नाम गावे नाम ध्यावे, स्वामीब्रह्मी लीन व्हावे
राजाधिराज भगवान सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणजे परब्रह्माचे अलौकिक सगुण-साकार रूप, बोला बुद्धीच्या पलीकडचे, विलक्षण अवतारी विभूतिमत्व होय ! आज चैत्र कृष्ण त्रयोदशी, श्रीस्वामी समर्थ महाराजांची १३८ वी पुण्यतिथी. ( सूर्यसिद्धांतानुसारी पंचांगाप्रमाणे आजच दि. ४ मे रोजी पुण्यतिथी आहे, इतर पंचांगांमध्ये उद्या दि. ५ मे रोजी आहे.)
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज हे नित्य अवतार आहेत. त्यांना ना जन्म ना मृत्यू. त्यांचा प्रकटदिन काय आणि पुण्यतिथी काय, सगळी त्यांचीच लीला आहे. त्यांच्या सप्रेम स्मरणासाठी त्यांनी तुम्हां आम्हां भक्तांना अजून एक विशेष दिवस दिलेला आहे, इतकाच याचा अर्थ आहे. तसे पाहिले तर, ज्या दिवशी, ज्या क्षणी सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला अंत:करणापासून प्रेमपडिभराने स्मरण होईल, तो दिवस, तो क्षण हाच पुण्यपावन नव्हे काय? त्या आनंदक्षणाला अन्य कशाची उपमा देता येईल?
सद्गुरु भगवान श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या त्रिभुवन-मनोहर दिव्य रूपाचे फार भावपूर्ण व स्वानुभूत वर्णन करताना, त्यांचे पूर्णकृपांकित भक्तश्रेष्ठ पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे, श्रीस्वामी महाराजांचे आशीर्वाद लाभलेल्या आपल्या प्रासादिक ' श्रीस्वामी समर्थ नामपाठ ' या रचनेतील दहाव्या अभंगात म्हणतात,
सुवर्ण झळाळ, दिव्य परिमळ ।
पद्मसुकोमळ, स्वामीकांती ॥१॥
साजे कटीकर, टिळा माळा भार ।
ना भी ऐसा वर, नेत्र देती ॥२॥
मृदु कर्णपातीं, सुहास्ये डुल्लती ।
उदरी आवृत्ती, स्वानंदाची ॥३॥
ब्रह्मांडे अनंत, लीले खेळवत ।
गोटी नाचवीत, स्वामीराज ॥४॥
अमृते हृदयी, मोडी मांडी काही ।
ऐशाकृपे पाही, देवा आता ॥१०.५॥
राजाधिराज श्रीस्वामींची अंगकांती अस्सल सोन्यासारखी झळाळणारी असून त्यांच्या अंगातून सतत केशरकस्तुरीचा दिव्य सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्यांचे सारे शरीर कमळाच्या नाजूक पाकळ्यांसारखे कोमल आहे. त्यांचा डावा हात कंबरेवर शोभतो. भव्य कपाळावर केशर-चंदनाचा सुरेख टिळा आणि गळ्यात रुद्राक्षांच्या व तुळशीच्या माळा अतीव शोभून दिसतात. त्यांचे पाणीदार व प्रेमपूर्ण नेत्र " भिऊ नकोस " असे भक्तांना जणू आश्वासनच निरंतर देत असतात. ते जेव्हा प्रसन्न होऊन हसू लागतात, तेव्हा त्यांच्या कानांच्या मृदू पाळ्या छान डुलतात, तर त्यांच्या विशाल उदरात जणू स्वानंदाच्या लाटाच उचंबळून येत अाहेत, असे पाहणा-याला वाटते. अनंतकोटी ब्रह्मांडांच्या सर्व घडामोडी श्रीस्वामी महाराज बसल्या जागीच आपल्या लीलेने करीत असतात. त्या लीलेचे प्रतीक म्हणून ते आपल्या बोटांमध्ये गोटी नाचवतात.
