11 May 2016

*** भाष्यकाराते वाट पुसतू ***



आज वैशाख शुद्ध पंचमी, अद्वैतज्ञानभास्कर भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांची जयंती !
"भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य" असे नुसते नाव जरी उच्चारले तरी आम्हां भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि दोन्ही हात जोडले जाऊन केव्हा मस्तक नमवले जाते, ते कळत देखील नाही. इतका या श्रेष्ठ, प्रत्यक्ष शिवावतारी व अलौकिक, अद्भुत विभूतिमत्वाचा आम्हां भारतीयांच्यावर प्रेमळ पगडा आहे. त्यांचीच प्रात:स्मरण स्तोत्रे म्हणत-ऐकत आमचा दिवस उजाडतो तर त्यांची अपराधक्षमापन स्तोत्रे म्हणत आम्ही भारतीय झोपी जातो. आमच्या दैनंदिन जीवनात श्रीमद् शंकराचार्यांचा असा ' अक्षर सहवास ' आम्हांला सतत लाभतो व त्यातील अद्भुत माधुर्य, गेयता, रसिकतेमुळे तो हवाहवासाही वाटतो.
भारतीय तत्त्वपरंपरेत सर्वात श्रेष्ठ व मानाचे स्थान भूषविणा-या अद्वैत-वेदान्त दर्शनाचे प्रणेते भगवान भाष्यकार श्रीमद् शंकराचार्य हे आमचे परमपूजनीय, प्रात:स्मरणीय मार्गदर्शक आहेत. श्रीआचार्यांच्या भव्य जीवन-कार्याचे एका श्लोकात वर्णन करायचे तर असे म्हणता येईल,
अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित् ।
षोडशे कृतवान्भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात ॥
केरळ प्रांतातील कालडी गावी शिवगुरु-आर्यांबा या सात्त्विक दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या या परिपूर्ण शिवावताराने वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांचा संपूर्ण  व सांगोपांग अभ्यास केलेला होता. त्यांना बाराव्या वर्षी यच्चयावत् सर्व शास्त्रे मुखोद्गत झालेली होती. नर्मदा किनारी सद्गुरु श्रीगोविंदयतींच्या कृपाप्रसाद प्राप्तीनंतर, प्रमुख दश उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, विष्णुसहस्रनाम आदी ग्रंथांवरील सर्व भाष्ये त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहून पूर्ण केली. पुढील सोळा वर्षे संपूर्ण भारतखंडामध्ये अद्वैत वेदान्ताचा प्रचार प्रसार करून हा दिग्विजयी अवतारी महात्मा केवळ बत्तिसाव्या वर्षी मर्त्य जगाचा निरोप घेऊन निजधामी परतला. अर्थात् त्यांचे लौकिक रूप अदृश्य झाले असले तरी, आपल्या ग्रंथांच्या दिव्यरूपाने ते सदैव सर्वांच्या पाठीशी आहेतच.
श्रीआचार्यांचे हे जीवनकार्य नुसते वाचतानाही आपल्या मनात धडकी भरते. त्यांचे एकेक ग्रंथ सुद्धा एका मानवी आयुष्यात पूर्ण समजून घेता येणार नाहीत इतके अद्भुत आहेत.
श्रीशंकराचार्य व श्रीज्ञानेश्वर माउली यांच्या जीवन व कार्यात खूप साम्य आहे व हे दोघेही आपल्याकडचे अद्वितीय चमत्कारच आहेत !
श्रीमद् आचार्यांच्या भाष्यांपेक्षाही त्यांचे खरे स्वरूप त्यांच्या, " प्रबोधसुधाकर, शतश्लोकी, अपरोक्षानुभूती, ब्रह्मज्ञानावलीमाला " इत्यादी प्रकरणग्रंथ तसेच त्यांच्या रसाळ, मोहक स्तोत्रांच्या अभ्यासानेच कळते. श्रीआचार्य हे फार रस-भावपूर्ण अंत:करणाचे भक्तश्रेष्ठ होते. त्यांच्या स्तोत्रांमधील मनोज्ञ भाव-विश्वाचे प्रेमदर्शन आपल्याला अंतर्बाह्य स्तिमित करणारे, खळाळत्या असीम भक्तिसागरात अंतर्बाह्य ओलेचिंब भिजवणारे आहे. " मूकास्वादनवत् ।" अशी सर्वांग-तृप्ती प्रदान करणारे आहे !!
सनातन वैदिक धर्माचे त्यांनी केलेले संरक्षण व पुनरुज्जीवन कार्य हे वादातीत अलौकिक आहे. आचार्य नसते तर संपूर्ण भारतीय उपखंड हा वेदविरोधी व अपूर्ण अशा नास्तिक संप्रदायांनी गिळंकृत केला असता. आचार्यांच्या थोर कार्यामुळेच आपण अजरामर व सर्वश्रेष्ठ अशी आपली वैदिक संस्कृती आजही अभिमानाने जोपासू शकलेलो आहोत. हे त्यांचे आपल्यावरचे कृपाऋण विसरून चालणार नाही.
श्रीमद् आचार्यांचा आणखी एक खूप मोठा उपकार म्हणजे, त्यांनी त्या काळात प्रामुख्याने प्रचलित असलेल्या , गणपती, शंकर, विष्णू, देवी व सूर्य या पाच ब्रह्मस्वरूप देवतांच्या सर्व उपासना संप्रदायांचा " पंचायतन पूजा " या एकाच प्रकारात केलेला विलक्षण समन्वय, हा होय. त्यामुळे विविध संप्रदाय आपापले हेवे-दावे सोडून एकत्र आले व भारतीय संस्कृती तुकडे होण्यापासून वाचली.
सनातन वैदिक हिंदू धर्माच्या रक्षण व संवर्धनासाठी त्यांनी भारताच्या चार दिशांना जगन्नाथपुरी, शृंगेरी, द्वारका व बद्रिनाथ अशी चार व कांचीला पाचवे पीठ स्थापन केले. आपल्या प्रमुख शिष्यांची त्यावर स्थापना करून त्यांना कार्य-नियमावली व उपासना घालून दिली. सनातन धर्माच्या संधारणेसाठी प्रचंड ग्रंथरचना करून भक्कम तात्त्विक आधार निर्माण करून ठेवला. विविध स्थानांवर देवतांची प्रतिष्ठापना करून लोकांना उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले. कन्याकुमारीपासून ते पार अफगाणिस्तानापर्यंत आणि पश्चिम सागरापासून ते पूर्वेच्या कामाख्येपर्यंत अखंड भ्रमण करून त्यांनी धर्मस्थापना केली. त्याच काळात त्यांनी आपल्या भूवैकुंठ पंढरीत येऊन भगवान श्रीपांडुरंगांचे दर्शन घेतले. ते सावळे सुकुमार राजस रूप पाहून त्यांनाही उत्स्फूर्त अष्टक रचून स्तुती करायचा मोह आवरला नाही. अवघ्या बत्तीस वर्षात एवढे प्रचंड व अमानवी कार्य केवळ श्रीभगवंतच करू शकतात, यात किंचितही शंका नाही. म्हणूनच आमचे सर्व मायबाप संत श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांना अपरशिवच मानतात.
भगवान श्रीआचार्यांचे किती व कसे गुणगान करावे? आपली लेखणी-वाणी फार फार तोकडी आहे त्यासाठी. साक्षात् ज्ञानावतार भगवान श्रीज्ञानेश्वर माउली देखील, " भाष्यकाराते वाट पुसतू ।" असे म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान विषयातील सार्वभौमत्व मान्य करतात आणि त्यांच्याच अद्वैतसिद्धांताचे स्वानुभूत प्रतिपादन आपल्या वाङ्मयातून करतात. म्हणून आपण केवळ सद्गुरुकृपेनेच लाभलेल्या, आचार्यांच्या चरणींचे बहुमोल रज:कण मस्तकी धारण करण्याच्या आपल्या महद्भाग्याचा वारंवार हेवा करावा, यात नवल ते काय? हे अपूर्व सुखभाग्य तरी काय थोडे म्हणता येईल का?
भगवान श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांचा अद्वैत सिद्धांत केवळ एका वाक्यात " ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: । " असा सांगता येत असला, तरी त्याच्या सविस्तर आकलनासाठी आजवर ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेले आहेत महात्म्यांनी. पण त्या सर्वंकष सिद्धांताची व्याप्ती एखाद्याच्या पूर्ण कवेत आलेली आहे, हे म्हणणे धारिष्ट्याचेच ठरावे. तरीही माझ्या वाचनात आलेल्या एका विलक्षण ग्रंथाचा मुद्दाम उल्लेख करतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी बेळगाव येथील श्रीशंकर जयंती महोत्सवात केलेली " शिवानंदलहरी " या स्तोत्रातील अडतिसाव्या श्लोकावरील चार प्रवचने " चित्तडोहावरील आनंदलहरी " या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झालेली आहेत. या ग्रंथात पू. दादांनी सर्वसामान्यांनाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत श्रीआचार्यांचे समग्र तत्त्वज्ञान नेमकेपणे विवरिले आहे. माझी सर्वांना प्रेमळ विनंती आहे, हा जबरदस्त ग्रंथ जरूर पाहा, अभ्यासा. त्यातून समोर उभे ठाकणारे श्रीमत्शंकर भगवत्पादाचार्यांचे भव्य-दिव्य स्वरूप आपल्याला कायमच तत्त्व-ऊर्जा देणारे, आपले लळे पाळीत आपल्याला ब्रह्मबोधाचे खाजे भरवणारे व निरंतर आनंदमय करणारेच आहे. आचार्य तत्त्वज्ञानावरचा दुसरा इतका सोपा व सुंदर ग्रंथ आजवर मी तरी पाहिलेला नाही !
भारतभूमीचे चिरंतन आणि अमूल्य वैभव असणा-या भगवान श्रीमद् आद्य श्रीशंकराचार्य स्वामी महाराजांच्या पावन, सर्वतीर्थास्पद श्रीचरणीं, आजच्या श्रीशंकरजयंतीच्या पर्वावर आपण सर्वांनी मिळून प्रेमदानाची कृपायाचना करीत वारंवार नतमस्तक होऊया आणि भगवान श्रीमाउली म्हणतात त्याप्रमाणे श्रीमद् आचार्यांनी दाखवलेल्या उपासनावाटेवरून मार्गक्रमण करीत ब्रह्मबोधाच्या महानगरीत सुखरूप पोहोचूया !
श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् ।
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment