची करुणा भाकूया !
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख चौथा 
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_4.html

0 comments:

Post a Comment