अमृता श्रीस्वामीचरणीं प्रार्थना करते की, " देवा, माझ्या हृदयातही मोडण्याजोगे (अज्ञान) ते मोडा व मांडण्याजोगे (ज्ञान) ते मांडा. माझ्या परमार्थाला विरोधी असणारे सर्व प्रापंचिक भाव मोडा व परमार्थपूरक असे श्रद्धा-भक्तीचे भाव प्रकट करून पूर्णपणे स्थिर करा. माझ्या बाबतीत आपल्याला जे पाहिजे व जसे पाहिजे तसे करा, पण अशीच कृपादृष्टी मात्र माझ्यावर कायम ठेवा. "
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज हे खरोखरीच " अनंतकोटी ब्रह्मांडनायक " आहेत. म्हणून ब्रह्मांडगोटी ते हातात बाळगत असत. ते लहान मुलांशी गोट्या देखील खेळत असत. छेली खेड्यात रामसिंग (पूर्वजन्मीचे श्रीस्वामीसुत महाराज) नावाचा बाल भक्त राहात होता. त्याच्यावर गोट्या खेळताना आलेल्या डावामुळे तो रडू लागला व त्याच्यासाठीच अष्टवर्षीय बटूच्या रूपात शके १०७१ म्हणजे इ. स. ११४९ साली प्रथम श्रीस्वामी महाराज धरणी दुभंगून प्रकट झाले होते. अशाप्रकारे या गोटीचा त्यांच्या जन्मापासूनच संबंध आहे.
काही लोक हातात गोटी धारण केलेल्या श्रीस्वामींच्या प्रतिमेच्या विरोधात मत मांडतात. ते फोटो पूजेत ठेवू नयेत, असा प्रचारही करतात. ते पूर्णपणे चूक आहे. श्रीस्वामी महाराज खरोखरीच हातात गोटी घेऊन कधी कधी बसत असत, मुलांशी प्रसन्नतेने गोट्याही खेळत असत. म्हणून तो फोटो काही काल्पनिक किंवा चुकीचा नाही. त्यामुळे अशा बिनबुडाच्या मतांना श्रीस्वामीभक्तांनी अजिबात किंमत देऊ नये.
या गोटीच्या संदर्भात एकेदिवशी थोर विभूतिमत्व प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साक्षात् श्रीस्वामी महाराजांनाच प्रश्न विचारला होता. त्यावर प्रसन्न हास्य करून श्रीस्वामी महाराज म्हणाले, " सख्या, तुला पाहायचंय का ही गोटी म्हणजे काय ते? " आणि त्यांनी हातातील ती गोटी फेकली. त्यासरशी प्रचंड जाळ होऊन स्फोटासारखा मोठा आवाजही झाला. पू. मामांनी त्यांना आश्चर्याने हे काय झाले, असे विचारले. त्यावर श्रीस्वामी महाराज म्हणाले, " अरे, आम्ही एक ब्रह्मांड नष्ट केले. " लगेच त्यांनी आपला हात पुढे केला तर त्यावर तीच गोटी पुन्हा साकार झाली. त्यावर ते म्हणाले, " हे पाहा, एक ब्रह्मांड नवीन तयार झाले !" आपल्या अवघ्या एका ब्रह्मांडाचा थांगपत्ता जिथे आजच्या आधुनिक विज्ञानालाही पूर्ण लागलेला नाही, तिथे अशी अनंतकोटी ब्रह्मांडे केवळ संकल्पाने नवीन घडवण्याचे व नको झाले म्हणून क्षणात नष्ट करण्याचे अलौकिक सामर्थ्य श्रीस्वामी महाराज लीलया बाळगून आहेत. गोट्या खेळाव्यात तशी ब्रह्मांडांची जोड-तोड करणे हे श्रीस्वामी महाराजांसाठी डाव्या हाताचा मळ आहे. म्हणूनच ते खरोखरीचे ब्रह्मांडनायक शोभतात. त्यांच्या या देवदुर्लभ सामर्थ्याचे प्रतीक असणारी त्यांच्या उजव्या हातातली ही गोटी म्हणूनच फार महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांचा आधार असेल तरच ब्रह्मांडांचा व्यवहार सुरळीत चालतो, नाहीतर नाही; हेच या लीलेचे खरे रहस्य आहे.
अशा या परमकरुणामूर्ती श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या अलौकिक कृपेची प्राप्ती आपल्याला कशी होईल बरे? याचे सहज सोपे उत्तर महात्म्यांनी देऊन ठेवलेले आहे. ते म्हणजे, अनन्य शरणागत होऊन श्रीस्वामी नामाचा जो प्रेमभराने व नियमाने जप करेल, त्यांच्याच दिव्यमनोहर रूपाचे सतत स्मरण करेल, त्याच्यावर श्रीस्वामीकृपामेघ उदंड बरसेल, त्याला अंतर्बाह्य चिंब चिंब भिजवून अखंड सुखरूप करेल, यात तीळमात्र शंका नाही !!
श्रीस्वामीसुत महाराज आपल्या श्रीस्वामीपाठात छातीवर हात ठेवून शपथपूर्वक सांगतात,
घेऊनीया जिम्मा उतरितों विमा ।
तारक हें तुम्हां स्वामीनाम ॥३१.१॥
स्वामीनाम हेच सर्व साधनांचे सार असून, तेच अकल्पनाख्य कल्पतरूही आहे. आपल्या भक्तांचे लळे पुुरवून, त्यांच्या सर्व सुख-दु:खात आतून बाहेरून सांभाळून, भक्तांना हळूहळू स्वामीरूपच करणारे हे श्रीस्वामीनाम म्हणजे त्रिभुवनगामिनी गंगाच आहे. या गंगौघात जो प्रेमाने न्हायला, तो जन्ममरणाच्या फे-यातून मुक्त होऊन अखंड आनंदमय होऊन राहिलाच म्हणून समजा !
आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. हे श्रीस्वामीनाम कोणते? ज्याचा भक्तांनी जप करायचा आहे. कारण आज अनेक प्रकारची स्वामीनामे प्रचलित होताना दिसत आहेत. भक्तांचा त्यामुळे उगीचच गोंधळ उडतो आहे. यावरही श्रीस्वामींच्या सर्व अंतरंग भक्तश्रेष्ठांनी सविस्तर लिहून ठेवलेले आहे. श्रीस्वामीसुत महाराज आपल्या स्वामीपाठात म्हणतात,
स्वामीनाम मोठें अन्य सर्व खोटें ।
स्मरलीया कोठें भय नाही ॥१॥
पंचदशाक्षरी जपीं भाववरी ।
चित्त स्वामीवरी ठेवूनीया ॥५.३॥
श्रीस्वामीसुत महाराज आपल्या ' भूपाळी'तही म्हणतात,
जपा नाम निर्धारीं ।
पावन ते पंचदशाक्षरी।
तेणें चुकूनि तुमची फेरी ।
मोक्षपद मिळेल की ॥५॥
श्रीस्वामी समर्थ महाराजांचे " श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ " हे पंचदशाक्षरी नामच संप्रदायात मान्य आहे. याच नामाचा प्रेमभावाने केलेला जप श्रीस्वामीकृपेचे अपूर्व दान आपल्या पदरात भरभरून घालतो. श्रीस्वामी महाराजांच्या लौकिक लीला काळातही, श्रीस्वामीसुत महाराज, श्रीबाळप्पा महाराज, श्रीआनंदनाथ महाराज तसेच पू. मामासाहेब देशपांडे महाराजांचे आजोबा पू. नारायणभट सोनटक्के इत्यादी असंख्य श्रीस्वामीभक्तांना श्रीस्वामीकृपेने हेच पंधरा अक्षरी नाम मिळालेले होते व त्याच्याच जपाने हे सर्व महात्मे सिद्ध झालेले होते. आजही श्रीस्वामी महाराजांच्या मूळच्या अक्षुण्ण परंपरांमध्ये याच नामाचा अनुग्रह केला जातो.
दुर्दैवाने आजमितीस हे मुख्य सिद्धनाम सोडून श्रीस्वामी महाराजांच्या इतरच नामांची मन:कल्पित संस्करणे रूढ होताना दिसत आहेत. रोज कोणीतरी उठतो आणि नवीनच प्रकारचे स्वामीनाम तयार करून लोकांना त्याचा उपदेश करत सुटतो. कोणी स्वामीनामाला आधी ॐ लावतो तर कोणी शेवटी नम: वगैरे लावतो. या गोष्टींची आवश्यकताच नाही. हे खरेतर श्रीस्वामी संप्रदायाला धरून नाही, त्यामुळे त्याचा भक्तांनी अजिबात अवलंब करता कामा नये.
