*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ७ ***
* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ७ वे *
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी प्रकटलेला हा " आवेश " अवतार मोठा विलक्षणच आहे. श्रीनृसिंह पुराणामध्ये भक्त प्रल्हाद व भगवंतांचा फार सुंदर आणि भावपूर्ण असा संवाद त्रेचाळिसाव्या अध्यायात आलेला आहे. भगवद् भक्तांचे अंत:करण किती वैशिष्ट्यपूर्ण असते, याचा सुखद प्रत्यय या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो.
हिरण्यकश्यपूने आपल्या दूतांना प्रल्हादाला नागबंधनात जखडून समुद्रात नेऊन टाकण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या राक्षसांनी प्रल्हादाला रात्रीच्या वेळी गाढ समाधी अवस्थेत असतानाच बांधून नेऊन समुद्रात टाकले. प्रल्हाद समाधीच्या आनंदसागरात रममाण असल्यामुळे त्यांना समजलेच नाही की आपण खा-या पाण्याच्या समुद्राच्या तळाशी पोचलेलो आहोत. समुद्रदेवानेच स्वत: प्रल्हादांना किना-यावर आणले. तोवर ते समाधीतून जागे झाले व त्यांचा समुद्रदेवाशी संवाद झाला. भगवंतांच्या साक्षात् दर्शनाची प्रल्हादांची तीव्र तळमळ जाणून समुद्राने त्यांना भगवंतांचे स्तुती-गान करण्याचा सल्ला दिला. प्रल्हाद तेथेच रात्रभर व्याकूळ अंत:करणाने भगवंतांना आळवत बसले.
शेवटी भगवान नारायणांनी त्यांना पहाटे प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यावेळी देवांनी अत्यंत प्रेमभराने प्रल्हादांना वर माग म्हटले. प्रल्हाद म्हणाले की, " देवा, मला तुमचे दर्शनच सतत हवे असते. ते मिळाल्यावर, त्यापेक्षा काय मोठे असे आणखी मागू? " देव म्हणाले की, तरीही काहीतरी मागच. त्यावर प्रल्हाद म्हणाले, " मला जन्मजन्मांतरी गरुडाप्रमाणे आपला दास करून ठेवा. " त्यावर देव म्हणाले, " काय कठीण समस्या ठेवलीस समोर? मीच मला तुला देऊन टाकायची, तुझ्याच स्वाधीन होण्याची इच्छा बाळगतोय आणि तुला माझे दास व्हायचे आहे. आणखी दुसरे काहीतरी माग. "
त्यावर भक्तश्रेष्ठ प्रल्हाद फार सुंदर म्हणतात, " देवा, वर द्यायचाच असेल तर, माझी आपल्या ठिकाणी सात्त्विक भक्ती सदैव स्थिर राहील, त्या भक्तीमुळे मी सतत तुमचे नाम-गुण-कीर्तीच गात राहीन, असाच वर द्या !" भगवंत आपल्या या श्रेष्ठ भक्तावर अतीव प्रसन्न झाले व त्यांनी तसाच वर त्याला दिला.
भक्तांचे अंत:करण कसे सर्वांगांनी भक्तिमय झालेले असते पाहा. त्यांना भक्तीशिवाय दुसरे काहीही सुचतच नाही. सर्वत्र त्यांना हरिरूपच दिसत असते व तेच सतत हवेहवेसेही वाटत असते. त्यासाठीच तर त्यांचा जन्म झालेला असतो. भगवान श्रीमाउली भक्तांच्या या अनन्य प्रीतीला गंगामैयाची उपमा देतात. ती गंगा समुद्राला काल मिळाली, आज मिळाली, नव्हे आत्ताही मिळतच आहे. तरीही नित्यनवीन प्रेमाने, उत्साहाने ती सतत समुद्राशी एकरूप होत असते. त्याचा तिला ना कंटाळा ना आळस. तसेच हे भक्तही भगवंतांशी एकरूप होऊनही पुन्हा पुन्हा तीच इच्छा करीत असतात. त्यांच्यासाठी तो अनुभव प्रत्येक क्षणी नवीनच असतो. हीच परम अद्भुत अशी अद्वैतीभक्ती होय.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादच या भक्तिसुखासाठी, रामावतारात अंगद, कृष्णावतारात उद्धव, माउलींच्या काळात भक्त श्रीनामदेव, नंतर श्रीतुकाराम महाराज, त्यानंतर श्रीतुकाविप्र महाराज व त्याहीनंतर चिदंबर महास्वामींचे शिष्य श्रीराजाराम महाराज म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेते झाले. शिवाय दक्षिणेत श्रीमत् राघवेंद्रस्वामी रूपानेही भक्तश्रेष्ठ प्रल्हादजीच अवतरले होते. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद व भगवान नरहरी ही पूर्ण एकरूप अशी थोर जोडगोळीच आहेत. भक्तिसुखासाठी प्रल्हादजी सतत पृथ्वीतलावर विविध रूपांनी अवतरित होऊन भक्तीचा आनंद लुटतात व लोकांनाही भरभरून देत असतात. या एकरस जोडगोळीच्या अम्लान चरणीं सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत करतो.
भगवान श्रीनृसिंहांविषयी अक्षरश: प्रचंड वाङ्मय पूर्वीच्या ऋषीमुनींनी व साधुसंतांनी रचून ठेवलेले आहे. यामध्ये नृसिंह अवताराच्या लीला, प्रल्हादादी नृसिंहभक्तांच्या कथा, नृसिंहविषयक स्तोत्रे, मंत्र, सहस्रनामे, मालामंत्र, पूजापद्धती, प्रार्थना स्तोत्रे अशाप्रकारचे विविध भाषांमधील विपुल प्रासादिक वाङ्मय पाहायला मिळते. हे सर्व एकत्रित स्वरूपात प्रथमच एकूण साडेसोळाशे पानांच्या तीन खंडात्मक " श्रीनृसिंह कोश " मधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्वात आनंददायक गोष्ट अशी की, हे ₹ ५७५ /- मूल्याचे तीन खंड सवलतीत केवळ ₹ ३०० /- मध्ये श्रीवामनराज प्रकाशन नृसिंहभक्तांना देत आहेत.
थोर नृसिंहभक्त प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली अनेक मान्यवर अभ्यासकांनी या कोशात मोलाचे योगदान दिलेले आहे. हे तीनही खंड प्रत्येक नृसिंहभक्ताच्या संग्रही असायलाच हवेत, इतके महत्त्वपूर्ण व विलक्षण आहेत.
प्रथम 'संहिता'खंडात वेद, उपनिषदे, स्मृती व पुराणांमधील नृसिंहविषयक संदर्भांची संहिता अाहे. ऋग्वेदातील ' द्वे विरूपे ' सूक्त, त्यावरील संस्कृत टीका व मराठी भाषांतर आहे. या सूक्ताचा नीरानृसिंहपूर स्थानाच्या दृष्टीने अर्थ केलेला आहे. श्रीनृसिंहपुराणाची देखील पूर्ण संहिता आहे.
द्वितीय 'उपासना'खंडात, वर ज्यातील सुंदर कथा सांगितली आहे त्या नृसिंहपुराणाचा मराठी अर्थ दिलेला अाहे. त्यानंतर शरभोपनिषद व लिंगपुराणातील नृसिंहदमन हा विलक्षण भाग सविस्तर चर्चिलेला आहे. प्रत्यक्ष उपासना खंडात नृसिंहविषयक ७५ संस्कृत व ४७ मराठी रचनांचा समावेश केलेला आहे. शिवाय प्रदीर्घ अशी नृसिंहार्चनपद्धती देखील दिलेली आहे.
तिस-या 'माहात्म्य'खंडात उपासनाखंडातील उर्वरित स्तोत्रे व नीरानृसिंहपूर क्षेत्राचे संस्कृत माहात्म्य व त्याचा मराठी अर्थ दिलेला आहे. परिशिष्टातील दहा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख हे तर या खंडाचे वैभवच म्हणायला हवे. या लेखांमधून नृसिंह उपासनेची परंपरा, मूर्तीशास्त्र, भारतातील नृसिंह क्षेत्रे यांवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. हे सर्व लेख नुसते माहितीपूर्णच नाहीत तर रंजकही झालेले आहेत. श्रीनृसिंह दैवताची सर्वांगीण ओळख करून देणारा हा कोश वाचकांबरोबरच अभ्यासकांसाठी व नृसिंह उपासकांसाठीही अतिशय महत्त्वाचा ठरतो. हे अपूर्व शब्दब्रह्म कृपया जरूर संग्रही ठेवा व अभ्यासा, ही माझी कळकळीची प्रार्थना आहे. हा कोश १९९६ सालीच प्रकाशित झालेला असल्याने आता फार थोड्याच प्रती शिल्लक आहेत. असे प्रचंड महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा पुन्हा होत नसतात, तेव्हा त्वरा करून हे अल्पमूल्यात उपलब्ध झालेले अद्भुत धन प्राप्त करून घ्यावे, ही विनंती. कोश हवा असल्यास श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांना 02024356919 क्रमांकावर किंवा माझ्या खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क करावा, ही विनंती.
आजच्या वैशाख शुद्ध द्वादशी तिथीचे आणखी एक महान वैशिष्ट्य म्हणजे, आजच भक्तश्रेष्ठ अंबरीष राजासाठी, भगवान महाविष्णूंनी दुर्वास ऋषींचा दहा वेळा गर्भवासाला जाण्याचा शाप आपल्यावर घेऊन आपले भक्तवात्सल्य व भक्ताभिमान पुन्हा एकदा दाखवून दिला होता. हेच भगवान विष्णूंचे दशावतार होत. हा प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी घडला. त्यामुळे आज श्रीभगवंतांचीही जयंती साजरी केली जाते.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र : श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील श्रीअतिबळेश्वर मंदिराच्या बाहेरील प्राचीन श्रीलक्ष्मीनृसिंह शिल्प )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )
0 comments:
Post a Comment