23 May 2016

*** भक्तश्रेष्ठ नारदा वंदन मनोभावे ***



ज्यांचा तिन्ही लोकांमध्ये अप्रतिहत संचार असतो व जे भक्तश्रेष्ठ मानले जातात त्या देवर्षी श्रीनारदांची कथा मोठी रोचक आहे. हे श्रीनारद पूर्वजन्मी एका दासीचे पुत्र होते. त्यांच्या गावातील धर्मशाळेत काही साधू चातुर्मास्यासाठी राहिले होते. त्यांच्या आई त्या साधूंची सेवा करीत असत. त्यामुळे या बालकालाही संतांची सेवा करायला मिळाली. त्यांच्या कृपेने बालकाच्या हृदयात भगवंतांच्या भक्तीचे बीज रुजले. पुढे ते साधू तीर्थयात्रेला निघून गेले. इकडे त्यांची आई देखील मरण पावली. मग त्यांनी उर्वरित आयुष्य भगवंतांच्या अखंड नामस्मरणात भ्रमण करीत घालवले. पुढील कल्पात ते साक्षात् भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हणून श्रीनारदांच्या रूपाने जन्माला आले. थोर भगवद् भक्त श्रीसनत्कुमारांचा त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. गळ्यात ब्रह्मवीणा धारण करून अखंड भगवन्नामस्मरण केल्यामुळे देवर्षी नारदजी हरिरूप होऊन गेले.
त्यांनी पुढे भक्तिसूत्रांची रचना केली. श्रीनारदांच्या नावाचे एक पुराणही उपलब्ध आहे. त्यांनी वैष्णव तंत्राची निर्मिती केली. त्याला नारद पांचरात्र म्हणतात. देवर्षी श्रीनारदांना  महाभारतात परमज्ञानी, पूर्व कल्पांचे ज्ञाते म्हटलेले आहे. ते अत्यंत अद्भुत भावपूर्ण अंत:करणाचे महान भगवद्भक्त आहेत. देवर्षी नारदांना कीर्तनभक्तीचे आचार्य म्हटले जाते. म्हणून आजही कीर्तनकार ज्या गादीवर/गालिच्यावर उभे राहून कीर्तन करतात त्याला " नारदांची गादी " म्हणतात. तसेच कीर्तनकाराला, वीणा घेऊन नामसंकीर्तन करणा-याला नारदस्वरूप मानून वंदन करण्याचा प्रगात आहे. देवर्षी नारदांनी महर्षी व्यास, प्रल्हाद, ध्रुव आदी थोर भक्तांना अनुग्रह करून भगवद्भक्ती प्रदान केली. आजही देवर्षी नारद भक्तांवर कृपा करीत निरंतर भगवंतांचे नाम घेत तिन्ही लोकांमध्ये संचार करीत असतात. हे सर्व त्यांना पूर्वजन्मी केलेल्या संतांच्या सेवेचे मिळालेले फळ आहे.
श्रीमद् भागवत माहात्म्या मध्ये श्रीनारदांचा व भक्तीमातेचा संवाद आहे. त्यात ते प्रतिज्ञा करतात की, " मी भक्तीची घराघरात स्थापना करीन. " आपल्या प्रतिज्ञेच्या पूर्तीसाठी देवर्षी आजही कार्य करीत आहेत. त्यांच्या कृपेने सनाथ झालेले अगणित संत हरिभक्तीचा डंका वाजवीत आजही लोकांचा उद्धार करीत आहेत.
भक्तश्रेष्ठ श्रीनारदांना " देवर्षी " म्हणतात. त्याचे विशेष कारण संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी दिलेले आहे. ज्या महात्म्यांना " गर्भ दीक्षा " देता येते, त्यांनाच शास्त्रांमध्ये देवर्षी म्हटले जाते. गर्भातील जीवाला शक्तिपात दीक्षा देणे हे अत्यंत जोखमीचे व अवघड कार्य आहे. फार मोठा अधिकार असल्याशिवाय हे जमत नाही. देवर्षी नारदांनी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांना अशी गर्भदीक्षा प्रदान केली होती. श्रीनारदांशिवाय आणखीही महात्म्यांनी अशा दीक्षा दिलेल्या आहेत, पण देवर्षी म्हणून श्रीनारदजीच सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
इतक्या महान विभूतिमत्वाला " कळीचा नारद " म्हणून जेव्हा लोक हिणवतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. पुराणात नारदांनी जिथे जिथे काही कळ लावलेली आहे, तिथे तिथे प्रत्येकाचे भलेच झालेले आहे. संतांना कोणाचेही अहित करणे माहीतच नसते. ज्यांना सर्व प्राचीन विद्वान महाज्ञानी म्हणतात, जे अनेक महान भक्तांचे सद्गुरु आहेत त्या श्रीनारदजींची पायधुळी मस्तकावर धारण करण्याचेही भाग्य थोर थोर महापुरुषांना अत्यंत कष्टाने प्राप्त होते, हे आपण विसरता कामा नये. भगवान श्रीकृष्ण ज्यांचे सप्रेम स्मरण करतात, ते नारदजी तुम्हां आम्हां सर्वांसाठी परम वंदनीय, पूजनीयच आहेत.
एकदा देवर्षी नारदांनी भगवान श्रीविष्णूंना सत्संगतीचे महत्त्व काय? असे विचारले. त्यावर देव म्हणाले, " अरे, त्या समोरच्या झाडाखाली एक किडा आहे, त्याला विचार, तो तुला सांगेल. " देवर्षी त्या किड्यापाशी गेले व त्यांनी त्याला प्रश्न विचारला. त्याबरोबर तो किडा टपकन् मरून पडला. देवर्षी खट्टू होऊन भगवंतांकडे परत आले. देव म्हणाले, " अरे, तो किडा तर मेला. तू असे कर, त्या समोरच्या झाडावरील घरट्यात आत्ताच अंड्यातून एक पक्षाचे पिल्लू जन्माला आले आहे. त्याला विचार. " देवांची आज्ञा मानून नारद त्या घरट्यापाशी गेले व त्यांनी त्या नवजात पिलाला सत्संगतीचे महत्त्व विचारले. त्या पिलाने नारदांकडे पाहिले आणि तेही तत्काळ गतप्राण झाले. नारदांना कळेच ना काय होते आहे ते. ते तसेच भगवंतांकडे परत आले.
आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने नारद हिरमुसले होते. मग त्यांनी देवांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर भगवंत मिश्किल हसत म्हणाले, " अरे नारदा, अमक्या देशाचा राजाला नुकताच एक राजपुत्र झालेला आहे. त्याला जाऊन विचार, तो नक्की सांगेल. " नारदजी जरा घाबरलेच. ते म्हणाले, " देवा, किडा व पक्षी मेला तर मला काही फारसे वाटले नाही. पण आता जर तो राजपुत्र मेला तर माझी काही धडगत नाही. नको रे बाबा, मी नाही जाणार विचारायला. " त्यावर देव हसून उत्तरले, " अरे, जा. काही विपरीत घडणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. यावेळी तुला नक्की उत्तर मिळेल. " आज्ञेनुसार नारदजी त्या राजाच्या राजवाड्यात नारायण नारायण करीत प्रकट झाले. राजाने आदराने त्यांची पूजा केली व आपल्या नवजात राजपुत्राला त्यांच्या पायावर घातले. त्याला पाहून नारदांनी त्याला, ' सत्संगतीचे महत्व काय? ' असे विचारले. त्याबरोबर तो राजपुत्र उठला व नारदांना साष्टांग दंडवत घालून म्हणाला, " अहो देवा, मीच त्याचे साक्षात् फळ आहे. मी किड्याच्या जन्मात असतांना तुमच्या केवळ दर्शनाने माझा त्या मूढ योनीतून उध्दार झाला. मी पक्षी म्हणून जन्माला आलो. त्याही जन्मात तुमचे दर्शन झाले व लगेच गती लाभून आता राजपुत्र म्हणून जन्माला आलोय. तुम्ही आता माझ्यावर कृपा करून मला अनुग्रह द्या. "
देवर्षी नारदांना अशाप्रकारे सत्संगतीचे महत्व भगवंतांनी दाखवून दिले. संतांची संगती, त्यांचे दर्शन, त्यांची कृपा ही अत्यंत अद्भुतच असते. पुराणांनी संतांच्या संगतीचे अनेक अलौकिक प्रसंग वर्णन करून ठेवलेले आहेत. त्यांचा साकल्याने विचार केल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते की, सत्संगतीला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्व असते, म्हणूनच साधकाने संतांची संगतीत, त्यांच्या  विचारांच्या व त्यांच्या पावन स्थानाच्या संगतीत राहावे, म्हणजे आपला परमार्थ सुफळ संपूर्ण होतो.
आज वैशाख कृष्ण द्वितीया, देवर्षी भगवान श्रीनारदांच्या जयंती निमित्त त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत. काही ठिकणी वैशाख कृष्ण प्रतिपदेला जयंती मानतात. संतांच्या स्मरणासाठी मुहूर्त पाहायची गरज काय? तसे जर पाहिले तर रोजच त्यांची जयंती असते. भगवंतांना अत्यंत आवडणारे संतस्मरण करणे हे आपले साधक म्हणून कर्तव्यच आहे. म्हणून आजच्या जयंतीदिनी आपण प्रेमभराने भगवान श्रीनारदांचे स्मरण करून त्यांना प्रेमभक्तीचे दान मागूया.

