12 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - १ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प १ ले *

आज वैशाख शुद्ध षष्ठी, परमाराध्य श्रीनृसिंह भगवंतांच्या जयंती-नवरात्राचा प्रथम दिवस. प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कुलदैवत नीरा-नृसिंहपूर येथील भगवान श्रीनृसिंहराज हे होत. प. पू. काका हे जयंती नवरात्र मोठ्या आवडीने व उत्साहात साजरे करीत असत. श्रीनृसिंह जयंतीचा उत्सव होईपर्यंत ते कैरी किंवा आंबा अजिबात खात नसत. जन्मकालानंतर श्रीनरहरीरायाला कैरीच्या पन्ह्याचा नैवेद्य दाखवून उपस्थित ब्राह्मणांची स्वहस्ते पाद्यपूजा करून त्यांना ते पन्हे प्यायला देत व मगच प. पू. काका कैरी, आंबा खात असत.
प. पू. काकांच्या घराण्यात श्रीनृसिंहांचा चांदीचा फार सुंदर आणि प्राचीन टाक नित्यपूजेत आहे. या देखण्या टाकामध्ये खांबातून प्रकट झालेले उग्र नृसिंह भगवान हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पोट नखांनी फाडताना स्पष्ट दिसतात. आपल्या उजवीकडे कयाधू व डावीकडे लहानगे प्रल्हादजी हात जोडून उभे राहिलेले दिसतात. या छोट्याशा टाकातही देवांच्या चेह-यावरील उग्र भाव लपत नाहीत. आज जयंती नवरात्राच्या प्रथमदिनी, गुरुपुष्यामृत योगावर प. पू. काकांच्या नित्यपूजेतील त्याच परमपावन श्रीविग्रहाचे आपण दर्शन घेऊन श्रीनरहरीनामाचा जयजयकार करूया !!
भगवान नृसिंहांची अवतार लीला व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची गोष्ट आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत-वाचत मोठे झालेलो आहोत. श्रीभगवंतांच्या " भक्तवात्सल्य " ब्रीदाचे अलौकिक उदाहरण म्हणून ही गोष्ट प्रसिद्धच आहे. या कथेतून भक्तिशास्त्रातील अनेक सिद्धांत स्पष्ट होतात. पण तेवढा काही विचार आपण कधी केलेलाच नाही या गोष्टीचा. म्हणूनच साधूसंतांच्या वाङ्मयामधून उलगडणारा श्रीनृसिंहकथेतील मार्मिक भक्तिविचार आता पुढील नऊ दिवस आपण त्यांच्याच कृपेने आस्वादणार आहोत. हीच आपली श्रीनृसिंह जयंती नवरात्र गुणगान-सेवा !
भगवान श्रीमाउलींनी ज्ञानेश्वरीत काही महत्त्वपूर्ण ओव्यांमधून नृसिंह लीलेचा उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी भक्तीचे श्रेष्ठत्व व सर्वसमावेशकत्व सांगताना माउली म्हणतात,
ते पापयोनीही होतु कां ।
ते श्रुताधीतही न होतु कां ।
परी मजसी तुकितां तुका ।
तुटी नाही ॥ ज्ञाने.९.३२.४९९॥
ज्या भक्तांनी आपले सर्व भाव केवळ मज एका भगवंतालाच समर्पित करून माझ्याच साठी जे जीवन जगत असतात, ते शरणागत भक्त राक्षसादी पाप योनीत जन्मलेले असले, त्यांनी वेदांचे अध्ययनही केलेले नसले, तरी माझ्याशी म्हणजे साक्षात् भगवंतांशी तुलना केली तर ते तसूभरही कमी ठरणार नाहीत. आधी कसेही असले तरी ते त्या परमभक्तीमुळे पूर्ण भगवत्स्वरूपच झालेले असतात. यासाठी एक चपखल उदाहरण देताना भगवंत अर्जुनाला सांगतात,
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें ।
दैत्यीं देवां आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें ।
जयाचिये महिमे ॥ ज्ञाने.९.३३.४५० ॥
या थोर भक्तीच्या वैभवामुळे पूर्ण तमोगुणी अशा दैत्यांनी देखील सत्त्वगुणी अशा देवतांना उणेपण आणलेले आहे. एवढेच नाही तर, माझा नृसिंहावतार देखील या दैत्यराज प्रल्हादासाठीच तर झाला.
श्रीमाउलींचे येथे स्पष्ट सांगणे आहे की, भगवंतांची पूर्ण प्राप्ती करून घेण्याचा भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भक्ती ही अशी अलौकिक गोष्ट आहे की, तिची भुरळ प्रत्यक्ष परमात्म्यालाही पडते. एरवी निरिच्छ, निस्पृह, निराकार, निर्विकार असा असणारा परमात्मा, या भक्तिसुखासाठी सगुण-साकार होतो, अवतार धारण करतो, अनेक अद्भुत लीला करतो व भक्तांसह त्या परमभक्तीचा आस्वाद पुरेपूर लुटतो.
योगयागादी साधनांच्या कष्टप्रद मार्गापेक्षा सहज सोपा व सर्वांना करता येईल असा एकमेव भक्तिमार्गच आहे व तो सर्वश्रेष्ठही आहे. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत भगवंतांची भक्ती सोडता कामा नये !
भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीमहाविष्णूंचे " आवेश अवतार " आहेत. ते केवळ हिरण्यकश्यपूला मारण्यासाठीच अवतरले होते, असे मानले जाते. पण खरेतर याही अवतारात अनेक भक्तिसिद्धांत अनुस्यूत आहेतच. आज हजारो वर्षे भक्तप्रतिपालक श्रीनरहरी अवताराची उपासना चढत्या वाढत्या प्रमाणात होत आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे व भक्तवात्सल्याचे निदर्शक नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment