अक्षयतृतीयेचा अमृतयोग
नमस्कार सुहृदहो,
आज वैशाख शुद्ध तृतीया, अक्षयतृतीया !!
आपली वैदिक संस्कृती ही फार प्रगल्भ विचारांतून निर्माण झालेली आहे. या संस्कृतीचा मूळ पायाच विवेक-विचार हा असल्याने यात काहीही अनाठायी किंवा वावगे नाही. आपण नीट विचार न करता उगीचच भुई धोपटत बसतो. म्हणूनच आपले प्राचीन वैभव आपल्याला कवडीमोलाचे वाटते, हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत व्यास वाल्मीकादी थोर थोर ऋषी. त्यांच्या अलौकिक ऋतंभरा प्रज्ञेतून साकार झालेल्या सर्व गोष्टी देखील अलौकिकच असणार यात शंका ती काय?
उदाहरणार्थ साधी सणांची संकल्पनाच घ्या. आपल्या संस्कृतीचे सण हे निसर्गचक्र, ऋतुमान, शारीरिक व मानसिक आरोग्य यांचा सुयोग्य विचार करून समाजहित-देशहित तसेच अंतिमत: मानवजातीचे शाश्वत हित डोळ्यांसमोर ठेवूनच तयार केलेले आहेत. या सणांमधून कायम सर्वांचे कल्याणच पाहिलेले दिसून येते. ऋषीमुनींच्या प्रातिभ व सात्त्विक बुद्धीचे पडलेले निखळ प्रतिबिंब या सणांमधून साकारलेले आपल्याला दिसते. म्हणूनच भारतीय सणांची संकल्पना हा एक नाही तर अनेक पीएचड्यांचा विषय आहे.
भारतीय सणांमध्ये साडेतीन शुभमुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. त्यातील आज अक्षयतृतीया हा साडेतीनावा, म्हणजेच अर्धा शुभमुहूर्त आहे. ही तिथी त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते म्हणून तिला ' युगादी ' असेही म्हणतात. पुराणांत या शुभ मुहूर्तावर अनेक उत्तम प्रसंग घडल्याची नोंद सापडते.
आपला प्रत्येक सण हा काही विशेष गोष्टीशी निगडित असतो. पाडव्याला गुढीचे तर दिवाळीत दिव्यांचे महत्त्व ; दस-याला सोने लुटायचे असते. आजच्या तृतीयेला " दान " महत्त्वाचे मानले जाते. ही पितृतिथी आहे. या दिवशी आपल्या कुळातील दिवंगत पितरांसाठी आवर्जून दानधर्म केला जातो.
" दान " हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. पण त्याचे खरे मर्म मात्र कोणीच समजून घेतलेले नसते. त्यासाठीच आजच्या मुहूर्तावर आपण भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी मांडलेली दानाची संकल्पना थोडक्यात समजून घेऊया.
भगवान श्रीमाउली दानाचेही तीन प्रकार मानतात, सात्त्विक, राजस व तामस. यातले सात्त्विक दानच संतांनी श्रेष्ठ मानलेले असून आजच्या तिथीला त्याचेच विशेष महत्त्व असते. सात्त्विक दानाचे मर्म सांगताना, श्रीज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायातील विसाव्या श्लोकाच्या विवरणात श्रीमाउली म्हणतात, " जे दान प्रामाणिकपणे व स्वधर्मानुसार मिळालेल्या आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीतून निरपेक्षपणे केले जाते तेच दान सात्त्विक होय. उत्तम क्षेत्रस्थानी, सुयोग्य व गरजू व्यक्तीला मनात कसलाही अहंकार न ठेवता आणि आढ्यतेची, मी दान दिले आहे अशी किंचितही भावना न ठेवता तसेच परतफेडीची किंवा मोबदल्याची कसलीही अपेक्षा न ठेवता जे दिले जाते, तेच सात्त्विक दान होय. दुधाच्या अपेक्षेने गायीचा प्रयत्नपूर्वक सांभाळ करणे, याप्रकापचे दान राजस दान होय. तर वाईट काळात, वाईट गोष्टींवर म्हणजे नाचगाणे, तमाशा सारख्यावर खर्च करणे हे तामस दान होय. "
आजच्या तिथीला जो प्रेमादरपूर्वक सात्त्विक दान करतो, त्याला त्या दानाचे अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारे पुण्य मिळते, असे आपले संत म्हणतात. यावर्षी अक्षयतृतीया सोमवारी आलेली आहे. त्यात दिवसभर मृग नक्षत्र असल्याने अमृतसिद्धी योगही घडलेला आहे. या परमपुण्यदायक योगावर जो तीर्थस्नान, दान व साधना-नामस्मरण करेल, त्याला त्याचे अनंतपट व अक्षय फल प्राप्त होईल. थोडक्या कष्टात मोठा लाभ मिळवून देणारे आपले सण किती प्रगल्भ विचारांतून निर्माण झालेले आहेत पाहा.
अक्षयतृतीया उन्हाळ्याच्या दिवसात येत असल्याने, पाण्याचा माठ, छत्री, वस्त्र, पंखा, पन्हे अशा उष्णताशामक गोष्टींचे आवर्जून दान करायला शास्त्राने सांगितलेले आहे. यातही किती विचार केलाय बघा ऋषीमुनींनी. त्यांची एकही गोष्ट निरर्थक नाही, हे पाहून आपला ऊर अभिमानाने भरून यायला हवा !
आजच्या या पावन पर्वावर, तुम्हां आम्हां सर्वांना आपल्या प्रगल्भ प्राचीन वारशाचे महत्त्व उमजो आणि सात्त्विक पारमार्थिक कर्मांमध्ये सर्वांची रुची वाढो, भगवंतांचे अक्षय नाम घेण्याची सद्बुद्धी लाभो, हीच जगन्नियंत्या भगवान श्रीपांडुरंग परमात्म्याच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक प्रार्थना करून पुनश्च सर्वांना अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा देतो !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
0 comments:
Post a Comment