*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ३ ***
* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ३ रे *
श्रीभगवंतांना सर्वात जास्त आपले भक्तच आवडतात. त्यांचे आपल्या भक्तांवर, अभिन्न व परमप्रिय अशा लक्ष्मीमातेपेक्षाही जास्त प्रेम असते आणि प्रसंगी ते विलक्षण प्रेम भगवंत मुद्दाम दाखवूनही देतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला हा अद्भुत श्रीनृसिंहावतार हे याच विलक्षण भक्त-प्रेमाचे विशेष उदाहरण म्हणायला हवे.
श्रीमद् भागवत महापुराणाच्या सप्तम स्कंधातील अध्याय क्रमांक १ ते १० मध्ये ही संपूर्ण नृसिंहावतार कथा भगवान श्रीवेदव्यासांनी फार सुंदर शब्दांमध्ये वर्णिलेली आहे. त्यात भक्तिशास्त्रातले अनेक सिद्धांत त्यांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत.
श्रीनृसिंह हे भगवंतांचे अत्यंत उग्र रूप होते, इतके की त्यांच्या आविर्भावामुळे संपूर्ण ब्रह्मांडच जळू लागले. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे वर्णन करताना जे म्हटले आहे, ते या उग्र नृसिंहरूपालाही चपखल साजणारेच आहे. माउली म्हणतात,
एथ अग्नीचीही दिठी करपत ।
सूर्य खद्योत तैसा हारपत ।
ऐसें तीव्रपण अद्भुत ।
तेजाचे यया ॥ ज्ञाने.११.३०० ॥
हे नरसिंहरूप इतके भयंकर होते की त्याच्या तेजाने प्रत्यक्ष अग्नीचीही दृष्टी करपली, महाप्रतापी सूर्य काजव्यासारखा भासू लागला. असे ते तीव्र नृसिंहतेज अवघ्या ब्रह्मांडासाठी असह्य होते.
पण त्यांचे हिरण्यकश्यपूला मारण्याचे कार्य झाल्यावरही त्यांचा क्रोध काही शांत होईना. हे पाहून सर्व देव-देवता अस्वस्थ झाले. श्रीनृसिंह भगवंतांसमोर जाण्याची कोणाचीच छाती होईना. ते वारंवार डरकाळ्या फोडून ब्रह्मांड दणाणून सोडत होते. देवांना शांत तर करायलाच हवे, नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नीत सगळे त्रिभुवन जळून खाक व्हायचे. देवतांना काहीच सुचेना काय करावे ते. मग त्यांनी भगवती लक्ष्मीला प्रार्थना केली नृसिंहांना शांत करण्याची. त्या देवांसमोर आल्या ख-या, पण ते उग्र रूप पाहून घाबरल्या व त्याच पावली परत फिरल्या.
शेवटी ब्रह्मदेव लहानग्या प्रल्हादाला म्हणाले, " अरे बाळा, हे उग्ररूप तुझ्यासाठी निर्माण झालेले आहे, आता तूच त्यांना शांत कर. आमची काही हिंमत नाही त्यांच्या समोर जायची ! " प्रल्हादाने शांतपणे ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकले व तो त्या उग्ररूपाला अजिबात न भिता समोर गेला. त्याने अतीव प्रेमाने व आदराने भगवंतांना साष्टांग दंडवत घातला.
देवांच्या ज्या क्रोधापुढे त्रैलोक्याची होळी होत होती, तो क्रोध बाळ प्रल्हादाला पाहताच एका क्षणात शांत झाला. ज्या रक्त ओकणा-या भयानक नेत्रांमधून काही क्षणांपूर्वी जणू क्रोध-अंगार बरसत होते, तेच नेत्र बाल प्रल्हादाला समोर पाहून अचानक मायेने भरून आले. भगवंतांच्या हृदयात मातृवात्सल्याचा पूर आला आणि त्याच स्नेहाने त्यांनी प्रल्हादाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. प्रेमावेगाने प्रल्हादाला जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवले आणि चाटायला सुरुवात केली. ते सिंहरूपात प्रकटलेले असल्यामुळे चाटणे हेच त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम होते.
इतर देव-देवता तर सोडा, पण लक्ष्मीमाता सुद्धा जेथे जाऊ शकत नव्हती, तेथे भक्तश्रेष्ठ प्रल्हाद नि:संकोचपणे गेले, हेच भक्तीचे श्रेष्ठत्व आहे. भगवान वेदव्यासांनी या गोष्टीतून दोन सिद्धांत स्पष्ट केले आहेत की, भक्त व भगवंतांचे प्रेमनाते सगळ्यात वेगळे व अलौकिक असते आणि जे देव-देवतांनाही कधीच प्राप्त होत नाही, ते भगवंतांचे समग्र प्रेम आपल्या अनन्य भक्तीमुळे केवळ भक्तालाच मिळत असते. म्हणून प्रेमभक्ती ही खरोखरीच बोला-बुद्धीच्या पलीकडची, अपूर्व-मनोहर गोष्ट आहे !!
भगवंतांच्या या अद्भुत भक्तप्रेमाचे चपखल वर्णन करताना सद्गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात,
जय जय नरसिंहा ।
अकळ न कळे तुझा पार ॥ध्रु.॥
भक्तभूषण दीनवत्सल हरी ।
प्रल्हादासी रक्षिलें नानापरी ॥१॥
भावार्थ प्रल्हादभक्तें दाखविला ।
त्याच्या भावार्थे स्तंभी प्रगट झाला ॥२॥
हरिजनाचा द्वेषी सारियेला ।
दास प्रल्हाद देवें रक्षियेला ॥
॥स.गा.११४९.३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )
0 comments:
Post a Comment