*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - २ ***
* श्रीनृसिंह जयंती नवरात्र पुष्प २ रे *
भक्ती ही जात, धर्म, कर्म, वंश इत्यादी सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीभगवंतांच्या परिपूर्ण प्राप्ती साठी अनन्य-भक्ती हा एकच मार्ग आहे ; असे भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे प्रतिपादन आहे.
अनन्य भक्तीमुळे भगवंतांशी जी पूर्ण एकरूपता होते, ती ज्ञान, योग, याग, धर्माचरण अशा इतर कोणत्याही मार्गांनी होत नाही, हे सांगताना माउली भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचे उदाहरण देतात.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की,
तो प्रल्हाद गा मजसाठीं ।
घेतां बहुतें सदा किरीटी ।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी ।
तयाचिया जोडे ॥
॥ ज्ञाने. ९.३२.४५१॥
अरे अर्जुना, माझ्या प्रेमळ भक्त प्रल्हादासाठी मला नृसिंहरूप धारण करावे लागले. तो खरेतर पापयोनी अशा दैत्यकुळात जन्माला आलेला असूनही प्रत्यक्ष माझ्याशी तुलना केली तर, तोच माझ्यापेक्षा कांकणभर सरस ठरेल. कारण ज्या मोक्षासारख्या दुर्मिळ गोष्टी मी खूप परीक्षा पाहून, क्वचित एखाद्याला प्रदान करतो, त्या त्याच्या केवळ कथा जरी प्रेमाने श्रवण केल्या तरी कोणालाही सहज प्राप्त होतात. म्हणूनच भक्तवर प्रल्हादजी आपल्या भक्तीच्या बळावर भगवंतांहूनही श्रेष्ठ ठरतात.
भगवान श्रीमाउली भक्तीला गंगेची उपमा देतात. एकदा गंगेला मिळाले की स्वतंत्र अस्तित्व संपते. मग पूर्वी तो ओढा असो नाहीतर छोटी नदी असो किंवा गावाचे घाण गटार असो, गंगेला मिळाले की ते गंगारूपच होऊन ठाकते. तसे एकदा या भगवंतांच्या भक्तिचिद्गंगेला मिळाले की तो भगवंतांचेच रूप होऊन उरतो. गंगेला जसा समुद्र हाच अंतिम पाडाव असतो, तसे भक्तीला भगवंत हेच हक्काचे अंतिम गंतव्य स्थान आहेत. हेच भक्तीचे सर्वश्रेष्ठत्व आहे. असे अन्य कोणत्याही मार्गात घडत नाही. फक्त हे ' गंगेला मिळणे ' आपल्या हाती नाही, ते श्रीसद्गुरूंनीच कृपापूर्वक घडवावे लागते. ते होईपर्यंत आपण जसे जमेल तसे मनापासून भगवंतांना आळवीत राहायचे असते, वेळ आली की ते बरोबर गुरुरूपाने कृपा करतातच. ही निश्चिंतता देखील केवळ भक्तीतच लाभते. ( आज गंगासप्तमी, अर्थात् गंगेची उत्पत्ती तिथी आहे, म्हणून मुद्दाम श्रीमाउलींचे भक्तिचिद्गंगा विवेचन मांडले. )
म्हणून अर्जुना, अनन्य-भक्ती समोर जात, वंश इत्यादी सर्व गोष्टी गौणच आहेत. भक्ती हीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरुषार्थांची माता आहे !
देवांच्या अवतारलीला आणि अवतारी भक्तांच्या, संतांच्या लीला यांच्यामध्ये फलत: भेद नसतो. या कोणत्याही लीलांचे प्रेमाने केलेले वाचन पुण्यप्रद असतेच पण त्यांचे चिंतन-मनन हे त्याहूनही फायदेशीर असते. कारण संत दिसायला तरी आपल्या सारखेच मनुष्यरूप असतात, त्यांनाही आपल्यासारखेच सुख-दु:खादी भोग असतात. म्हणून त्यांच्याविषयी एक वेगळी आपुलकी आपोआपच आपल्या मनात निर्माण होते. या आपुलकीमुळेच, कठीण परिस्थितीत ते कसे वागले? त्यांनी कोणते निर्णय घेऊन आपली भक्ती प्रपंचाच्या रामरगाड्यात देखील अबाधित राखली? याबद्दलचे त्यांचे प्रसंग वाचून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते, साधनेचा आपला हुरूप वाढतो. शिवाय माउली सांगतात की, भगवंतांना त्यांच्या भक्तांची स्तुती केली की विशेष आनंद होतो व ते त्या स्तुती करणा-यावर प्रसन्न होऊन कृपा करतात. हा दुहेरी फायदा असतो संत चरित्रांचा. म्हणून नेहमी संतांची चरित्रे वाचावीत, त्यावर चिंतन करावे. याही दृष्टीने भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचे चरित्र फार मोठा आदर्श आहे. सभोवती अत्यंत विरोधी वातावरण असूनही त्यांनी निष्ठेने इतकी भक्ती केली की, साक्षात् भगवंतांना त्यांच्यासाठी अवतार धारण करावा लागला. धन्य ते भक्तवर प्रल्हादजी !!
अशा परमवंदनीय प्रल्हादबाळासाठी भगवान श्रीनरहरीराय धावत आले व त्यांनी त्याचे संरक्षण केले. या लीलेचे फार मोहक वर्णन करताना भक्तवर श्रीनामदेवराय म्हणतात,
काय रे गडगडित दुमदुमित ।
ब्रह्मकटाह उलथूं पहात ॥१॥
तो देव आला रे नरहरी ।
आतां कवण सांवरी ॥२॥
प्रल्हादासी दिधले जैत्य ।
हर्षे नामा गुढी उभारीत ॥ ना.गा.५१०.३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र: प्रल्हादस्थापित श्रीनृसिंहराज, श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:
Post a Comment