या संप्रदायात " श्रीस्वामी समर्थ " हे सहा अक्षरी नामही पूर्वीपासून प्रचलित आहे, पण तो नाममंत्र नाही, ते " संबोधन " आहे. प्रेमाने ती श्रीस्वामींना मारलेली हाक आहे. जसे श्रीदत्त संप्रदायात " श्रीगुरुदेव दत्त " म्हणतात तसे श्रीस्वामी परंपरेत " श्रीस्वामी समर्थ " म्हणतात. पण हा नाममंत्र नाही, हे ध्यानात घ्यावे. आजवर अनंत भक्तांनी जपलेला सिद्ध नाममंत्र हा पंधरा अक्षरीच आहे. महान स्वामीभक्तांनी याच नाममंत्रावर प्रचंड तपश्चर्या केलेली असल्याने, तोच मंत्र आपणही जपणे श्रेयस्कर आहे. त्यामुळे त्या सर्व महात्म्यांनी त्यावर केलेली तपश्चर्या आपल्याही उपयोगी पडून, आपल्याला स्वामीनामाच्या अनुभूती लवकर येतात.
पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी श्रीस्वामी महाराजांच्या प्रेरणेने व परमकृपेने रचलेला " श्रीस्वामीसमर्थ नामपाठ " हा श्रीस्वामी महाराजांच्या या पावन नामाचे सर्वांगीण महत्त्व व माहात्म्य विशद करून सांगणारा सत्तावीस अभंगांचा लघुग्रंथ आहे. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाप्रमाणे, या ग्रंथातही श्रीस्वामीसंप्रदायाचे अनेक सिद्धांत, श्रीस्वामी स्वरूपाचे तात्त्विक विवेचन, स्वामीसंप्रदायाचे अंतरंग व बहिरंग साधना-रहस्य असे महत्त्वाचे विषय फार सुरेख रितीने प्रकट झालेले आहेत. या अभंगांना श्रीस्वामींचाच आशीर्वाद असल्याने यांच्या नित्यपठणाने, पारायणाने आणि चिंतनाने आजही हजारो भक्तांना श्रीस्वामीकृपेचे अद्भुत अनुभव येत आहेत. स्वामीभक्तांनी या नामपाठरूपी कल्पतरूचा नित्यपठणात मुद्दाम अंतर्भाव करावा, ही विनंती. (श्रीस्वामीनामपाठ मिळवण्यासाठी 02024356919 यावर किंवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. ग्रंथमूल्य रु. १५/- फक्त)
श्रीस्वामी महाराजांनी देहत्याग केलेलाच नाही, त्यांनी फक्त ती लौकिक लीला केली. ते त्याच पावन देहातून अजूनही कार्यरत आहेत व पुढेही राहणारच आहेत. तरीही उपासनेच्या आनंदासाठी त्यांचे सप्रेम पुण्यस्मरण आज पुण्यतिथी म्हणून आपण करूया. आजच्या या परमपावन दिनी, अकारणकृपाळू परमानंदमूर्ती राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कुसुमकोमल श्रीचरणीं अनन्यभावे दंडवत घालून आपण पू. शिरीषदादांच्याच भावघन शब्दांत प्रार्थना करून, त्याच निजानंदमय श्रीचरणकमलीं स्वामीनामगजरात निरंतर विसावूया. श्रीसद्गुरुकृपेने आपल्याला असा पुण्यस्मरण-सोहळा साधणे, हीच खरी पुण्यतिथी साजरी करणे होय !!
पूर्णब्रह्म स्वामीराया, वटमूला अप्रमेया ।
प्रवर्तिले संप्रदाया, लीलावेगी ॥
काय वानूं शब्दातीत, वारंवार दंडवत ।
राखावे जी सेवारत, जन्मोजन्मी ॥
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
0 comments:
Post a Comment