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

16 comments:

  1. श्री नारद महर्षिना प्रणिपात.

    ReplyDelete
  2. खूप खूप आभारी आहे छान माहिती दिल्याबद्दल

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेखापद्दल धन्यवाद.नारद महर्षीं बाबत असलेले गैरसमज दूर केल्याबाबत आभारी आहे.

    ReplyDelete
  4. देवर्षी नारद एक अद्भुत व्यक्तिमत्त्व, सर्वश्रेष्ठ संत होत, आपला उद्बोधक लेख अप्रतिम! धन्यवाद
    यशवंत जोशी

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर....देवर्षी नारदमुनी यांच्याबद्दलची माहिती दिली आहे तुम्ही... धन्यवाद 🙏🚩👌
    खरोखरच नारद मुनी 'कळीचे' नारद नसून 'कळकळी' चे नारदमुनी आहेत... त्यांना नेहमी प्रत्येकाचे चांगले व्हावे असेच वाटते... म्हणून तर वावरता कोळी चे वाल्मिकी र्ऋषींमध्ये रूपांतर झाले 🙏

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर....देवर्षी नारदमुनी यांच्याबद्दलची माहिती दिली आहे तुम्ही... धन्यवाद 🙏🚩👌
    खरोखरच नारद मुनी 'कळीचे' नारद नसून 'कळकळी' चे नारदमुनी आहेत... त्यांना नेहमी प्रत्येकाचे चांगले व्हावे असेच वाटते... म्हणून तर वाल्या कोळी चे वाल्मिकी र्ऋषींमध्ये रूपांतर झाले 🙏

    ReplyDelete
  7. संत संगती लाभणे एक पुण्यच आहे

    ReplyDelete
  8. गैरसमज दूर करून आमच्यासारख्याना व आमच्या विचारांना योग्य दिशा दर्शविली, त्याबद्दल आपले मनापासून आभार..🙏
    खूप सुंदर व भावपूर्ण लेख..🙏🙏🌹💐

    ReplyDelete
  9. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा

    संतांचे संगती, मनोमार्ग गती
    ब्रम्हर्षी नारदाना दंडवत

    ReplyDelete
  10. खूप धन्यवाद .

    ReplyDelete
  11. देवर्षी बद्दल दुर्मिळ माहिती व ज्ञान
    मिळवून दिल्याबद्दल आपले खूप
    आभार!! ओम नमो नारायनाय 🌹🙏

    ReplyDelete
  12. सुरेख माहिती

    ReplyDelete
  13. खूपच छान

    ReplyDelete
  14. सुसंगति सदा घडो सुजन वाक्य कानी पडो l
    देवर्षी नारादाना दंडवत
    तदर्पितखिलाचारता, तदविस्मरणे परम व्याकुलतेति l

    ReplyDelete
  15. खुपच छान

    ReplyDelete