16 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ५ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ५ वे *

भगवान श्रीनृसिंह हे अत्यंत उग्र व भयंकर रूप मानले जाते. आपल्या लाडक्या भक्तावर अनन्वित अत्याचार करणा-या हिरण्यकश्यपूच्या वधासाठीच हा परम विलक्षण " आवेश " अवतार झालेला असल्यामुळे, साहजिकच त्यांच्या रूपात, लीलेत क्रोधाचे प्राबल्य होते. पण हा अवतार अतिशय उग्र असला तरी, निर्माण झाला मात्र भक्तप्रेमातूनच ना ! त्यामुळेच भगवान श्रीनरहरीरायांच्या अपरंपार भक्तवात्सल्याचेच सर्व संतांनी व भक्तांनी वर्णन केलेले आढळून येते.
श्रीमद् भागवत महापुराणात एक कथाभाग येतो. त्यानुसार हिरण्यकश्यपू व त्याचा भाऊ हिरण्याक्ष हे दोघेही मूळचे भगवान श्रीविष्णूंचे द्वारपाल जय-विजय. एके दिवशी भगवंतांच्या दर्शनाला आलेल्या सनत्कुमारादी चार भावंडांचा त्यांनी वैकुंठाच्या द्वारातच अपमान केला. त्यावर चिडून त्यांनी जयविजयाला , " पृथ्वीवर तीन जन्म राक्षस होऊन जन्माला जा " असा शाप दिला. त्यामुळे तेच पहिल्या जन्मात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू झाले. हिरण्याक्षाला वराह भगवंतांनी मारले तर हिरण्यकश्यपूूला नृसिंहांनी. दुस-या जन्मात तेच रावण व कुंभकर्ण झाले व श्रीरामांच्या हातून मृत्यू आला. तर तिस-या जन्मात शिशुपाल व दंतवक्त्र झाले व त्यांना भगवान श्रीकृष्णांनी मारले. तिन्ही जन्मांत या दोघांना साक्षात् भगवंतांनीच स्वहस्ते मारून मुक्ती दिली. हे दोघेही भगवंतांशी सरूपता मुक्ती लाभलेले त्यांचे नित्यपार्षद होते. त्यांना शापामुळे जन्म मिळाले तरी त्यांची भक्ती काही थांबली नाही. त्यांनी तसाच वर भगवंतांना मागितलेला होता. म्हणूनच त्यांनी या तिन्ही राक्षस जन्मात " विरोधी भक्ती " करून भगवंतांचे अनुसंधन अबाधितच राखलेले होते. ही लीला जरा वेगळ्या दृष्टीने पाहिली तर, श्रीभगवंतांनी आपल्या पार्षदांना शापातून मुक्त होऊन पुन्हा मूळ स्थितीला लवकर जाण्यासाठी कृपापूर्वक मदतच केलेली आहे, असे स्पष्ट दिसून येते. हेही त्यांचे अपार भक्तवात्सल्यच नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या या प्रेमकृपेचाच अनुभव आजही त्यांना शरण जाऊन कळवळून प्रेमाने साद घालणा-यांना नेहमीच येत असतो. भगवान श्रीनृसिंह हे भक्तांचे कोणत्याही संकटातून हमखास रक्षण करणारे दैवत आहेत.
अशा या परम विलक्षण श्रीनृसिंह रूपाचा योगार्थही फार सुंदर आहे. श्रीनृसिंह कोशाच्या प्रथम खंडाच्या " देवा तूं अक्षर " या आपल्या प्रस्तावनेत, कोशाचे संपादन-प्रमुख व श्रीनृसिंहकृपांकित थोर सत्पुरुष प. पू. श्री. शिरीषदादा कवडे नृसिंहरूपाचा योगार्थ बहारीने स्पष्ट करताना म्हणतात, " श्रीनृसिंहावतार हे योगाच्या परिभाषेतील एक गूढ रूपक आहे. हिरण्यकश्यपूरूपी दुर्वासनांचे, कुवृत्तींचे निर्दालन करून प्रल्हादरूपी भक्त जीवाला याच शरीरात भगवत्स्वरूप होता येते, हे या अवतारकथेचे मर्म आहे.
सुषुम्ना नाडीरूपी स्तंभातून नृसिंहरूपात भगवत् शक्तीचे प्राकट्य आहे. ही शक्ती अर्धनर व अर्धमृगेंद्र रूपात आहे, म्हणजे सात्त्विकभावाने उत्पन्न झालेला वासनाविरोधी क्रोधच वासना निर्दालनास मदत करीत आहे, मृगेंद्र(सिंह) रूप झाला आहे. या वासनांचे निर्दालनही संधीकालात म्हणजे सुषुम्नेतच झाले आहे व त्या हिरण्यकश्यपू निर्दालनानंतरच भगवान शांत झालेले आहेत. त्यांची अनुग्रहशक्ती आपले ईप्सित कार्य साधून मूळ निरामय स्वरूपाला आलेली आहे.
त्या भगवत् कृपाशक्तीच्या विलक्षण, अद्भुत अशा आविर्भावाचे वर्णन करताना, तिच्या अंकावर जीवस्वरूपात स्थिर झालेले भक्तराज प्रल्हाद म्हणतात, " माझे मन आपल्या अमृतस्वरूप दर्शनाच्या आस्वादनाने तृप्त होत नाही. हे प्रभो, ब्रह्मादी देवतांनाही जे दर्शन अतीव दुर्लभ आहे, असे आपले पावन दर्शन दहा लाख वर्षे मिळाले तरीही माझे मन तृप्त होणार नाही. अशा दर्शनानंतरही दर्शनासाठीच अतृप्त, आसुसलेल्या मज दासाचे चित्त आपल्याच दर्शनाशिवाय आणखी कशाची इच्छा करू शकते ? " ( श्रीनृसिंहपुराण ४३.७४-७५ )
या श्लोकात वेदव्यासांनी साधकाच्या परम अवस्थेचे मर्मच जणू उलगडून दाखवलेले आहे ! "
प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांचे हे नृसिंहरूपाचे सुरेख योगार्थ-विवरण सर्वच भक्तांनी नित्य चिंतन करावे, असे महत्त्वपूर्ण आहे.
श्रीभगवंतांचा कोणताही अवतार हा अत्यंत विचारपूर्वक झालेला असतो, त्यातून अनेक मार्मिक संदर्भ प्रकट होत असतात. आपापल्या अधिकारानुसार व भगवंतांच्या कृपेनुसार ते यथायोग्य प्रकारे व योग्यवेळी आपोआप समजून येतातच, हेच त्यातील खरे इंगित आहे.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र  : श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर येथील श्रीज्वालानृसिंह )

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment